कोकणातील संपन्न पक्षीवैभव
50991
25773
25774
25775
25776
25777
25778
25779
25765
rat17p4.jpg-
इंट्रो
सह्याद्री पर्वताची शिखरे आणि अरबी समुद्राच्या लाटांनी वेढलेला भूप्रदेश म्हणजेच कोकण. पावसाळ्यात सह्याद्रीच्या खोऱ्यात उगम पावणाऱ्या नद्या भरून वाहू लागतात. याच सह्याद्रीच्या खोऱ्यात सदाहरित, निमसदाहरित, पानगळी आणि शुष्क अशी वनराई दिसू लागते. कोकणाला हिरवेगार गालिच्यांचे रूप प्राप्त होते. सडे, वाळूचे किनारे आणि विस्तीर्ण गवताळ मैदानेही आहेत. निसर्गाने नटलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातले पक्षी जीवनही संपन्न असल्याने येथील पक्षी वैभव जैवविविधतेचा अप्रतिम नमुना आहे. पक्षी निरीक्षणासाठी परदेशी पर्यटक आणि निरीक्षक कोकणात येतात. येथील पक्षी वैभवाचा उपयोग करून अनेकानी पर्यटन व्यवसाय सुरू केला आहे. कृषी पर्यटनाला याची उत्तम जोड मिळाली असून यातून निसर्ग जोपासना आणि निसर्ग संवर्धनही केले जाते.पक्षांचा अभ्यास करणारी आणि त्यायोगे निसर्गाविषयी जागृती वाढत आहे. नष्ट होत चाललेल्या प्रजातीविषयी जाणीव वाढते आहे.जंगलांची वाढ होण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या धनेश पक्षाच्या संवर्धनासाठी चळवळ सुरू करण्यात आली असून याला संघटनात्मक रूप देण्यात आले आहे. निसर्ग राहिला तर पक्षी राहतील आणि पक्षी राहिले, वाढले की निसर्ग राखण्यात मदत होईल असे हे चक्र आहे. ते चालू राहण्यासाठी पक्षीवैभवाचे महत्व कळले पाहिजे ते जोपासले पाहिजे.
- राजेश कळंबटे, रत्नागिरी
----------
कोकणातील संपन्न पक्षीवैभव
निसर्गसाखळी राखतेय ; अभ्यास, निरीक्षणे, नोंदींची जाणीव वाढतेय
--------
देवराईंमधून होते पक्ष्यांचे संवर्धन
कोकणातील प्रत्येक गावात एक ग्रामदैवत वसलेले आढळते. पूर्वजांनी ही देवळे वसवताना देवराई उभारल्या आणि अनेक दुर्मिळ वनस्पती आणि वृक्षांना त्यात स्थान दिले. शेकडो वर्षे जुन्या देवराई आज संपूर्ण जिल्ह्यात विकासाचे घाव सोसत उभ्या आहेत. टिकून राहिलेले पुरातन वृक्ष ग्रेट हॉर्नबिलसारख्या पक्ष्याचे शेवटचे आश्रयस्थान बनले आहेत. जंगलचे शेतकरी म्हणून ओळखले जाणारे हे विहंग शिंगासारखी चोच आणि पंखांचा लांबवरून येणारा आवाज याने सहज ओळखता येतात. मुख्यतः फलाहारी असणारे हॉर्नबिल बीजप्रसाराचे कार्य करत या रायांच्या सीमा वाढवतात. इंडियन ग्रे, मलबार पाईड आणि मलबार ग्रे हे हॉर्नबिलसुद्धा जिल्ह्यात आढळतात. देवराईमधील बेहडा वृक्ष अनेक ढोल्यांनी युक्त असतात. याच ढोल्या पोपट, पिंगळा, मैना यांची आश्रयस्थाने आहेत तर तांबट, सुतारपक्षी या झाडांची पोखरण करून गुजारा करतात. तर हळद्या, बुलबूल, सातभाई, दयाळ, सुभग, चीरक, चिमण्या, मुनिया झुडपी आणि विरळ झाडीत दिसून येतात.
