रत्नागिरी-सदर

रत्नागिरी-सदर

Published on

अशी लाल माती, अशी हीच रत्ने----लोगो
(२ नोव्हेंबर टुडे ३)
फोटो ओळी
rat16p3.jpg
25558
प्रकाश देशपांडे

इंट्रो

मुंबईतले महात्मा फुले मार्केट प्रसिद्ध आहे. आज जरी हे फुले मार्केट म्हणून ओळखले जात असले, तरी पूर्वी या मार्केटचे नाव होते क्रॉफर्ड मार्केट! मुंबईचा पहिला महापालिका आयुक्त सर आर्थर क्रॉफर्ड याच्या नावाने हे मार्केट उभे राहिले. उत्तम प्रशासक असलेला आर्थर क्रॉफर्ड याचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्याला मोडी लिपीही अवगत होती. साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण केळकर यांनी या क्रॉफर्डचे वर्णन करताना लिहिलंय, ‘हा जर धोतर नेसला असता, तर नक्कीच चित्पावन ब्राह्मण म्हणून दिसला असता!’ कोकणातल्या आख्यायिका क्रॉफर्डने ‘लेजेंडस् ऑफ कोंकण’ या नावाने ग्रंथबद्ध केल्या. अशा या आर्थर क्रॉफर्डला कोकणातल्या एका वकिलाने आपल्या बुद्धिचातुर्याने चांगलाच झटका दिला होता. ते वकील होते, वासुदेव हरी ऊर्फ वासूकाका आठल्ये!
- प्रकाश देशपांडे, चिपळूण

