रत्नागिरी रेल्वे स्थानक सुशोभिकरणाने पर्यटनाच्या संधी
17904
रेल्वे स्थानक सुशोभीकरणाने पर्यटनाच्या संधी
मंत्री रवींद्र चव्हाण : टाटांतर्फे राज्याच्या विकासाचा आराखडा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : रत्नागिरी रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण झाल्याने पर्यटनाच्या अधिक संधी निर्माण होतील. रोजगारासाठी कोकणातून लोकांचे होणारे स्थलांतर यानिमित्ताने थांबले पाहिजे. राज्याच्या विकासाचा व्हिजन आराखडा टाटाच्या माध्यमातून तयार होत असून, विकासाचे राजकारण अविरत सुरू ठेवायचे असेल तर महायुतीला आशीर्वाद द्या, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
रत्नागिरी रेल्वेस्थानक सुशोभीकरण कामाचे लोकार्पण बांधकाम मंत्र्याच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. रेल्वे मार्गावरील कोकणातील १५ रेल्वेस्थानकांचे सुशोभीकरण सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आले. यामध्ये खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी व राजापूर या जिल्ह्यातील पाच रेल्वे स्थानकांचा समावेश होता. यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, ‘बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकण रेल्वेचे प्रणेते प्रा. मधू दंडवते यांची स्मृती जागवण्याचे काम केले आहे. कोकणातील एखादा व्यक्ती मोठा होतो, त्यावेळी आपल्या कोकणच्या विकासासाठी कशी मेहनत घेतो, याचे हे उदाहरण आहे. त्यांनी कोकण रेल्वे स्थानकांचा कायापालट केला आहे. रेल्वे स्थानकावरील अन्य सुविधांसाठी आपण एमआयडीसीतर्फे ३८ कोटी रुपये दिले आहेत. त्या कामाचा प्रारंभही मंत्री चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आला.
सिंधुरत्न योजनेमधून रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील रिक्षा व्यावसायिकांच्या विमा हप्त्यातील दोन हजार रुपये भरण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी या कार्यक्रमात जाहीर केले. माजी आमदार बाळ माने यांनी आंबा बागायतदारांचा प्रश्न मांडला होता. त्यानुसार आंबा वाहतुकीसाठी पिकअप गाडीला साडेतीन लाख सिंधुरत्नमधून देणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.
चौकट
सर्वपक्षीयांशी कॉर्डिनेशन
बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहायक अनिकेत पटवर्धन यांच्यावर काहींनी टीका केली. मात्र महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची पाठराखण केली पाहिजे. त्यांचे सर्वपक्षीयांशी व पदाधिकाऱ्यांशी कॉर्डिनेशन असते. अगदी कोकण रेल्वेच्या या कार्यक्रमासाठीही त्यांनी सर्वांशी संपर्क साधत जबाबदारी पार पाडल्याचे कौतुकही सामंत यांनी केले.
चौकट
चार स्थानकांचे लोकार्पण ऑनलाईन
रत्नागिरी येथे प्रत्यक्ष लोकार्पण सोहळा बांधकाम मंत्री आणि उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. उर्वरित चार स्थानकांचे लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. खेड स्थानकावर आमदार योगेश कदम, भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, चिपळूण येथे आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, संगमेश्वर येथे माजी आमदार डॉ. विनय नातू, राजापूर येथे सिंधुरत्नचे सदस्य किरण सामंत, अजित यशवंतराव आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

