

ग्रंथालयांनी निधीसाठी प्रस्ताव सादर करावेत
सचिन हजारेः अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. १७ ः महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकता यांच्या समान व असमान निधी योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन ग्रंथालय संचालक महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयांना केले आहे.
भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकता यांच्या समान व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने २०२४-२५ साठी विविध समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्यासंदर्भात नियम व अटी आणि अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरून उपलब्ध करून घ्यावा.
योजनेंतर्गत २०२४-२५ साठीच्या समान निधी योजनेमध्ये इमारत बांधकाम व विस्तार करण्यासाठी अर्थसहाय्य योजना पंचवीस लाख उपरोक्त योजनेव्यतिरिक्त समाननिधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पध्दतीने देण्यात येत असलेल्यामुळे इतर योजनांसाठीचे प्रस्ताव सादर करू नयेत. २०२४-२५ साठीच्या असमान निधी योजनेमध्ये ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यासाठी अर्थसहाय्य, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञानकोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य व विशेष अर्थ सहाय्य आधुनिकीकरण, महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, इमारत विस्तार, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा प्रशिक्षण वर्ग व जागृती कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य, बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बालकोपरा स्थापना करण्यासाठी अर्थसहाय्य या योजनेंतर्गत देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छुक ग्रंथालयांनी प्रतिष्ठानच्या संकेत स्थळावर अर्ज घेऊन आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
चौकट
३० नोव्हेंबरपर्यंत मुदत
ग्रंथालयांनी कोणत्याही एका योजनेसाठी प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रासह इंग्रजी किंवा हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास ३० नोव्हेंबरपर्यंत पोहोचतील, अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर (ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य) यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय अधिकारी हजारे यांनी जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयांना केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.