

विधानसभेसाठी एकदिलाने काम करूया
चिपळुणात मविआची बैठक; लोकसभेतील चुका टाळण्यावर भर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ ः चिपळूण मतदार संघात उमेदवारी कोणाचीही जाहीर झाली तरीही एकदिलाने काम करण्याचा निर्धार महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत करण्यात आला तसेच लोकसभेपेक्षा जास्तीचे मताधिक्य कसे मिळवता येईल यावर भर देण्याचे ठरवण्यात आले.
चिपळूण शहरातील एका बँकेच्या सभागृहात महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस आदीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. चिपळूण विधानसभा मतदार संघात महाविकास किंवा महायुतीकडून कोणाचीही उमेदवारी जाहीर झालेली नाही. महाविकास आघाडीत ज्यांची उमेदवारी जाहीर होईल त्यांचे निष्ठेने आणि एकदिलाने निवडणुकीचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. चिपळूण विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना सुमारे २० हजाराचे मताधिक्य मिळाले होते. यापेक्षाही अधिक मताधिक्य घेण्याचा निर्धार करण्यात आला. औपचारिक चर्चा करण्यासाठी ही बैठक होती, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा एकोपा राहावा यासाठी प्रमुख पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या दूर करून मोठे मताधिक्य घेण्याचे ठरवण्यात आले. शहरासह ग्रामीण भागात गावोगावी राबवावी लागणारी प्रचारयंत्रणा, तेथे आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे योगदान यावरही चर्चा करण्यात आली.
------
कोट
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची ही बैठक झाली. या बैठकीत एकदिलाने निवडणूकीचे काम करण्याचे ठरले. यापुढील काळात सातत्याने आघाडीतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत राहतील.
- मुराद अडरेकर, तालुकाध्यक्ष, शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.