पावस-रिक्षा व्यवसायातून स्वतःसह तीन मुलींचे पालनपोषण
काही सुखद - लोगो
25850
रिक्षा व्यवसायातून स्वतःसह तीन मुलींचे पालनपोषण
श्रीमती सानिका वालेकर यांची जिद्द; अनेकांच्या सहकार्याने अडचणींवर केली मात
सुधीर विश्वासरावः सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १७ः पतीच्या निधनानंतर तीन मुलींसह उदरनिर्वाह करणे कठीण बनलेले असताना आपल्या पायावर उभे राहायचं आणि व्यवसाय करण्याची जिद्द ठेवून रिक्षा व्यवसाय सुरू केला. त्यातून स्वतःचे वेगळे अस्तित्व आणि ओळख राजापूर तालुक्यातील कोदवली येथील माहेरवाशीण श्रीमती सानिका वालेकर यांनी निर्माण केली आहे.
श्रीमती वालेकर यांचे कोदवली येथे माहेर. सासर बेळगावला आहे. वर्षापूर्वी त्यांच्या पतींचे निधन झाले. त्यांना तीन मुली आहेत. पतीच्या निधनानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण बनलेले असताना छोटी-मोठी कामे सहज मिळाली असती, परंतु आपण कोणाची गुलामगिरी करायची नाही. स्वतःच्या हिंमतीवर काहीतरी करावे या उद्देशाने त्यांनी प्रयत्न सुरू केले. श्रीमती वालेकर म्हणाल्या, वडिलांना रत्नागिरी येथे उपचारासाठी जात असताना एका रिक्षाचालकाला विचारले, मला चारचाकी वाहनाचा परवाना काढायचा आहे. परंतु त्याने सल्ला दिला की हे करण्यापेक्षा तू तीनचाकी गाडीचे परवाना घे म्हणजे ते फायदेशीर ठरेल. त्याप्रमाणे हालचाली सुरू केल्या. सुरवातीला रिक्षा चालवता येत नव्हती. परंतु हळूहळू शिकले. त्यानंतर एका भल्या माणसाने मला रिक्षा चालवण्यासाठी प्रवृत्त करून प्रशिक्षणही दिले. काही झाले तरी आपण रिक्षा शिकायची जिद्द असल्याने मी त्याकडे गांभीर्याने पाहू लागले आणि त्यामध्ये मला गती मिळाली. स्वतः रिक्षा घेण्याचे ठरवले आणि त्यानंतर स्वतःची रिक्षा घेतली. आपणही स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, कोणाची बांधिलकी न ठेवता आपण कष्ट करून आपले व मुलींचे चांगले पालनपोषण करायचा असा निश्चय करून हा व्यवसाय करण्याचे ठरवले. सुरवातीच्या काळात काही अडचणी आल्या. कारण एक महिला रिक्षा चालवते हा एक कुतूहलाचा विषय होता. परंतु जिद्द आणि महत्त्वाकांक्षा यामुळे या सर्व गोष्टींवर मात केली. माहेर राजापूर शहराजवळ असल्याने राजापूर तालुक्यामध्ये मी माझा व्यवसाय करते. सर्वांना चांगली सेवा देत असल्यामुळे अनेक महिला आता फोन करून बोलवतात. ज्यांना चांगली सेवा मिळाली ते आवर्जून या व्यवसायाला मदत करतात.
चौकट
रिक्षाचालकांचेही मिळते सहकार्य
रिक्षा सीएनजी आहे. शहरात एकच पंप असल्याने रांगेत उभे राहावे लागते. मला रात्रभर रांगेत उभे राहणे शक्य नसते. अशावेळी सकाळी सीएनजी भरण्यासाठी जाते. त्यावेळी काही रिक्षाचालकांची कुरबुरी सुरू असते. परंतु या सर्वांना एकदा प्रेमाने समजवल्यानंतर आता सगळे रिक्षाचालक सहकार्य करतात.
कोट
चारचाकी परवाना काढण्याची इच्छा असताना तू तीन चाकी परवाना काढ असा सल्ला देणारे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू असताना माझ्यासारख्या महिलेला रिक्षा शिकवणाऱ्या व्यक्तीमुळेच हा व्यवसाय करणे शक्य झाले. या दोघांनीही चांगला सल्ला दिल्यामुळेच आणि मला माझ्या स्वतःचं काही करण्याची उमेद असल्यामुळेच एक महिला असून चांगला प्रतिसाद मिळत आहे. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या युक्तीप्रमाणे प्रत्येक महिलांनी आपण काहीतरी करायचे ठरवले तर आपण काही करू शकतो.
- श्रीमती सानिका वालेकर, रिक्षा व्यावसायिका, राजापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

