ठाम मत हवेच!

ठाम मत हवेच!

Published on

(उद्योग साकारतान(सदर......लोगो)
(१३ नोव्हेंबर टुडे ३)

स्वतःचे मतच नसलेला व्यक्ती उद्योजक म्हणून कधीही यशस्वी होऊ शकत नाही. कारण, उद्योजकता असा प्रवास आहे की, तिथे उद्योजकांचा ठामपणाच कामी येत असतो. उद्योजक होण्यासाठी विविध गुण असले पाहिजेत. त्यातील सर्वात महत्वाचा गुण म्हणजे जेव्हा जेव्हा आवश्यक असेल तेव्हा तेव्हा आक्रमक न होता सहजतेने स्वतःचे मत दुसऱ्यासमोर मांडणे आणि घेतलेल्या निर्णयावर किंवा मतावर ठाम राहून स्वतःची ओळख ''निर्णयावर ठाम'' राहणारी व्यक्ती'' म्हणून लोकमानसात किंवा कर्मचारीवर्गात निर्माण करणे. ठामपणा हा व्यक्तीमत्वामधील करारीपणा, दृढता दाखवून देत असतो. मांडलेल्या मतांबद्दल ठामपणा दाखवणे हे अधिकारकत्वाचे लक्षण ठरू शकते.

- rat१९p१.jpg-
24N26203
- प्रसाद जोग
theworldneedit@gmail.com

-----
ठाम मत हवेच!


कोणतेही मत सारखे सारखे बदलल्यामुळे त्या व्यक्तीची स्वतःची अशी धारणा उरत नाही आणि नंतर त्या व्यक्तीच्या मताला किंमत उरत नाही. कारण, त्यामध्ये ठामपणा नसतो, आत्मविश्वास नसतो. ठाम मत तेव्हाच मांडता येते जेव्हा स्वतःचे मतबरोबर आहे अशी खात्री असते. विचारांमधील सुसूत्रता, स्पष्टता, स्पष्ट वक्तेपणा यामुळे कुणालाही स्वतःचे मत किंवा म्हणणे कसे मांडावे, हे समजून येते. मत मांडणे म्हणजे विचार प्रकट करणे होय. उद्योग करताना विविध प्रसंगी उद्योजकाला घेतलेल्या निर्णयांवर ठाम राहण्याची गरज असते. मत किंवा एखादा विचार मांडून तो जिद्दीने पूर्णत्वास नेण्याच्या प्रक्रियेत ठामपणा असेल तरच मत मांडणाऱ्याचा त्यामागील प्रेरक भाव किंवा दृढ निश्चयता समोरच्या व्यक्तीला समजून येऊ शकते.
जो उद्योजक स्वतःच्या निर्णयावर, मतावर ठाम असतो तो उद्योजक कितीही अडीअडचणी आल्या तरीही त्यावर मात करत संघर्ष करत हवे ते साध्य करण्यासाठी सारी शक्ती पणाला लावू शकतो. नेतृत्व, क्षमतासुद्धा याच गुणामुळे विकसित होतात. ठामपणामुळे आस्थापनेतील कर्मचारी मालकाला किंवा व्यवस्थापकाला गांभीर्याने घेतात. उद्योजक म्हणून उद्योजकाला तकलादू, वेळकाढू, लेचेपेचे असे आपले मत प्रदर्शित करून चालत नाही. स्वतःच्या मतांचा प्रभाव पडेल असे निर्णायक, प्रसंगी कठोर मत व्यवसायाच्या भल्यासाठी मांडावे लागते. कोणताही व्यवसाय किंवा उद्योग साकारताना बुद्धी स्थिर ठेवून भावनेच्या आहारी न जाता चहूबाजूंनी सर्वंकष विचार करून व आपल्या अनुयायांशी, कर्मचाऱ्यांशी योग्य ती साधकबाधक चर्चा करून अंतिम मत उद्योजकाला प्रशासकीय कारभार सुरळीत सुरू ठेवण्याच्यादृष्टीने पटलावर ठेवावेच लागते.
मत का महत्वाचे :
- मत म्हणजे ज्या विचारांची बाजू पटते आहे, ते स्वीकारणे होय किंवा आपले स्पष्ट म्हणणे होय. मत मांडता आल्यास साहजिकच आपले विचार अधिक प्रकर्षाने दुसऱ्याला पटवून देता येऊ शकतात. भागीदारी व्यवसायात बऱ्याच वेळेला एकमेकांच्या संगनमताने निर्णय घ्यावे लागतात. त्या वेळी भागीदारांना प्रसंगी लवचिक धोरणही अवलंबावे लागते. कारण, भागीदारी पद्धतीने व्यवसाय करणे हे त्यांचे ठाम आणि अंतिम मत असते.
- मत हे अनुभवातून बनत जात असते. त्यामुळे अनुभवातून चार बऱ्या-वाईट गोष्टी शिकून मांडलेले मत आस्थापनेच्या वाढीसाठी उपयुक्त ठरू शकते.
- मत ठामपणे देता आले आणि तितक्याच क्षमतेने दुसऱ्याचे मत जाणून घेता आले तर विविध दृष्टिकोन असलेल्या व्यक्ती एकमेकांच्या मतांचा योग्य आदर करून वैयक्तीक किंवा व्यावसायिक उद्दिष्टांची पूर्ती करू शकतात.
- मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केल्यास संवादाला चालना मिळू शकते.
- मत लेखन हे उद्योजकाने शिकून घ्यावे असे लेखनकौशल्य आहे. त्यामध्ये उद्योजक मतांना ठामपणे इतरांसमोर मांडण्याआधी प्रथम स्वतःची मते किंवा स्वतःचे विचार कागदावर लिहून काढून कोणत्या मताच्या बाजूने आपण आहोत, याचा अंदाज लावून घेऊन स्वतः मनाशी बनवत असलेले, मत योग्य का अयोग्य याचा निर्णय घेऊ शकतो.
- ठामपणे उद्योजकाने मांडलेले मत उद्योजकाला स्वतःला व त्याच्या कार्यसंघाला एकनिष्ठेने काम करण्यास प्रेरित करू शकते.
- मत मांडत असताना दुराग्रह न ठेवल्यास व प्रत्येकाच्या मत स्वातंत्र्याचा आदर ठेवल्यास आस्थापनेच्यादृष्टीने आवश्यक असणारे नवीन विचार आस्थापनेत सामावून घ्यायलासुद्धा सुरवात होऊ शकते.
- ठामपणे मांडलेले मत उद्योजकाची उद्योगाप्रती असलेली दूरदृष्टी दाखवून देऊ शकते.
- कधी कोणता निर्णय घ्यायचा याचे स्वातंत्र्य समजा उद्योजकाने कर्मचाऱ्यांना दिले असले तरीही उद्योजक म्हणून शेवटचे ठाम व अंतिम असे निर्णायक मत आपलेच असेल अशा रितीचे मत तयार करण्याचा प्रयत्न उद्योजकांनी करायला शिकले पाहिजे.

