कुडाळ-मालवण मतदारसंघ विकासापासून वंचित ः राणे
25862
नीलेश राणे
कुडाळ-मालवण मतदारसंघ
विकासापासून वंचित ः राणे
लीड
कुडाळ-मालवण हा मतदारसंघ गेली दहा वर्षे विकासापासून वंचित राहीला आहे. विकासाच्या माध्यमातून माणूस जेव्हा कनेक्ट होतो, तेव्हा त्या मतदारसंघाची प्रगती होत असते. महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात साडेसहाशे ते सातशे कोटीचा निधी या मतदारसंघात आला आहे. विरोधकांवर कोणतीही टीका टिप्पणी न करता लोकहिताचे काम मला या मतदारसंघात करायचे आहे. विविध प्रकल्प आणून कुडाळ-मालवण मतरासंघाला राज्याच्या टॉप फाईव्हमध्ये नेणार असल्याचे मत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी विशेष मुलाखतीत व्यक्त केले. येत्या अडीच वर्षांत स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या जमिनीत एमबीए शैक्षणिक संकुलसह विविध प्रकल्प साकारणार असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभेच्या अनुषंगाने श्री. राणे यांची मुलाखत...
-----------------
प्रश्न ः कुडाळ-मालवण मतदारसंघाच्या विकासाचे पर्व काय?
गेली अनेक वर्ष मी राजकारणात आहे. २००९ ते २०१४ खासदार म्हणून राहिलेलो आहे. मात्र, गेले दहा वर्षे कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाची जी काही अवस्था अतिशय दयनीय आहे. गेल्या अडीच वर्षे सत्तेत असताना या ठिकाणी या मतदारसंघाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. महाराष्ट्र विधिमंडळ बजेटमध्ये या मतदारसंघाचा उल्लेखही नाही. विविध प्रश्न उघड्यावर पडलेले आहेत. आम्ही विकासाचा प्लान करताना जिल्हा नियोजनमध्ये किती निधी मिळू शकतो, याचे नियोजन केले आहे. त्यामध्ये जोड रस्ता, घाट रस्ते, बीज्रेस यांचा समावेश आहे. रस्त्याची डागडुजी आवश्यक आहे. या मतदारसंघात आरोग्य यंत्रणेचा विचार करता आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र हा ग्रामीण भागाचा कणा असताना या ठिकाणी कोणत्याही पायाभूत सुविधा नाहीत. सिव्हीलची अवस्था दयनीय आहे. शासकीय मेडिकलला सिव्हीलचा स्टाफ वापरला जातो, तो सुद्धा कमी प्रमाणात आहे. गरीब माणूस उपचाराला गेला तर कोणत्याही सुविधा नसल्याने जाऊ शकत नाही, म्हणून त्याला खाजगी हॉस्पिटल पर्याय असतो. प्राथमिक आरोग्य केंद्र जीवदान देण्याचे केंद्र हे महत्त्वाचे असताना पायाभूत सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुडाळ-मालवण मतदारसंघात सर्वांगीण विकास करताना या मतदारसंघात विविध उपक्रम राबवतानाच एमबीए इन्स्टिट्यूट शैक्षणिकदृष्ट्या इन्स्टिट्यूट हे स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या जमिनीवर उभ्या करण्याचा माझा मानस आहे. हा प्रकल्प येत्या अडीच वर्षात पूर्ण नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राज्यात ऑलिंपिकसाठी येथील खेळाडू तयार झाले पाहिजेत. त्यांना प्लॅटफॉर्म मिळेल, या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहणार आहे. नवीन मोठ्या पुलांमध्ये बाव सुकळवाड, किर्लोस, बुधवळे मळेशेत पूल ही नव्याने मंजूर झालेली विकासकामे असून कडावल-वर्दे,नानेली-घावनळे हे मोठे पूल मंजूरीच्या प्रतीक्षेत आहेत. महायुती शासनाच्या काळात ही कामे मंजूर करून ती पूर्ण करण्याची धडपड राहील.
प्रश्न ः विकासकामांबाबत काय सांगाल?
ग्रामीण भागातील खड्डेमय रस्त्यांना प्राधान्य देत जिल्हा वार्षिक योजना तसेच राज्य अर्थसंकल्प अंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील १५० पेक्षा जास्त ग्रामीण मार्गांना निधी उपलब्ध करून देत रस्ते खडेमुक्त केले. दळणवळणात महत्वाची भूमिका असलेल्या इतर जिल्हा मार्ग तसेच राज्य मार्गांना निधी देत दर्जेदार विकासकामे करत हे महत्वाचे रस्ते खड्डेमुक्त केले. दोन वर्षात मुख्यमंत्री सडक योजना टप्पा-२ अंतर्गत कुडाळमधील ११ तर मालवणमधील ९ रस्ते असे मिळून एकूण ६५ किलोमीटर लांबीचे रस्ते मंजूर करून घेत त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण केली. कुडाळ मालवण तालुक्यांना जोडणाऱ्या अनेक मोठ्या उंच पातळीच्या पुलांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत अणाव, आंबेरी, भडगाव पूल पूर्ण करून घेतले. कराड-सोनवडे पूल आता अंतिम टप्यात आहे.
प्रश्न ः रोजगार संधीबाबत तुमचे व्हीजन काय?
रोजगाराच्या संधी अनेक आहेत. मात्र, म्हणावे तेवढे प्रयत्न या विरोधकांकडून झाले नाहीत. गेली कित्येक वर्षे एमआयडीसी बंदावस्थेत आहे. अनेक उद्योगधंदे होण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न गरजेचे होते. या डोंगराळ पट्ट्यात असणाऱ्या एमआयडीसीसाठी विशेष बाब म्हणून मंत्रीमार्फत प्रस्ताव देणे गरजेचे होते. मात्र, ते झाले नाहीत. रोजगाराचे प्रश्न सोडविण्यासाठी मी माझ्या पातळीवर नियोजनपूर्वक निश्चितच प्रयत्न करणार आहे.
प्रश्न ः निवडणुकीत प्रचाराबाबतीत तुमची रणनीती काय?
गेले अडीच वर्षे या मतदारसंघात वाटचाल करताना संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. आम्ही या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शन केले नाही किंवा कोणतीही जाहीर सभा घेतली नाही. जनतेचे प्रश्न सोडवणे, त्यांच्यापर्यंत पोहोचणे हा आम्ही निवडणुक प्रचारातील महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला आणि तोच प्रचाराच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहिलेला आहे. माझे महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे नियोजनबद्ध या निवडणूकित प्रचार करत आहेत.
प्रश्न ः ग्रामीण भागातील महिलांनासाठी कोणते उपक्रम राबवू शकता?
ग्रामीण भागातील भगिनी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत, यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने लाडकी बहीण योजना कार्यन्वित केली. आम्ही इथपर्यंत न थांबता ही योजना अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आमच्या येणाऱ्या सरकारच्या माध्यमातून निश्चितच प्रयत्न केला जाईल. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण भागात जे-जे काही करता येईल, त्या दृष्टिकोनातून आमचा निश्चितच प्रयत्न राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