-----
पावसाळ्यात सड्यांवर वाढतो राबता
विस्तीर्ण माळराने आणि कातळाचे सडे हे कोकणचे वैशिष्ट्य आहे. पावसाळी फुलोऱ्याने बहरणारे इथले जीवन पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. पावसाचे पाणी भेगा, तळी त्यात साठून डबकी बनवते आणि याच डबक्यात बेडके, कीटक उभयचर यांचे जीवनक्रम सुरू होतात. त्यामुळे खाद्याची प्रचंड उपलब्धता झाल्यामुळे बगळे, वंचक, पाणकावळे, करकोचे, शराटी असे पक्षी पाणथळ भागात मिळतात तर खंड्या, घारी, गरूड, ससाणे, हारियर असे शिकारी पक्षीही दिसून येतात. राष्ट्रीय पक्षी मोराचे नृत्य हे तर या सड्यांचे वैभव तसेच समुद्री भागात प्लोवर, टिटवी, ल्हावे, तुत्वार, धोबी दिसून येतात. रत्नागिरी जिल्ह्यातील जंगल भागांमध्ये अनेक ठिकाणी मोराचे वास्तव्य आहे.
------
ऋतुमानानुसार येणारे स्थलांतरित पक्षी
हिवाळा सुरू झाला की, अनेक स्थलांतरित पक्षी समुद्रकाठी दिसू लागतात. समुद्रात उठणारी वादळे अनेक वेळेला बुबीसारखे पक्षीसुद्धा किनाऱ्यावर आणून सोडतात. समुद्र किनाऱ्यांवरील सुरूच्या बनांमध्ये पांढऱ्या पोटाचा समुद्री गरूडाचा वावर असतोच. हे सागरी गरूड रत्नागिरीच्या किनाऱ्याची शान आहे. किनारी भागातील उंच झाडांवर ते घरटी बांधतात. हिवाळ्याची चाहूल लागली की दरवर्षी वेगवेगळे सिगल पक्षी किनारी दाखल होतात. यंदा त्यांचे आगमन लांबल्याचे दिसते. त्याचबरोबर सप्तरंगी इंद्रधनूचे रंग असलेला तिबोटी खंड्याची ओळख कोकणचा पक्षी म्हणूनच झाली आहे. पावसाळ्यात घरटी बांधण्यासाठी सर्वत्र पसरणारा हा खंड्या विलक्षणीय आहे. खाडीकिनारी आढळणारे ब्लॅक capped आणि stork billed हे सुद्धा ठराविक भागात अस्तित्व टिकवून आहेत. पाणथळ जागी वेगवेगळी बदकेसुद्धा दिवसेंदिवस वाढतच आहेत. पाणकोंबडी, कमळ पक्षी, वारकरी, चक्रवाक, चक्रांग, चापट्या शेंडीवाले बदकसुद्धा दिसून आली आहेत. केरळ आणि दक्षिणेकडून पावसाळ्यात घरटी बांधण्यासाठी येणारा नवरंगही प्रसिद्ध आहे. सह्याद्रीची जंगले मात्र जैवविविधतेचे हॉटस्पॉट ठरली आहेत. रानकोंबडे, निलगिरी वूड पिजन, स्वर्गीय नर्तक, व्हर्डीटरसारखे माशिमार, हरोळी, कस्तूर असे अनेकविध पक्षी जंगलाचे वैभव आहेत, असे पक्षी अभ्यासक प्रतीक मोरे यांना आवर्जून सांगितले.