* उद्योजकाला त्याचे स्वतःचे मत कोणत्या प्रसंगी व्यक्त करायला लागते याची उदाहरणे :
- आस्थापनेत एकाहून जास्त संचालक असल्यास उद्योजकाला त्याचे ठाम मत द्यावे लागते जेणेकरून निर्णयप्रक्रियेत बहुमत किंवा एकमत होऊ शकते.
- कुटुंबाचा व्यवसाय असेल तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीतील उद्योजकाला पहिल्या पिढीतील उद्योजकांचे जरी ठाम मत असले तरी उद्योगात काळानुरूप बदल करण्यासाठी व बाजारातील स्पर्धेला तोंड देण्यासाठी व्यवसाय बळकटीकरण करण्याच्या हेतूने पिढीजात व्यवसायाचा एक कर्तव्यदक्ष सदस्य म्हणून मत द्यावे लागते किंवा नम्रतेने ते मांडावे लागते.
- निविदा प्रक्रियेत उद्योजकाला त्याचे ठाम अंतिम मत कार्यसंघासमोर मांडावे लागते. उदाहरणार्थ : चढ्या दराच्या निविदा प्रक्रियेत भाग घ्यायचा किंवा नाही? भाग घेतल्यास निविदेचे दर कसे भरायचे याबाबत स्पष्ट मत मांडावे लागते.
- नवीन प्रॉडक्ट (उत्पादन) बाजारात उतरवताना ते कशा पद्धतीने लाँच केले पाहिजे या संदर्भात मार्केटिंग संघाबरोबर उद्योजकाला एका उद्योगाचा प्रमुख म्हणून स्पष्ट मत मांडावे लागते.
- आस्थापनेमध्ये नवीन कर्मचारी भरती करताना निवड प्रक्रियेत अंतिम व ठाम निर्णायक मत हे उद्योजकाला द्यावे लागते जेणेकरून योग्य मानव संसाधन निवडले जाऊ शकेल.
- वेगवेगळ्या बिजनेस मीटिंगमध्ये, समिटमध्ये, सेमिनारमध्ये उद्योजकाला परिस्थितीनुरूप आपली मते प्रदर्शित करावी लागतात.

* मत मांडण्यातील शिष्टाचार
- जरी ठाम मत व्यक्त करायचे असेल तरी उद्योजकाने हुकूमशाही किंवा एकाधिकारशाही पद्धतीने ते व्यक्त करू नये.
- मत मांडताना आधी सर्वप्रकारे विचार करून मगच ते लेखी किंवा मौखिक पद्धतीने संदर्भित व्यक्ती किंवा व्यक्ती समुदायांसमोर व्यक्त करावे.
- उद्योजकाने स्वतःचे मत भागीदारावर आक्रमकपणे किंवा आक्रस्ताळेपणा करून लादू नये.
- स्वतःचे मत जरी ठाम असे असले तरीही गरज लागल्यास ते बदलण्यास लवचिकता व अनुकूलता दर्शवावी.
- जसे स्वतःला मत स्वातंत्र्य आहे तसेच ते दुसऱ्यालाही आहे याचा विचार करावा.


(लेखक उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत.)
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com