...आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यात विस्तार झाला
लोगो ः फ्लॅशबॅक
---
...आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा
जिल्ह्यात विस्तार झाला
काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेने आपले प्रस्थ निर्माण केले. १९९०च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून कोकणची ओळख निर्माण झाली. पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव संयमी कोकणकरांवर वाढतच गेला. पुढे झालेल्या १९९५ आणि १९९९च्या निवडणुकीतही तेच चित्र दिसले. मात्र २००४ निवडणुकीत नव्याने उदयास आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात २ जागा जिंकल्या. शिवसेना-भाजप युतीमधील अंतर्गत नाराजीनाट्याने रत्नागिरी आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला विस्तार करण्याची संधी मिळाली.
- राजेश कळंबटे, रत्नागिरी
---------
काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. राष्ट्रवादीने १९९९च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात यश मिळाले मात्र रत्नागिरी जिल्ह्यात त्यांना खाते उघडता आले नव्हते. तेव्हा चिपळूणात भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीच्या रमेश कदमांचा थोडक्या मतांनी पराभव केला. तसेच रत्नागिरी, राजापूर, गुहागर, खेड या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. ही बाब निश्चितच लक्षणीय ठरली. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या तत्कालीन नेत्यांमध्ये सकारात्मक वातावरण होते. त्यानंतर पुढील पाच वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादीने जोरदार भरारी घेण्यासाठी जुळणीस सुरवात केली. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी जिल्ह्यात नवी नेतृत्व निर्माण करण्यावर भर दिला. त्यामधून २००४ च्या निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उदय सामंत यांच्या रुपाने नवा चेहरा पुढे आला. त्यावेळी शिवसेना-भाजप युतीमधील अंतर्गत धुसफूस युतीच्या उमेदवाराला म्हणजेच भाजपच्या बाळ माने यांना भोवली. त्यामुळे राष्ट्रवादीला रत्नागिरीची जागा काबीज करता आली. त्या निवडणुकीत सातपैकी एक जागा राष्ट्रवादीला मिळाला. जिल्ह्यातील दोन जागांपैकी एक जागा भाजपने गमावली. त्यावेळी चिपळूणची जागा शिवसेनेने अंतर्गत कुरघोडीमुळे गमावली आणि तिथे राष्ट्रवादीने वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे शिवसेनेला एक जागा गमवावी लागली. चिपळुणात विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना शिवसेनेने तिकीट नाकारल्यामुळे २००४ ला तिरंगी लढत झाली. त्यात रमेश कदम यांनी बाजी मारली. तर अपक्ष भास्कर जाधव यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. शिवसेनेचे पानीपत झाले होते. तिथून राष्ट्रवादीने रत्नागिरी जिल्ह्यात भरारी घेण्यास सुरवात केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