-------
पक्षी स्थलांतर रोखण्याचे आव्हान
कोकणची शान असलेल्या पक्षांचा अधिवास सध्या चिंतेचा विषय बनलेला आहे. विकासाच्या संकल्पनेमुळे पक्षी जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याचे संशोधनातून पुढे आलेले आहे. वाढते नागरीकरण, दळणवळणाची साधने वाढल्यानेही पक्षी जीवनावर परिणाम होत आहे. शहरी भागातही चिमणी, कावळे, सुगरण, कबुतरे, पोपट असे पक्षीजीवन विपूल आहे; परंतु स्वच्छतेचे निकष बदलले तसे कचरासुद्धा वाढला आणि डम्पिंग ग्राउंडच्या ठिकाणी घारी दिसून येतात. एकेकाळी जिल्ह्यात गिधाडे अधिक प्रमाणात दिसत होती. परंतु स्वच्छतेचे बदललेले निकष, मेलेल्या गुरांचे अवशेष दफन करणे अशा पद्धतीने गिधाडांची संख्या घटली. जंगलतोड, शेतीपद्धतीत होणारे बदल त्यामुळे परिणाम होत आहे. घरटी बांधण्यासाठी मोठमोठ्या वृक्षांची कमतरता हे प्रजातींची संख्या घटण्याचे मोठे कारण ठरत आहे. मुंबई-गोवा, मिऱ्या-नागपूर यासारखे महामार्ग उभारण्यासाठी झालेली वृक्ष तोड चिंता वाढवणारी आहे. वर्षानुवर्षे उभे असलेले भलेमोठे वृक्ष तोडल्याने पक्ष्यांचे स्थलांतर झाले असून खाद्याचा गहन प्रश्न पक्ष्यांपुढे निर्माण झालेला आहे. हवामानातील बदल, वादळाची वाढणारी संख्या आणि अनियमित पाऊस स्थलांतरावर परिणामाकरत ठरत आहे. अतिपावसाने अनेकवेळा घरटी आणि झाडे तुटण्याच्या घटनाही गेल्या काही वर्षात घडलेल्या आहेत. त्यामुळे पक्षी स्थलांतराचे संकट कोकणापुढे आहे.
--------
बदलत्या शेतीतंत्राचाही परिणाम
शेतीची बदलती तंत्रे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा पक्ष्यांना घातक ठरत आहे. कीटकनाशके आणि रसायनाचा वापर विषारी ठरतोच; पण पर्यावरणीय समतोल ढासळण्याससुद्धा कारणीभूत ठरतो. बदललेली पिकपद्धती अनेकवेळा अजाणतेपणी पक्ष्यांची संख्या घटवू शकते. फळबागांचे वाढते प्रमाण आंबा-काजू लागवड ही वनक्षेत्र आणि जंगली फळे देणारी झाडे कमी करण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे यांचा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करून परसबाग लागवडीस प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
-------
पक्षी बचावसाठी मोहिमांची गरज
गेल्या काही वर्षात जिल्ह्यात पक्षी निरीक्षक आणि फोटोग्राफरची संख्या वाढत आहे. सोशल मीडियावर फोटो आणि नवनवीन पक्ष्यांच्या नोंदी सहजतेने मिळतात. त्याचबरोबर सीटिझन सायन्ससारखे उपक्रम वन्यप्रेमींनी हाती घेऊन शास्त्रीय अभ्यासाला हातभार लावणेही तितकेच महत्वाचे आहे. पक्षी बचाव मोहिमेसाठी अनेक लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी काही संस्था आणि शासन पुढाकार घेत आहे. महावृक्ष दत्तक घेणे, जंगल दत्तक घेणे असे कार्यक्रम राबवणेही सहजशक्य आहे. एकंदरीत शहरीकरणामुळे चिमणीसारख्या सर्व व्यापी पक्ष्याची संख्या घटलेली दिसते. एकेकाळी सगळ्यांच्या अंगणात असणारा हा पक्षी आता खूप कमी ठिकाणी दिसून येतो. खाद्याच्या उपलब्धतेच्या प्रमाणात शहरी आणि ग्रामीण भागात पक्ष्यांच्या प्रजाती विभागलेल्या दिसून येतात.
-------
(टीप- या चौकटीला खंड्यांचा फोटो घ्यावा.)
खंड्यावरील संशोधनाने महत्व अधोरेखित
चिपळूणमधील पक्षी अभ्यासकांनी सामान्य खंड्या म्हणजेच ‘कॉमन किंगफिशर’ या पक्ष्याच्या घरट्यांचे निरीक्षण करून त्याच्या विणीसंदर्भातील संशोधन निबंध प्रकाशित केला गेला. सामान्य खंड्याच्या विणीविषयीचा हा भारतामधील पहिलाच अभ्यास असून, या माध्यमातून प्रथमच देशातील सामान्य खंड्याच्या विणीच्या यशाचा दर ७९ टक्के नोंदवण्यात आला आहे. या पक्ष्याचा प्रजनन हंगाम, अंड्यांची संख्या, अंडी उबवण्याचा काळ या संदर्भातील महत्वपूर्ण निरीक्षणेदेखील नोंदवण्यात आली आहेत. महाराष्ट्रात सात प्रजातींचे खंड्या पक्षी आढळतात. त्यापैकी सामान्य खंड्या या पक्ष्याच्या अधिवासाचा विस्तार जगभरातील मोठ्या भूभागामध्ये आहे. या पक्ष्याच्या जगभरात सात उपप्रजाती आढळतात. त्यापैकी तीन या भारतात आढळतात. गोदावरी नदीच्या दक्षिणेपासून खालच्या भूप्रदेशात आढळणार्या उपप्रजातीला ‘A. a. bengalensis’ म्हणून ओळखले जाते. या उपप्रजातीच्या विणीचे सखोल संशोधन चिपळूणचे पक्षीअभ्यासक सचिन पालकर आणि प्रणव गोखले यांनी केले आहे. २००४ ते २०२३ या २० वर्षांच्या काळात २६ घरट्यांचे निरीक्षण करून त्यांनी हा संशोधननिबंधही प्रकाशित केला आहे. ‘जर्नल ऑफ साऊथ एशियन ऑर्निथोलॉजी’च्या ‘इंडियन बर्ड’च्या २०व्या अंकात हे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी केलेल्या निरीक्षणातून खंड्याचे अस्तित्व जपण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे.