-----
वासुदेव हरी तथा वासुकाका आठल्ये, वकील

वासुकाका आठल्ये यांचा जन्म ७ डिसेंबर १८२२ ला झाला. लांजा तालुक्यातल्या शिपोशी गावचे हे इनामदार. यांचे वडील हरिराम आठल्ये. वासुकाका अल्पवयीन असतानाच त्यांचे पितृछत्र हरपल्याने त्यांच्या काकांनी त्यांना सांभाळले. काका वेदशास्त्रसंपन्न होते. त्यामुळे घरीच वेदाध्ययन व संहिता पाठ झाले. वासुकाकांचे चुलतबंधू रामकृष्णशास्त्री हे मुन्सफ म्हणून राजापूरला होते. रामकृष्णशास्त्री यांनी आपल्या चुलत बंधूंनाही आपल्याबरोबर राजापूरला आणले. इथे काव्य, ज्योतिष, लीलावती यांचा अभ्यास करून वासुकाका बहुश्रुत झाले. त्या काळी मुन्सफांना कर्मचारी नेमण्याचा अधिकार असे. वयाच्या सोळाव्या वर्षी वासुकाकांची शिरस्तेदार म्हणून नेमणूक झाली. त्यांनी कायद्याचा अभ्यास सुरू केला. कायद्याची पुस्तके मोडी लिपीत लिहून काढली आणि १८५० ला वासुदेव हरिराम तथा वासुकाका आठल्ये वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले.
१८५४ ला वासुकाकांनी रत्नागिरीत वकिली सुरू केली. याच काळात आर्थर क्रॉफर्ड रत्नागिरीत जिल्हाधिकारी होता. मोहरमच्या दिवसात क्रॉफर्ड राजापूरला गेला होता. मशिदीजवळच तो तंबू ठोकून राहत होता. रात्री मोहरम सण असल्यामुळे मुस्लिम समाजातले लोक एकत्र येऊन वाद्य वाजवू लागले. साहेबांची झोपमोड झाली. त्याने नोकर पाठवून वाद्य बंद करायचा आदेश दिला. ‘आमचा मोहरमचा सण असल्यामुळे आम्ही वाद्ये बंद करणार नाही,’ असे लोकांनी सांगितले. नोकरांनी हा निरोप क्रॉफर्डला सांगताच त्याला राग आला आणि क्रॉफर्ड चाबूक घेऊन आला. त्याने चाबकाचे तडाखे देताच लोक क्रॉफर्डवर चालून गेले, हाणामारी झाली. त्यात क्रॉफर्डच्या दातांना दुखापत झाली. भडकलेला क्रॉफर्ड तंबूत जाऊन बंदूक घेऊन आला. तोपर्यंत जमाव पांगला होता.
दुसऱ्या दिवशी क्रॉफर्डने मामलेदार व फौजदार बोलावले. बेकायदेशीर जमाव आणि दंगा करणारे म्हणून राजापुरातील प्रतिष्ठित मुस्लिम लोकांना पकडले. खटला चालला आणि केस सेशनकमिट होऊन रत्नागिरीच्या न्यायालयात गेली.
मुस्लिम कार्यकर्ते रत्नागिरीला आले आणि त्यांनी वासुकाका आठल्ये यांना वकील म्हणून काम करण्याची विनंती केली. न्यायालयात केस उभी राहिली. वासुकाकांनी साक्षीदार म्हणून ऑर्थर क्रॉफर्ड याला बोलावले. जिल्हाधिकारी क्रॉफर्डला साक्षीदार म्हणून यायला सांगितले कसे, असा प्रश्न न्यायाधीशांना पडला; मात्र आठल्ये वकिलांनी आग्रहाने मागणी केल्यामुळे क्रॉफर्डला यावे लागले. वकिलांनी बायबलवर हात ठेवून शपथ घ्यायला सांगताच क्रॉफर्डने रागाने नकार दिला. वकील वासुकाकांनी ताडकन ‘आपण इथे जिल्हाधिकारी म्हणून नव्हे, तर साक्षीदार म्हणून आलेले आहात. त्यामुळे शपथ घ्यावी लागेल,’ असे सांगितले. अखेर क्रॉफर्डने शपथ घेतली आणि वकिलांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
‘तुम्ही राजापूरला आला तेव्हा ताबूताचा सण होता, हे ठाऊक होते का?’ ‘तुमचा तंबू मशिदीपासून किती अंतरावर होता?’ आपण जिल्हाधिकारी असून, असले प्रश्न विचारले जात आहेत म्हणून क्रॉफर्ड रागावला आणि म्हणाला, ‘या प्रश्नांची उत्तरे मी देणार नाही.’ न्यायाधीशांना क्रॉफर्डला उत्तरे द्या, असे सांगणे कठीण वाटले. क्रॉफर्ड उत्तर देत नाही, हे पाहून वकील वासुकाका आठल्ये यांनी आपल्या मुस्लिम पक्षकारांना सांगितले, ‘साक्षीदार उत्तर देत नाही, त्यामुळे मी तुमची केस सोडतोय. तुम्हाला जी काही शिक्षा व्हायची ती होऊ दे. मी हायकोर्टात जाऊन तुम्हाला न्याय मिळवून देईन.’
वकिलांचा हा निर्धार पाहून न्यायाधीशांनी क्रॉफर्डला उत्तरे द्या, असा आदेश दिला आणि शेवटी या खटल्यातून सर्व मुस्लिम पक्षकार निर्दोष सुटले.
क्रॉफर्डला याचा राग आला; पण वकील वासुकाका क्रॉफर्डला भेटले आणि त्यांनी ‘मी वकील असल्याने पक्षकारांची बाजू मांडणे हे माझे कर्तव्य होते. हा संघर्ष पक्षकारांचा वकील आणि क्रॉफर्ड असा होता, त्यात वासुकाका आठल्ये यांचा वैयक्तिक संबंध नाही’, हे सांगितले आणि क्रॉफर्डचाही राग दूर झाला. वासुकाका पुढे काही काळ सरकारी वकीलही होते.
वासुकाकांनी रत्नागिरीत झाडगाव भागात मोठे घर बांधले होते. त्यांच्या घरी राहून शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी असायचे. त्यातले अनेकजण थोडेफार काम करून जेवायला असायचे. नित्यपंक्तीला, सणावाराला सगळे विद्यार्थी आणि पाच-दहा लोक पंक्तीला असायचेच. रत्नागिरीच्या अनेक संस्थांच्या कामात त्यांचा सहभाग असायचा. रत्नागिरीची वेदपाठशाळा स्थापन करण्यात त्यांचा पुढाकार होता. ते हयात होते तोपर्यंत प्रतिवर्षी वैशाख शु. पौर्णिमेला आद्य शंकराचार्यांची पुण्यतिथी साजरी करत असत. वासुकाका आणि मुंबईचे नामांकित वकील विश्वनाथ नारायण मंडलिक यांचा घनिष्ट परिचय होता. १८५२ ला त्यांनी ‘नीतिप्रबंध’ हा ग्रंथ लिहिला. महत्त्वाचे म्हणजे, वासुकाकांचे कनिष्ठ बंधू जनार्दन हरी आठल्ये यांनी रत्नागिरी येथे १८५३ ला ‘जगन्मित्र’ साप्ताहिक सुरू केले होते.
वासुकाकांचे चिरंजीव यशवंत तथा बापूसाहेब हे बडोदा संस्थानचे नायब दिवाण होते. विशेष म्हणजे या बापूसाहेब आठल्ये यांच्या ओळखीनेच रियासतकार सरदेसाई हे सयाजीराव गायकवाड यांच्या दरबारी दाखल झाले होते. रियासतकारांनी वासुकाकांवर सविस्तर लेख लिहून त्यांना आदरांजली अर्पण केली होती. असे उत्तम विद्वान, विवेकी वासुदेव हरी तथा वासुकाका आठल्ये वकील यांचे वयाच्या ६९व्या वर्षी २६ जानेवारी १८९१ ला निधन झाले.

(लेखक इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि साहित्यिक आहेत.)
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com