विधानसभा - बाळ माने मुलाखत
(पान २ साठी, रत्नागिरी विधानसभा - बाळ माने)
- rat१७p१.jpg-
OP24N25865
बाळ माने
रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी
रोड मॅप तयार ः बाळ माने
गेली चाळीस वर्षे रत्नागिरीच्या राजकारणात कार्यरत आहेत. १९९९ ते २००४ या कालावधीत आमदार म्हणून काम करताना ग्रामीण भागातील रस्ते, पाखाड्या, नळपाणी योजना अशी विविध विकासकामे केली. सध्या रत्नागिरीकरांमध्ये परिवर्तनाची हवा आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करीत महाविकास आघाडीकडून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरलो आहे. परिवर्तन ही टॅगलाईन घेऊन वाडीवस्तीवर प्रचार सुरू आहे. रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी रोड मॅप तयार आहे, असे आघाडीचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी सांगितले. त्यांनी विविध मुद्द्यावर ‘सकाळ’शी संवाद साधला.
- मकरंद पटवर्धन, रत्नागिरी
---
प्रश्न : कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवत आहात?
उत्तर ः गेल्या २० वर्षांत रत्नागिरीकरांचे प्रश्न प्रलंबित किंवा जैसे थे आहेत. त्यासाठीच रोड मॅप तयार केला आहे. आरोग्यसेवेत सुधारणा, पर्यटन विकास, लघू आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी मँगो कॅनिंग प्रोसेसिंग प्लांट आणि काजू उत्पादन केंद्रे उभारून रोजगार निर्मिती करू. तरुणांना रोजगार देण्यासाठी तांत्रिक शिक्षण आणि स्टार्टअप फंड तयार, रस्त्यांची सुधारणा, कृषी, मासेमारी आणि आंबा संशोधन केंद्रांसह उच्च शिक्षण संस्था उभारणी करू. आंबा, काजू आणि मत्स्य व्यवसाय विकास, आंबा आणि काजू प्रक्रिया केंद्र उभारून उत्पादनाच्या मूल्यवर्धनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार आहे. रस्त्यावरील मोकाट गायीगुरांना सुरक्षित आश्रय देण्यासाठी गोशाळा उभारणी गोमूत्र व शेण खताचा वापर करून जैविक शेतीला चालना देण्याचा मानस आहे.
प्रश्न : शेतकरी, मच्छीमारांसाठी कोणत्या गोष्टी करणार?
उत्तर ः रत्नागिरीचे अर्थशास्त्र आंबा, काजू, मासेमारी, पर्यटनावर अवलंबून आहे; परंतु बागायतदार कर्जबाजारी व पिचला आहे. महागडी जंतुनाशके त्याला परवडत नाहीत. पीक संरक्षण होत नाही. काजूला हमीभाव नाही. मिरकरवाड्यात अद्ययावत बंदर होऊ शकले नाही. पायाभूत सुविधांची वानवा, क्रीडांगण अपूर्ण असून आरोग्य व्यवस्था संपली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांत शिक्षक नाहीत, कंपन्या बंद पडत आहेत. त्यामुळे सर्व लोकांना बदल हवा आहे. त्यासाठी मी समर्थ पर्याय म्हणून काम करत आहे. रत्नागिरीकरांचे विमानतळाचे स्वप्न आजही अधुरेच आहे. परदेशी पर्यटक रत्नागिरीत येतात. त्यांच्यासाठी विमानतळ आवश्यक आहे. उद्धव ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे पाच वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न आहे.
प्रश्न : विकास प्रकल्पांबाबत नेमकी भूमिका काय आहे?
उत्तर ः रत्नागिरीतील एमआयडीसीमधील बहुतांशी उद्योग बंद आहेत. जे. के. फाईल्स, भारती शिपयार्ड सारख्या कंपनी बंद झाल्यामुळे कामगार देशोधडीला लागले. गेल्या अडीच वर्षांत मतदारसंघात विरोधकांची दडपशाही सुरू आहे. गेल्या वीस वर्षांत एकही नवा उद्योग आला नाही, हे विरोधकांचे मोठे अपयश आहे. गेल्या अडीच वर्षांत आधीच मालकांकडून भू माफिया (इन्व्हेस्टर) कवडीमोलाने जागा खरेदी करतात, नंतर एमआयडीसीची घोषणा होते. मिऱ्या, वाटद, बारसू, रिळ या गावातही असेच झाले. त्यामुळे हा शेतकरी, अल्प भूधारकांवर एक प्रकारे घाला घातला जात आहे. याप्रकारांची चौकशी होणे गरजेचे आहे.
प्रश्न : कोणते उद्योग आणण्यासाठी प्राधान्य देणार?
उत्तर ः रत्नागिरीचा यूएसपी पर्यटन, फलोत्पादन, पश्चिम घाटातील निसर्गवैविध्य, मासे हा आहे. टाटा, डेलॉईट, गोखले इन्स्टिट्यूटसारख्या अनेक संस्था सर्व्हे करतात. त्यांच्याकडून सर्व्हे करून घेणार आहोत. पर्यावरण रक्षण करून पर्यावरणपूरक प्रकल्प म्हणजे आंबा, काजू फळप्रक्रिया व मासेमारीवर आधारित उद्योग आणण्यासाठी प्रयत्न आहे.
प्रश्न : निवडणुकीविषयी काय सांगाल?
उत्तर ः रत्नागिरीकरांना परिवर्तन हवे आहे, बदल हवा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला अनुकूल स्थिती आहे. चांगले शिक्षण मिळत नसल्यामुळे किंवा चांगले उद्योग येत नाहीत आणि रोजगार मिळत नाही. अनेक तरुण पुण्या-मुंबईत किंवा बंगळूरला जातात. इथल्या मुलांच्या हाताला काम मिळण्यासाठी परिवर्तन होणारच.
प्रश्न : रस्ते सुधारण्यासाठी काय प्लॅन समोर आहे?
उत्तर ः पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाचे रस्ते, प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करून वाहतूक सुधारणा करण्यास प्राधान्य देणार आहे. रत्नागिरी- कुंभार्ली घाट रस्ता, रत्नागिरी- जयगड मार्ग, रत्नागिरी-लोटे मार्ग, गणपतीपुळे- रत्नागिरी मार्ग, रत्नागिरी-आरे-वारे मार्ग, आडीवरे- विजयदुर्ग रस्ता सुधारण्यावर भर देऊ.
प्रश्न ः लोकसभेचा प्रभाव यावेळी दिसेल का?
उत्तर ः पक्ष फोडल्यामुळे मूळ व बंडखोर अशी लढत महाराष्ट्रात आहे. लोकसभा निवडणुकीत रत्नागिरीत १० हजारांचे मताधिक्य विनायक राऊत यांना मिळाले होते. त्यामुळे यावेळीही तसेच चित्र राहील. त्यामधून लोकांना बदल हवा असल्याचेच चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