----------
पक्षी निरीक्षणातून पर्यटन व्यवसाय
गुहागर आबलोली येथे सचिन कारेकर यांनी गारवा कृषी पर्यटन केंद्र सुरू केले. पहिल्या वर्षी फक्त दहा पर्यटक आले. त्यानंतर एकदा जाहिरात वाचून पुण्यातून रमेश अरगुळकर यांचा फोन आला. त्यांनी पक्षी किती दिसतात, असे विचारले. तेव्हा त्यांना अंदाजे ५० पक्षी दिसत असल्याचे सांगितले. ते गावी आले आणि त्यांनी गावात पाहणी केली असततेव्हा १०० विविध प्रकारचे पक्षी आढळले. त्या पक्ष्यांची पुस्तकातून ओळख करून घेतली. सध्या गावात २०० प्रकारचे पक्षी आढळत असल्याचे निदर्शनास आले. खंड्या पक्षी आपल्याकडे दिसतात. त्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण केले. पक्षी निरीक्षण हे असंख्य पर्यटकांना चांगले व्यसन आहे. आज देश-विदेशातून पक्षी निरीक्षणासाठी, फोटो काढण्यासाठी पर्यटक येतात. सध्या पर्यटक राहण्यासाठी आरक्षण करतात. पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. यंदा १९९ पर्यटक येऊन गेले. त्यात ३ परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. त्यात बहुसंख्य पर्यटक नीलकर्णी खंड्याचे फोटो काढण्यासाठी आले होते. हा पक्षी आबलोली येथे गेली सहा वर्षे नेस्टिंग करत आहे. या यशोगाथांना निसर्ग राखण्याच्या दृष्टीने महत्व आहे.
---------
(टीप- ही चौकट स्वतंत्रस्वरुपात वेगळ्या रंगात घ्यावी.)
चौकट
अशा आहेत पक्षी निरीक्षकांचा नोंदी
रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर सर्वसाधारण ३००-३५० प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद आढळते. कातळसडे व गवताळ कुरणे, पानझडी जंगले, कांदळवने आणि पाणथळ व समुद्री असे विविध प्रकारचे अधिवास असल्याने पक्ष्यांच्या प्रजाती मध्येही तितकीच विविधता दिसून येते. यात प्रामख्याने धनेश, अनेक प्रकारचे शिकारी पक्षी, समुद्री स्थलांतरीत पक्षी तसेच सामान्यपणे दिसणारे कवडे, चिमण्या, खंड्या यांचा समावेश होतो. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झरर्व्हेशन ऑफ नेचर या जागतिक संघटनेने प्रसारित केलेल्या लाल यादीनुसार प्रजातींचे मूल्यांकन केले जाते. त्या यादीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षी निरीक्षकांनी अभ्यास केला आहे.
* संघचारी टिटवी अती संकटग्रस्त प्रजातीच्या २ पक्ष्यांची नोंद रत्नागिरीतील चंपक मैदान येथील सड्यांवर २०२२ साली केली गेली. ही महाराष्ट्रातील केवळ दुसरी नोंद ठरली. त्याच चंपक मैदानावर ग्रेटर स्पोटेड ईगल, इंडियन स्पोटेड ईगल, पॅलीड हॅरियर, इजिप्शियन वल्चर इत्यादी संकटग्रस्त आणि दुर्मिळ पक्ष्यांच्या नोंदही झाली आहे.
