राजापूर विधानसभा मतदारसंघ मुलाखत ः राजन साळवी

राजापूर विधानसभा मतदारसंघ मुलाखत ः राजन साळवी

Published on

राजापूर विधानसभा मतदारसंघ मुलाखत
- rat१७p३५.jpg-
P२४N२५८५७
राजन साळवी

- rat१७p३३.jpg-
२४N२५८५२
नकाशा

मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय : राजन साळवी

आमदार या नात्याने राजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील आहे. दर्जेदार रस्ते, पाण्याची मुबलक सुविधा, सुसज्ज आरोग्यविषयक सुविधा, पर्यटन आणि पर्यावरणस्नेही उद्योगांना प्रोत्साहन देतानाच रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याला प्राधान्य दिले आहे. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असल्याची भूमिका महाविकास आघाडीचे उमेदवार आणि आमदार राजन साळवी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. ‘वचन देणार ते पूर्ण करणार’ अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

- राजेंद्र बाईत, राजापूर

.....

प्रश्न : मतदारसंघाच्या विकासाबाबत काय सांगाल?
उत्तर : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी गेल्या पंधरा वर्षांमध्ये प्रतिकूल परीस्थिती असतानाही विकासनिधी आणला आहे. रस्ते, पूल, पाणी, पर्यटनस्थळांचा विकास, आरोग्य सुविधा, क्रीडांगण, शैक्षणिक सुविधा, आदींचा पाठपुरावा करत विकासकामे मार्गी लावली आहेत. विविध शासकीय योजनांचा सर्वसामान्यांना लाभ मिळवून देण्यावर भर होता. धरण प्रकल्पांच्या उभारणीतून जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखालील आणून शेतीतून आर्थिक समृद्धी साधली जात आहे. काही धरण प्रकल्पांची कामे मार्गी लागली असून, काही कामे प्रगतिपथावर आहेत. ओणी-वाटूळ येथे सुपर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जागा हस्तांतरणाचाही प्रश्‍न निकाली काढला आहे.
...

प्रश्न : शिवसेना पक्षांतर्गंत झालेल्या फुटीपासून अलिप्त राहण्याचे कारण काय?
उत्तर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आपण पाईक असून, मी कडवा अन् सच्चा शिवसैनिक आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना नेते आदित्य ठाकरे यांचे आशीर्वाद आणि सहकार्य नेहमीच राहिले आहे. त्यामुळे आपल्यासारखा एका सर्वसामान्य शिवसैनिकाला संघटनेत महत्त्‍वाची पदे मिळालीच. त्याचवेळी लोकप्रतिनिधी म्हणून अनेक पदे भूषविण्याचा मानसन्मान मिळाला आहे. त्यापेक्षा एका सर्वसामान्य शिवसैनिकाला आणखीन काय हवे? त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे विचार अन् तत्त्‍वांशी प्रतारणा न करता शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो आहे. विधानसभा निवडणुकीत जनता निश्‍चितच निष्ठेला साथ देईल.
...

प्रश्न : राजापुरातील चर्चेत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत काय म्हणाल?
उत्तर : प्रकल्पाबाबतची आमची नेहमीच लोकांच्या हिताची अन् लोकांच्या बाजूची भूमिका राहिली आहे. त्यामुळे लोकांना रिफायनरी प्रकल्प नको असल्यास आमची भूमिका ठाम विरोधाची आहे. रिफायनरी प्रकल्प रद्द करून त्याऐवजी आगामी काळात मतदारसंघामध्ये पर्यावरणपूरक, नैसर्गिक आणि मानवहानी न करणारे प्रकल्प आणण्याचे निश्‍चितच प्रयत्न करणार आहे. जेणेकरून त्याद्वारे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती आणि दरडोई उत्पन्नामध्ये वाढ करीत लोकांचे आर्थिकदृष्ट्या जीवनमान उंचावण्यावर भर देणार आहे.
....
प्रश्न : मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन काय असेल?
उत्तर : शासनाकडून प्राप्त निधीतून मतदारसंघाचा विकास झाला असला तरी, भविष्यात आणखीन काही विकासाच्या संकल्पना डोळ्यासमोर ठेवून विकास साधायचा आहे. त्यामध्ये महावितरणच्या समस्या सोडविताना स्थानिक शासकीय रुग्णालयांमध्ये उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उभारून लोकांचे आरोग्य जीवन सुखी आणि समृद्ध करण्यावर भर देणार आहे. पर्यटनस्थळांचा विकास करीत रोजगार निर्मिती, धरणांची बांधकामे आणि कालव्यांची अपुरी कामे पूर्ण करून सिंचनक्षमता वाढविणे, उच्च आणि रोजगारभिमुख शिक्षण प्रणाली उभारताना तरुण-तरुणींना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर, महिला बचत गटांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देत महिलांचे पर्यायाने त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक सक्षमीकरणे करणे, दर्जेदार रस्ते, मच्छीमारांसह शेतकरी, बागायतदारांचे प्रश्‍न सोडविणे आणि लोकांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. राजापूर-लांजा शहराच्या विविध प्रश्‍नांसह व्यापाऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार आहे.

---

प्रश्न : काजू पिकाला योग्य तो हमीभाव मिळवून देणार का?
उत्तर : हापूस आंब्याप्रमाणे काजू बागायतीतून शेतकरी, बागायतदार यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र, अनेकवेळा प्रतिकूल निसर्गाचा अडथळा ठरून शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे काजू पिकाला योग्य तो हमीभाव मिळवून देताना तशी घोषणा करून जेणेकरून हमीभाव प्राप्त होणारे कोकणातील पहिले पीक म्हणून काजूला मान मिळेल. त्याचवेळी एपीएमसी वाशी येथे आंबा, काजू, नारळ आणि फणसाच्या मार्केटिंगला पूर्ण पाठींबा देताना स्वतंत्र विक्री केंद्र आणि जागा उपलब्ध करून देणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com