कुडाळात आजपासून ''नर्मदाआई'' महोत्सव

कुडाळात आजपासून ''नर्मदाआई'' महोत्सव
Published on: 

कुडाळात आजपासून
''नर्मदाआई'' महोत्सव
कुडाळः दरवर्षीप्रमाणे यंदाही नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त विशेष प्रदर्शन व खरेदी महोत्सव १८ ते २० आक्टोबर या कालावधीत दुपारी ३ ते रात्री ९ या वेळात महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे आयोजित केला आहे. यावर्षी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती वर्ष साजरे होत आहे. महिला सबलीकरणाचा राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी घेतलेला वसा पुढे नेत नर्मदाआई संस्था ३०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधत महिला सबलीकरणाच्या कार्यात सक्रिय असणाऱ्या व गावातील शेवटच्या महिलेला सक्षमीकरणाच्या प्रवाहात घेऊन येणाऱ्या तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या महिलांचा (एकूण ३००, दररोज १००) राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या उमेदीला भरारी देण्यासाठी बळ देण्याचा प्रयत्न नर्मदाआई संस्था करत आहे. हा तीन दिवसांचा महोत्सव नर्मदाआई संस्थेच्यावतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना आदरांजली म्हणून समर्पित करण्यात येत आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष संध्या तेरसे यांनी दिली.
...........
''नेटवर्कअभावी वेत्ये,
मळगावात गैरसोय''
सावंतवाडीः मळगाव, वेत्ये गावांत कोणत्याही प्रकारचे मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे ही समस्या तत्काळ दूर करण्यात यावी, या मागणीसाठी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी बीएसएनएल अधिकाऱ्यांकडे मागणी केली. दरम्यान, समस्या दूर करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी सरपंच गावडे यांना दिले. मळगाव, वेत्ये गावांत तरुण-तरुणी ''वर्क फ्रॉम होम'' करत आहेत. नेटवर्क नसल्यामुळे त्यांची कामे खोळंबलीआहेत. कॉल करण्यासाठीही गावात नेटवर्क नसल्यामुळे तेथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी सुनील गावडे उपस्थित होते.
..............
''तिलारी रिंग रोडच्या
समस्या त्वरित सोडवू''
दोडामार्गः गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर यांच्या घरी भेट देत चर्चा केली. तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या रिंग रोडबाबतच्या समस्या सोडविण्यात येतील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. रविवारी (ता. १३) सायंकाळी चंदगडहून येताना डॉ. सावंत यांनी निंबाळकर यांची भेट घेतली. यावेळी निंबाळकर यांनी डॉ. सावंत यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे चंदगड येथे नियोजित कार्यक्रमाला गेले होते. सायंकाळी त्यांना तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या ठिकाणी भेट द्यायची होती; मात्र उशीर झाल्याने त्यांनी निंबाळकर यांच्या घरी भेट देत चर्चा केली. तिलारी रिंग रोडबाबतच्या समस्या सोडविण्यात येतील, असे त्यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले. तिलारी आंतरराज्य प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता बुचडे, उमाजी देसाई, राजेंद्र निंबाळकर, खानयाळे सरपंच विनायक शेट्ये, सुहास देसाई, स्वनील निंबाळकर, गोपाळ गवस आदी उपस्थित होते.
...............
चित्रकला स्पर्धेस
कुडाळात प्रतिसाद
कुडाळः इनरव्हील क्लब कुडाळतर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. स्पर्धा चार गटात घेण्यात आली. पहिली ते दुसरी-तपस्या जाधव (कुंभारवाडा शाळा), अंश जिकमडे (ओरोस), मनवा वालावलकर (पडतेवाडी), उत्तेजनार्थ आदर्श पेडणेकर (पाट), नीरद वसावे. तिसरी ते चौथी-श्राव्या धुरी (इंग्लिश मीडियम स्कूल, कुडाळ), प्रेम परब (वालावल-हुमरमळा), चैतन्य धारवाडकर (पडतेवाडी शाळा), उत्तेजनार्थ वेद तेली (इंग्लिश मीडियम, कुडाळ), गार्गी तेर्से (पडतेवाडी). पाचवी ते सातवी-यश रुईकर (कुडाळ हायस्कूल), तैसीन खान (कुडाळ हायस्कूल), सर्वज्ञा गोठणकर (बॅ. नाथ पै विद्यालय, कुडाळ), उत्तेजनार्थ दुर्वा लिंगमपल्ली (कुडाळ हायस्कूल), आदित्य सावंत (डॉन बॉस्को-ओरोस), आठवी ते दहावी- वैभवी कुडाळकर (इंग्लिश मीडियम, कुडाळ), इशिका सावंत (इंग्लिश मीडियम, कुडाळ), तन्मय नेरुरकर (नेरुर), उत्तेजनार्थ आदित्य माणगावकर (साळगाव हायस्कूल) व मौलिक पाटील (इंग्लिश मीडियम, कुडाळ). परीक्षण संदीप साळसकर, आर. एल. परब व वर्षा गावडे यांनी केले. क्लबच्या अध्यक्षा संजना काणेकर व सचिव वैशाली पडते यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.