* समुद्री स्थलांतरीत पक्ष्यांपैकी ग्रेट नॉट, गॉडविट, अनेक प्रकारचे सँडपायपर हे काळबादेवी, मिऱ्या, भाट्ये असा समुद्रकिनाऱ्यावर व कांदळवनात आढळून येतात.
* चंपक मैदान हे रत्नागिरीतील एक महत्वाचे ठिकाण व अधिवास आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची भौगोलिक रचना. समुद्रापासून जवळ असल्याने आणि विस्तृत अशी गवताळ कुरणे व खुरटी झुडपे असल्यामुळे तिथे मोठ्याप्रमाणात स्थलांतरीत पक्षी दिसतात.
* पक्ष्यांना असलेले मुख्य धोके नष्ट होत असलेले अधिवास, खाणकाम, वातावरणातील बदल, अवैध शिकार व तस्करी, शेतीतील कीटकनाशकांचा अतिवापर ही आहेत.
* पक्षी निरीक्षण हे जरी एक शास्त्र असले तरीही सर्वसामान्य माणूसही ते सहजतेने आत्मसात करू शकतो. अगदी आपल्या घराच्या गॅलरीमधून किंवा बागेतून याची सुरुवात करू शकतो. एक जागा व वेळ ठरवून घेऊन, रोज न चुकता दिसणाऱ्या पक्ष्यांची नोंद घेता येते. सुरूवातीला पक्षी कसे ओळखायचे, नेमके काय पाहायचे यासाठी काही फील्ड गाईड (पुस्तके) , तज्ञ पक्षी निरीक्षक अथवा इंटरनेटची मदत आपण घेऊ शकतो.
---------
संकटग्रस्त श्रेणीतील पक्षी
* सोशिएबल लॅपविंग (अती चिंताजनक)
* ग्रेट नॉट (चिंताजनक)
* इजिप्शियन व्हल्चर (चिंताजनक)
* ग्रेट हॉर्नबिल (असुरक्षित)
* मलबार पाईड हॉर्नबिल (असुरक्षित)
* मलबार ग्रे हॉर्नबिल (असुरक्षित)
* ग्रेटर स्पॉटेड ईगल (असुरक्षित)
* इंडियन स्पॉटेड ईगल (असुरक्षित)
* निलगिरी वूडपीजन (असुरक्षित)
* ब्लॅक कॅप्ड किंगफिशर (असुरक्षित)
* एशियन वुलीनेक स्टॉर्क (निकट-असुरक्षित)
* ब्लॅक हेडेड इबिस (निकट-असुरक्षित)
* डार्टर (निकट-असुरक्षित)
* ग्रेट थिक-नी (निकट-असुरक्षित)
* युरेशीयन करल्यु (निकट-असुरक्षित)
* बार टेल्ड गोडविट (निकट-असुरक्षित)
* ब्लॅक टेल्ड गोडविट (निकट-असुरक्षित)
* करल्यु सॅंडपायपर (निकट-असुरक्षित)
* पॅलीड हॅरीयर (निकट-असुरक्षित)
* ओरीएन्टल ड्वार्फ किंगफिशर (निकट-असुरक्षित )
* रेड हेडेड फालकन (निकट-असुरक्षित )
-------
चौकट
- या संस्था करताहेत पक्षी संवर्धनावर काम
* सह्याद्री संकल्प सोसायटी
* सह्याद्री निसर्ग मित्र
* निसर्ग सोबती
--------
कोट
25767
- rat17p12.jpg- प्रतीक मोरे
गेल्या काही वर्षात रानकोंबडे, तितर, लावे, बदके अगदी मोरांच्याही शिकारी होऊ लागल्या आहेत. त्यांच्या संख्येवर होणारा परिणाम हे अभ्यासणे काळाची गरज आहे. अनेकवेळा जंगल भागात लागणारे वणवे पक्ष्यांच्या अधिवास बदलण्यासाठी घातक ठरत आहेत. हजारो जीवांनी अनेक पक्ष्यांची आश्रयस्थाने आणि घरटी त्या वणव्यात नष्ट होतात आणि पक्ष्यांचे खाद्य असणारे कीटक सरीसृप नष्ट होतात. त्यामुळं वणवे रोखणे महत्वाचे आहे.
