विधानसभा जिंकायची, पक्षही वाढवायचा
विधानसभा जिंकायची, पक्षही वाढवायचा
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा दुहेरी उद्देश; दोन राष्ट्रवादी समोरासमोर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ : मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची मते फुटली आणि राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला होता. ती फुटलेली मते जाग्यावर आणून पुन्हा पक्ष बांधण्याचे काम या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेकडून सुरू झाले आहे. शरद पवार यांचा उमेदवार निवडून आणायचा आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करायची, असे दुहेरी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत.
मागील दोन विधानसभा निवडणुकीत दोन विरोधी पक्षांमध्ये ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळाली होती. मात्र यावेळच्या निवडणुकीत स्वकीयांचा स्वकीयांशीच सामना सुरू आहे. एकेकाळी राष्ट्रवादी व काँग्रेस अशा मित्रपक्षात कार्यरत असलेले कार्यकर्ते व पदाधिकारी या निवडणुकीच्या निमित्ताने आमने-सामने उभे राहिले आहेत. त्यात मित्रपक्षाची भूमिका तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. महायुतीचे उमेदवार व महाविकास आघाडीचे उमेदवार सौम्य व वैचारिक स्वरूपाची लढाई लढताना दिसत आहेत. प्रत्येक निवडणुकीत चिपळूण राजकीयदृष्ट्या जिल्ह्यात अतिशय संवेदनशील मानले जाते. याआधी माजी आमदार रमेश कदम व आमदार भास्कर जाधव यांच्यातील राजकीय चढाओढीतून चिपळूण नेहमीच चर्चेत राहिले. त्यानंतर माजी आमदार सदानंद चव्हाण व आमदार शेखर निकम यांच्यातील लढतही राजकीयदृष्ट्या अटीतटीची ठरली होती. मात्र आताची निवडणूक ही काँग्रेसच्या वैचारिक बैठकीत घडलेल्या आमदार शेखर निकम व प्रशांत यादव यांच्यात थेट लढत होत आहे.
महायुतीचे निकम व महाविकास आघाडीचे यादव यांच्यातील ही लढत अजून तरी सौम्य व वैचारिक स्वरूपाची वाटत आहे. हे दोन्ही उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी विकासकामात कोण सरस हे दाखवण्याचे काम करत आहेत. आमदार शेखर निकम यांची ही तिसरी निवडणूक आहे, तर प्रशांत यादव हे प्रथमच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. तरीही निवडणुकीत रंगत अधिक आहे. प्रशांत यादव यांची मदार शिवसेनेवर अवलंबून आहे. निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार उभा असला तरी पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न शिवसेनेचे पदाधिकारी करीत आहेत. मागील निवडणुकीत शेखर निकम यांना एक लाख एक हजार मते मिळाली होती. शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांना एकाहत्तर हजार मते मिळाली होती. विधानसभेपूर्वी झालेल्या लोकसभेत शिवसेनेच्या उमेदवाराला ६० हजाराचे मताधिक्य होते. म्हणजेच विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे मतदार फुटले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय झाला होता. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या सेनेकडून मागील निवडणुकीत फुटलेली मते पुन्हा पक्षाकडे आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
---------
दृष्टिक्षेपात
- पाच वर्षांतील विकासकामे ही शेखर निकम यांचे बलस्थान
- ‘वाशिष्ठी मिल्क’च्या माध्यमातून शेतकऱ्यांशी असलेला संपर्क हे प्रशांत यादव यांचं बलस्थान
- शरद पवार यांचा पक्ष सोडणे हे शेखर निकम यांच्यासाठी तर विधानसभेतील नवखेपण प्रशांत यादव यांच्यासाठी परीक्षा पाहणारे
.............
कोट
आम्ही शिवसेनेच्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचत आहोत. आम्हाला प्रथम विधानसभा जिंकायची आहे. त्यात यशस्वी झालो तरच कार्यकर्त्यांना पुढचे दिवस चांगले येतील. त्यासाठी मनापासून काम सुरू आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि मतदार पुन्हा जागेवर येतील याचा विश्वास आहे.
--शशिकांत मोदी, शहरप्रमुख, शिवसेना, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

