पान एक-गेळेतील जमीनींचे अखेर वाटप
N17941
सावंतवाडी ः गेळे येथील ग्रामस्थांना बुधवारी जमीन वाटपासंदर्भात कागदपत्रे सुपुर्द करण्यात आली. त्यावेळी रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, संदीप गावडे, सागर ढोकरे आदी. (छायाचित्र ः रूपेश हिराप)
गेळेतील जमिनींचे अखेर वाटप
कबुलायतदार गावकर; प्रातिनिधिक स्वरूपात १० जणांना कागदपत्रे
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न खऱ्या अर्थाने आज सुटला आहे. हा सुवर्ण दिवस २५ वर्षांनंतर आपण पाहत आहोत आणि ते फक्त आणि फक्त महायुतीच्या सरकारमुळेच शक्य झाले आहे. त्यामुळे आपले आशीर्वाद सदैव महायुतीच्या पाठीशी ठेवा, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केले.
गेळे जमीन वाटप कागदपत्रांच्या वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात चव्हाण व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात १० ग्रामस्थांना शासनाच्या पत्राचे वाटप झाले. चव्हाण म्हणाले, ‘‘आंबोली, चौकुळ व गेळेमधील कबूलायतदार गावकर प्रश्नाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खऱ्या अर्थाने वाचा फोडली. तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्याला दिशा दिली. त्यानंतर केसरकर व मी सातत्याने पाठपुरावा केला. महायुतीच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच हा प्रश्न सुटला. यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने सर्व योजना बंद केल्या होत्या. या सर्व योजना सुरू करण्याचे काम महायुतीने केले, हे लक्षात ठेवा. त्यामुळे सर्वांनी महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.’’
केसरकर म्हणाले, ‘‘तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबोली, चौकुळ, गेळे वाटपाच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. नंतरच्या ठाकरे सरकारने याला स्थगिती दिली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती उठवली. महायुती सरकारने हा निर्णय घेऊन जमीन वाटपाचा निर्णय घेतला. या ठिकाणी जमिनीवर असलेली वन खात्याची नोंद पंधरा दिवसांत काढली. हे राज्यातील एकमेव उदाहरण आहे. वन खात्याची ३५ सेक्शनची नोंद तिन्ही गावांच्या सातबारांवर राहाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.’’
ते म्हणाले, ‘‘सावंतवाडी मतदारसंघाचा विकास होताना आंबोली, चौकुळ व गेळे केंद्रस्थानी असतील. पर्यटनदृष्ट्या येथे चांगले प्रकल्प राबविण्यासाठी सरकारने योजना आखली आहे.’’ पालकमंत्री चव्हाण बोलत नाहीत. मात्र, ते काम करून दाखवतात, असा विश्वास भाजपचे संदीप गावडे यांनी व्यक्त केला.
भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, अतिरिक्त जिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, प्रांत हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, गेळे सरपंच सागर ढोकरे, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, चौकुळ सरपंच सुरेश शेटये, रणजित देसाई, एकनाथ नाडकर्णी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, बबन राणे, नितीन मांजरेकर, दिनेश गावडे, ॲड. परिमल नाईक, महेश धुरी, अजय गोंदावळे, पंकज पेडणेकर, तानाजी वाडकर आदी उपस्थित होते.
चौकट
गावडेंचा पाठपुरावा महत्त्वाचा
गेळे येथील जमीन वाटपाचा प्रश्न सोडविण्यासाठी संदीप गावडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या संदर्भात अभ्यासपूर्ण माहिती गोळा करून ती प्रशासनाकडे सादर केली. प्रसंगी उपोषणासारखा मार्गही स्वीकारला. हा प्रश्न सुटण्यात त्यांचेही प्रयत्न आहेत. असे युवक गावागावांत तयार झाले पाहिजेत, असे पालकमंत्री चव्हाण म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