- प्रतीक मोरे, पक्षीमित्र
------
कोट
25768
- rat17p13.jpg-
सचिन पालकर
खंड्याच्या घरट्यामधील हालचालींचे सीसीटीव्ही कॅमेर्याद्वारे निरीक्षण २० वर्षे केले. त्यांची संख्या कमी होत असल्याचे आम्हाला लक्षात आले आहे. अनियमित पाऊस आणि वाढते शहरीकरणामुळे नेस्टींगसाठी अडचणी निर्माण होतात. त्यांना आवश्यक खाद्य मिळत नाही. हा अभ्यास करण्यासाठी आम्ही जागा निश्चित केलेल्या होत्या. त्याद्वारे आम्हाला हे निरीक्षणे नोंदवता आली आहेत.
- सचिन पालकर, पक्षी अभ्यासक
-----
कोट
- rat17p14.jpg-
25769
सचिन कारेकर
मोठ्या शहरात धकाधकीच्या जीवनामुळे कंटाळलेले नागरिक पर्यटनासाठी कोकणात शांत आणि निसर्गाने नटलेल्या ठिकाणी दाखल होतात. त्यामुळे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात पक्षी निरीक्षण, फोटोग्राफी यासाठी पर्यटकांचा राबता रत्नागिरी सुरू झालेला आहे. त्यामधून पर्यटन व्यावसायाला चालना मिळालेली आहे. त्यासाठी पक्षी संवर्धन काळाची गरज आहे.
- सचिन कारेकर, गुहागर
------
कोट
- rat17p15.jpg-
25770
विराज आठल्ये
दिवसेंदिवस कमी व नष्ट होणारी पक्ष्यांची संख्या ही खूप काळजीची बाब आहे. पर्यावरणातील परागीभवन, कीटक नियंत्रण, अन्नसाखळीचे नियोजन यासारख्या महत्वाच्या कार्यातला पक्ष्यांचा वाटा अनमोल आहे. पक्षी निरीक्षक आणि फोटोग्राफर यांच्यामुळे निसर्ग आणि पक्षी पर्यटनालाही उभारी मिळाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारच्या नेचर वॉक आणि क्लबद्वारे जनतेला पक्षी आणि एकूणच निसर्गाबद्दल अधिकाधिक माहिती पोचविण्याचा प्रयत्न आणि जनजागृती करणे ही काळाची गरज आहे.
- विराज आठल्ये, प्रकल्प व्यवस्थापक, सह्याद्री संकल्प सोसायटी
----
कोट
-rat17p16.jpg-
25771
डॉ. राहुल चोपडे
डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटल आणि शिवसृष्टी परीसरामध्ये नैसर्गिकता जपण्यावर भर दिला गेला आहे. भेर्ली माड, पांगारा, पळस, काटे सावर यासारख्या वृक्षांसह सोनचाफा ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहे. ही झाडं पक्ष्यांचा अधिवास आणि खाद्य या दोन्हींसाठी उपयुक्त ठरतात. त्याचबरोबर याठिकाणी वाहत जाणारा वहाळही पक्ष्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात हार्नबिल, किंग फिशर यासह सुमारे ४० ते ५० पक्ष्यांच्या नोंदी झाल्या आहेत. खाण्याची विपुलता असेल तर पक्षी आपसुकच तिकडे वळतात.
- डॉ. राहुल चोपडे, डेरवण
------------
कोट
- rat17p19.jpg-
25796
भाऊ काटदरे
मागील काही वर्षात नवनवीन पक्षी मित्र तयार झाले आहेत. ही सकारात्मक बाब आहे. कोकणात जैवविविधता उत्तम असल्यामुळे पक्षांचा चांगला अधिवास आहे. मात्र तुलनेत त्याचे संवर्धन होत नाही. रस्ते बनविणे, वृक्षतोड, विकास कामे वाढली आहेत. त्या तुलनेत नवीन झाडे लावणे, जंगल वाढवणे या गोष्टी होत नाहीत. विकास करताना प्रत्येकाने निसर्ग सांभाळून विकास करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. फक्त सोशल मीडियावर राहण्यापेक्षा प्रत्यक्षात उतरणे गरजेचे आहे.
- भाऊ काटदरे, सह्याद्री निसर्गमित्र संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

