योगी आदित्यनाथ सभा बातमी

योगी आदित्यनाथ सभा बातमी
Published on

कोल्हापूर ः विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचारार्थ रविवारी येथील तपोवन मैदानावर झालेल्या सभेत बोलताना योगी आदित्यनाथ. (मोहन मेस्त्री ः सकाळ छायाचित्रसेवा)

काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’
योगी आदित्यनाथ ः जात, भाषेवरून देशात फूट पाडणारे

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः काँग्रेसचे ‘जिन्स’ हे इंग्रजांचे आहेत. त्यामुळेच ते देशात जात, प्रांत, भाषा या मुद्यांवर फूट पाडत आहेत. आपल्यात फूट पडली की देशाचे विभाजन होते. अयोध्येतील रामाची विटंबना होते, मथुरेत कृष्णाचा अपमान होतो, विशाळगडावर अतिक्रमण होते. हा इतिहास आहे, असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज येथे केला. हे थांबवायचे असले तर, आपण एक होऊन राज्यात महायुतीला सत्तेत आणले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ श्री. आदित्यनाथ यांची येथील तपोवन मैदानावर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. सभेला खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, गोकुळ संचालिका शौमिका महाडिक, महायुतीचे दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक, करवीरचे चंद्रदीप नरके, उत्तरचे राजेश क्षीरसागर, हातकणंगलेचे अशोक माने यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे नेते उपस्थित होते.

यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. कारण काँग्रेसकडून देशात फूट पाडण्याचा डाव सुरू आहे. त्यांच्यात इंग्रजांचे ‘जिन्स’ आहेत. फूट पाडण्याची सुरुवात १९४७ पासून झाली. काँग्रेसच्या तत्कालीन नेतृत्वाने ठरवले असते, तर देशाची फाळणी झाली नसती; मात्र सत्तालालसा आणि कमकुवतपणा यामुळे अखंड भारताचे विभाजन झाले.’’

खर्गे सत्य स्वीकारा!
योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘‘मी ‘बटेंगे तो कटेंगे’ असे म्हटले की, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना राग येतो; मात्र १९४६ मध्ये त्यांचे बिदरमधील बाराबत्ती हे गाव निजामाच्या रझाकारांनी जाळले. यामध्ये त्यांच्या आई, बहीण आणि काकूंचा मृत्यू झाला. निजामाचे रझाकार कट्टरपंथीय मुस्लिम होते. खर्गे काँग्रेस नेतृत्वाला घाबरतात. त्यामुळे हे वास्तव ते स्वीकारत नाहीत.’’

कोट
आज भाजप आणि घटक पक्षांनी ‘एक देश, श्रेष्ठ देश’ हे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे देशात पायाभूत सुविधांचा विकास गतीने झाला. कोणताही भेदभाव न करता सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देण्यात आली.
- योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री उत्तर प्रदेश

चौकटी
राज्यात महायुती सत्तेवर येताच
संरक्षणाचे ‘यूपी’चे सूत्र लागू
अयोध्येतील राम मंदिराचा ५०० वर्षांपासून सुरू असणारा प्रश्न संपला आणि भव्य मंदिर उभे राहिले. काँग्रेसने राम मंदिर का बांधले नाही? कारण त्यांचे धोरण फूट पाडण्याचे आहे. ते जात, भाषा, प्रदेश याद्वारे फूट पाडत आहेत; मात्र आपण एक राहून महायुतीला निवडून दिले पाहिजे. महायुती सत्तेत आली की विशाळगडावर अतिक्रमण होणार नाही, गणेशोत्सवात दगडफेक होणार नाही, रामनवमीच्या शोभायात्रेवर दगड पडणार नाहीत. कारण महायुती सत्तेत आली, की इथे संरक्षणाचे उत्तर प्रदेशातील सूत्र लागू होणार आहे, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी मूल्य सोडले
योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘‘बाळासाहेब ठाकरे असते तर ते कधीच काँग्रेससोबत गेले नसते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने हिंदुत्वाचा विचार स्वीकारला होता; मात्र उद्धव ठाकरे यांनी हे मूल्य सोडले.’’

दहशतवाद मोडून काढला!
योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘‘देशात २०१४ पूर्वीपर्यंत पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद फोफावला होता. आम्ही काँग्रेसला प्रश्न विचारत होतो. त्यावेळी पाकिस्तानबरोबरचे संबंध बिघडतील म्हणून ते काही करत नव्हते. तुमच्या संबंधांसाठी देशाला पणाला का लावता? त्यानंतर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकच धोरण अवलंबले. ‘हम छेडेंगे नही, अगर छेडेंगे तो छोडेंगे नही’ या धोरणामुळे दहशतवाद मोडून काढला.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com