

पाय घसरून विहिरीत पडून
निरुखेतील एकाचा मृत्यू
सावंतवाडी, ता. १७ : पाय घसरून विहिरीत पडल्यामुळे कोलगाव-निरुखे येथील तरुणाचा मृत्यू झाला. नारायण ऊर्फ प्रसाद व्यंकोजी राऊळ (वय ४२) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.
प्रसाद राऊळ हा तरुण बुधवारी (ता. १६) सायंकाळी उशिरा घराबाहेर पडला होता. मात्र, उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने शोधाशोध सुरू झाली. आज सकाळी घरापासून काही अंतरावर असलेल्या कठडा नसलेल्या विहिरीत त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. या घटनेची माहिती या तरुणाचे काका आनंद नारायण राऊळ यांनी सावंतवाडी पोलिसात देताच सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, उपनिरीक्षक माधुरी मुळीक, पोलिस हवालदार अनिल धुरी, संतोष गेलोले यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह वर काढून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात देण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर दुपारी कोलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रसाद यांचा मृत्यू हा पाण्यात बुडून झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट केल्याने आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील, भाऊ, बहिणी, काका, काकी असा परिवार आहे.
-------------------
‘त्या’ अनोळखी संशयितांवर
आचरा पोलिसांत गुन्हा
आचरा, ता. १७ : येथील बाजारपेठेतील साईप्रसाद ज्वेलर्स दुकानातून १७ ग्रॅम सोन्याच्या वस्तूंवर डल्ला मारून पळ काढणाऱ्या दोघा संशयितांवर येथील पोलिसात बुधवारी (ता.१७) रात्री चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दागिने चोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ठसे तज्ज्ञ पथकाला पाचारण केले होते. गुन्ह्यात वापरलेली दुचाकीची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती आचरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी दिली.
आचरा बाजारपेठ येथील अरुण गणेश कारेकर यांच्या साईप्रसाद ज्वेलर्स दुकानात बुधवारी सायंकाळी दोन व्यक्ती दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आले होते. सुवर्णकार वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने दाखवत असताना त्यांनी हातचलाखी करत सुमारे १ लाख २६ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. काहीवेळाने कारेकर यांच्या चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आल्यावर संशयितांची शोधाशोध करून पोलिसांना माहिती देण्यात आली. ते दोघे दुचाकीवरून आले होते. त्यांनी या गुन्ह्यात दुचाकी वापरल्याचे सीसीटीव्हीत कैद झाली असून, त्यांनी मालवणच्या दिशेने पळ काढल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांच्याकडून बाजारपेठेतील एका किराणा दुकानातून काही वस्तू खरेदी करण्याचा बहाणा करताना संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या. त्यावेळी त्यांना रोखले गेले असते तर चोरीची घटना टाळता आली असती. यापुढे संशयास्पद हालचाल, आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास किंवा चोरी, अपघात, हल्ले यासारखे प्रकार घडल्यास पोलिस प्रशासनाच्या ११२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोवार यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.