

19548
आमदार नाईकांमुळेच नगरोत्थान निधी
कुडाळात नगरसेवकांचा दावाः निलेश राणेंनी फुकटचे श्रेय घेऊ नये
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ः येथील नगरपंचायतीला नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेला चार कोटींचा निधी शासनाच्या माध्यमातून आलेला आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी त्याचे फुकटचे श्रेय घेऊ नये. आमदार वैभव नाईक यांच्या मेहनतीने तो मंजूर झाला असून याचे श्रेय नाईक यांचेच आहे. भाजपाने आतापर्यंत विकासकामांना खो घालण्याचे आणि शासनाकडून आलेल्या निधीचे फुकटचे श्रेय घेण्याचेच काम केले आहे, अशी टीका येथील नगरपंचायतीच्या सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी केली.
येथील ठाकरे शिवसेना शाखेत आज नगरपंचायतील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी नगराध्यक्षा अक्षता खटावकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक मंदार शिरसाट, उदय मांजरेकर, संतोष शिरसाट, नगरसेविका श्रेया गवंडे, सई काळप, श्रुती वर्दम, ज्योती जळवी, सचिन काळप, संदीप म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.
नगराध्यक्षा खटावकर यांनी, कुडाळ नगरपंचायतीला शहर विकासासाठी दरवर्षी शासनाच्या माध्यमातून नगरोत्थान योजनेअंतर्गत निधी येतो. त्यामुळे याचे फुकटचे श्रेय भाजपाने घेऊ नये, असे सांगितले. उपनगराध्यक्ष शिंदे म्हणाले, "निलेश राणे याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. जर निधी आणला म्हणत असतील तर शहरातील मुख्य कचरा प्रश्नी ते गप्प का ? शहरातील जटील बनलेला कचरा प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडी पाठपुरावा करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे एमआयडीसीतील जागेची मागणी केली आहे. पालकमंत्र्यांचीही भेट घेऊन लक्ष वेधले आहे. मात्र, अद्याप याबाबत शासनाकडून कार्यवाही झालेली नाही. सुसज्ज मच्छीमार्केट इमारतीसाठी निधी उपलब्ध आहे. परंतु, अद्याप शासनाने नगरपंचायतीकडे जागा हस्तांतरित केलेली नाही. कुडाळ शहराचा विकास भाजप सरकार अडवून ठेवण्याचे काम करत आहे."
मंदार शिरसाट म्हणाले, "येथील नगरपंचायतीत महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात शहर विकासासाठी भरघोस विकास निधी आला. परंतु, शिंदे-फडणवीस सरकार येताच शहरातील तीन कोटींच्या विकासकामांना ब्रेक देण्यात आला. सत्ताधारी महाविकास आघाडीने केलेल्या पाठपुराव्याने तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, माजी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शहराच्या विकासासाठी निधी आला. या कामांनाही शिंदे-फडणवीस सरकारने ब्रेक दिला. आता शासनाच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत चार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यात राणे यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये. या निधीचे सर्व श्रेय नाईक यांच्या मेहनतीचे आहे. राणे यांना निधी द्यायचा होता तर विविध हेडमधून ते निधी आणू शकले असते. कचरा प्रकल्पासाठी एमआयडीसी येथील जागा मिळण्यासाठी नगरपंचायतीने पैसे भरूनही शासनाकडून जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे राणेंनी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. आमदार नाईक यांच्या माध्यमातून मिळालेल्या अग्निशमन बंब गाडीला कोणी विरोध केला होता हे जनतेला माहीत आहे. माजी खासदार राऊत व आमदार नाईक यांच्या माध्यमातून शहरात गार्डन झाले. सतराही प्रभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. त्यामुळे जनतेचा कौल महाविकास आघाडी व आमदार नाईक यांच्याच बाजूने आहे. दोन महिन्यांत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल. त्यानंतर शहरातील नाना नानी पार्क, मच्छीमार्केट इमारत, कचरा प्रकल्प, नरपंचायतीची सुसज्ज इमारत तसेच सतराही प्रभागातील विकासकामे मार्गी लावली जातील. येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार नाईक यांना मोठ्या मतांनी विजयी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत." राणे निधीचे फुकटचे श्रेय घेऊन कुडाळवासियांची दिशाभूल करत असल्याचे संतोष शिरसाट यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.