पान एक-''बदल हवो तर आमदार नवो''
16648
सावंतवाडी ः येथे शनिवारी आयोजित सभेत बोलताना जयंत पाटील. व्यासपीठावर अमोल कोल्हे, अर्चना घारे, अमित सामंत, प्रवीण भोसले आदी.
बदल हवो तर आमदार नवो
जयंत पाटील ः‘शिवस्वराज्य’ यात्रेतून सत्तारूढांवर टीका
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ : येथील विधानसभा मतदारसंघ गेली पंधरा वर्षे विकास आणि रोजगारापासून वंचित ठेवणाऱ्या शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना आणि राज्यात असलेल्या भ्रष्टाचारी सरकारला घालवायचे आहे. ‘बदल हवो तर आमदार नवो’ अशी खास मालवणी भाषेत टीका करत महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी सरकार घालवा आणि सर्वसामान्यांचे सरकार आणा, अशी हाक शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे घातली.
राष्ट्रवादीच्या अर्चना घारे या चांगल्या उमेदवार आहेत. त्यांचे काम करण्याची पद्धत चांगली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सावंतवाडीतून लढण्याची त्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख आणि काँग्रेस नेत्यांकडे करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या माध्यमातून सावंतवाडीत दाखल झालेल्या ‘शिवस्वराज्य यात्रे’च्या निमित्ताने येथील गांधी चौकात आयोजित झालेल्या सभेत पाटील बोलत होते. यावेळी खासदार अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, सिंधुदुर्ग निरीक्षक शेखर माने, युवक अध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सुरेश दळवी, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब, प्रसाद रेगे, रेवती राणे, सावली पाटकर, पुंडलिक दळवी, संदीप घारे, देवा टेमकर, नईम मेमन, हंजला नाईक, सुनील गावडे, अफरोझ राजगुरू, ऋतिक परब आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘आतापर्यंतच्या इतिहासात सध्या सुरू असलेला सरकारमध्ये सुरू असलेला भष्ट्राचार जनतेने याआधी कधीच पाहिला नव्हता. हे ‘इव्हेंट’चे सरकार झाले आहे. लाडकी बहीण योजना आणली; पण बहीण सुरक्षित राहिली तरच योजना चालणार, पण सांगणार कोण? महिला सुरक्षा महत्त्वाची आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर उभा राहत आहे. नव्या योजनांसाठी सव्वा लाख कोटींचे कर्ज मागितले आहे. दिवाळी आली तरी शालेय विद्यार्थ्यांना गणवेश नाही. येथील शिक्षणमंत्र्यांना फक्त लाडका कॉन्ट्रक्टर हवा आहे; पण मुलांचे गणवेश नको. आपल्या मतदारसंघात पंधरा वर्षांपूर्वी ज्या घोषणा केल्या, त्या आजही पूर्ण केल्या नाहीत. येथील काजू बागायतदार शेतकर्ऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. मल्टिस्पेशालिटीचा विषयही तिष्ठत आहे."
खासदार कोल्हे म्हणाले, ‘‘सावंतवाडी मतदारसंघात नुसत्या घोषणा करणाऱ्या जाकिटवाल्या जादूगार आमदाराला आराम करू द्या. त्यांच्या जागी राष्ट्रवादीच्या अर्चना घारेंना संधी द्या. चुकीला माफी असते; मात्र गद्दारांना माफी नाही. सत्ताधाऱ्यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. राजकोट येथे घडलेल्या घटनेमुळे शरमेने मान खाली घालावी लागते. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारचे वस्त्रहरण करण्यासाठी सज्ज व्हा.’
जिल्हाध्यक्ष सामंत यांनी, येथील सर्वसामान्यांचे प्रश्न तसेच आहेत. त्यामुळे भोळ्या भाबड्या जनतेची फसवणूक करणाऱ्या गद्दार आमदारांना येत्या निवडणुकीत जागा दाखवा, असे आवाहन केले. सौ. घारे यांनी, जाणीव जागर यात्रेच्या निमित्ताने सावंतवाडी मतदारसंघातील जनतेचे दुःख पाहिले. यात रोजगार, आरोग्याचे मुद्दे महत्त्वाचे होते. येणार्ऱ्या काळात हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनतेने राष्ट्रवादीसोबत राहावे, असे सांगितले. प्रवीण भोसले, सुनील गव्हाणे, सुरेश दळवी यांनी आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून सुरेश दळवींच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. कोल्हे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘वग महाराष्ट्राचा’ या नाट्याचा प्रयोग दाखविण्यात आला.
चौकट
फसव्या घोषणांपासून जनेतेने सावध राहावे
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर केवळ ताज हॉटेल उभारण्याची घोषणा करत आहेत. त्यांची गोष्ट ही मी गेली पंधरा वर्षे ऐकत आहे; मात्र ते कधी पूर्ण करणार, हेही त्यांनी सांगावे. निवडणुका आल्या की ‘भूलभुलैय्या’ करायचे आणि निवडणूक जिंकायचे, हा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे; मात्र आता मतदार त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. जनतेने या गोष्टींपासून सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
...............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

