आता तलाठी नव्हे ग्राम महसूल अधिकारी

आता तलाठी नव्हे ग्राम महसूल अधिकारी
Published on: 

आता तलाठी नव्हे ग्राम महसूल अधिकारी
पदनामात बदलः अव्वल कारकुन आता सहाय्यक महसूल अधिकारी
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १७ः महसूल विभागांतर्गत काम करणाऱ्या तलाठी, कोतवाल आणि अव्वल कारकून याच्या पदनामात बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय १४ ऑक्टोबरच्या शासन निर्णयाद्वारे राज्याने घेतला आहे. त्यामुळे आता तलाठी ऐवजी ग्राम महसूल अधिकारी, कोतवाल ऐवजी महसूल सेवक आणि अव्वल कारकून ऐवजी सहाय्यक महसूल अधिकारी अशाप्रकारे नव्याने पदनामात बदल केला आहे.
महसूल खात्यांतर्गत काम करणाऱ्या तलाठ्यांना जमीन महसूल थकबाकी म्हणून सर्व रकमा जमा कराव्या लागतात. महसूल संवर्गातील तलाठी या पदनामात बदल करुन ग्राम महसूल अधिकारी असे पदनाम करण्याची मागणी तलाठी संघाने वारंवार केली होती. या मागणीनुसार शासनाने तलाठ्यांच्या पदनामात बदल करण्याचा निर्णय घेतला असून या बदलानुसार आता तलाठी ऐवजी ग्राम महसूल अधिकारी म्हणून पदनाम केले आहे.
महसूल खात्यांतर्गत काम करणाऱ्या अव्वल कारकून या संवर्गातील पदनामात बदल करण्याची मागणी सुरु होती. अव्वल कारकून या संवर्गास महसूल, मदत व पुनर्वसन, पाणीपुरवठा व स्वच्छता अशा विविध विभागांतर्गत नेमून दिलेली कामे व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. यामध्ये प्रामुख्याने जिल्हाधिकाऱ्यांना कराव्या लागणाऱ्या सर्व कामांमध्ये मुलभूत माहितीचे संकलन करुन त्यावर टिपणी सादर करावी लागते. विविध मसुदे तयार करणे, महसूल विभागातील जमीन, महसूल विभागांचे दस्तऐवज, लेखी नोंदी एकत्रीकरण व अद्यावतीकरण करणे, शासनातर्फे नागरिकांना देण्यात येणारे विविध दाखले, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलेली प्रमाणपत्रे तयार करुन द्यावी लागतात. त्यामुळे महसूल विभागातील अव्वल कारकून संवर्गास एक विशिष्ट पदनाम असणे आवश्यक होते. याकारिता महसूल विभागातील अव्वल कारकुन पदाचे पदनाम बदलून त्यांना सहाय्यक महसूल अधिकारी पदनाम करण्याबाबतची मागणी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेमार्फत अनेक वर्षे होत होती. ही मागणी शासनाने आता मान्य केली असून महसूल विभागांतर्गत काम करणाऱ्या अव्वल कारकुनांचे पदनाम बदलून आता सहाय्यक महसूल अधिकारी असे पदनाम केले आहे.

चौकट
कोतवालाचा झाला महसूल सेवक
महसूल खात्यांतर्गतच तलाठी कार्यालयात काम करणारे कोतवाल हे पद ब्रिटीश काळापासून आहे. त्यात अद्यापपर्यंत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे कोतवाल या पदाच्या नावातही बदल करण्यात यावा, अशी मागणी कोतवाल संघटनेकडून वारंवार केली होती. त्यानुसार शासनाने आता कोतवाल या नावाच्या पदनामात बदल केला असून आता कोतवाल ऐवजी महसूल सेवक म्हणून पदनामात बदल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.