मतदार राजा....

मतदार राजा....

Published on

प्रासंगिक

मतदानाचा हा हक्क बजावताना आपण नागरिक असतो की, आणखी कोणत्यातरी समाजाचे स्त्री, पुरुष असे कोणीतरी असतो! आपण कोण म्हणून मतदान करतो? आपण नागरिक या एकमेव भूमिकेतून मतदान करणे अपेक्षित असताना आपण नेमके नागरिक तेवढे नसतो आणि भलतेच कोणीतरी असतो. कृपया आणखी कोणी नाही फक्त नागरिक म्हणून मतदान करा, ही कळकळीची विंनती.

- प्रतिनिधी

--------
मतदार राजा....

उद्या (ता. २०) महाराष्ट्रात पुढची पाच वर्षे कोण लोकप्रतिनिधी असणार हे ठरवण्यासाठी मतदार राजा मतदान करणार आहे. यामधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी स्वतःचे भले काहीही करून करतातच. त्यासाठी कोणत्याही खालच्या थराला जातात. हे सगळे जनतेच्या भल्यासाठी केले, असे मिरवतात आणि हताशपणे हे सगळे पाहणे आपल्या नशिबात येते. यावर उपाय करण्याची वेळ अखेर आली आहे आणि ही वेळ परत पाच वर्षे येणार नाही, याचे भान आणि जाणीव मतदान करताना असू दे.
मतदार नागरिकहो, मी इथे मतदार नागरिक या शब्दाचा जाणीवपूर्वक उपयोग करत आहे. मतदार हा एका दिवसाचा राजाबीजा असतो; पण तो कायमचा या देशाचा, राज्याचा, विधानसभा क्षेत्राचा नागरिक असतो. मतदार हा शब्द मतदानाच्या हक्काशी जोडलेला आहे, तर नागरिक हा शब्द नागरिक असणाऱ्या जबाबदारीशी जोडलेला आहे. जो नागरिक आहे, तो देशाचे कायदे, नियम वगैरे पाळतो त्याला संविधानाने निर्माण केलेल्या लोकशाही राज्यव्यवस्थेविषयी आदर असतो आणि ती सुदृढ, निकोप, निर्दोष व्हावी यासाठी तो सनदशीर मार्गाने प्रयत्नशील असतो. या व्यापक नागरिकत्वाचा एक भाग म्हणजे मतदार असणे होय. नागरिक असण्याची व्यापक कामे आणि जबाबदाऱ्या नीट पार पाडता याव्यात यासाठीचा एक जबाबदारीने बजावायचा हक्क म्हणजे मतदानाचा हक्क.
मतदार नागरिकहो, या निवडणूक प्रचारात तुमच्यावर फुकटच्या आश्वासनाची खैरात झाली आहे. सगळ्यांच्या खात्यात खाटाखट पैसे येतील, अशी आश्वासने सगळ्याच पक्षांनी दिली आहेत. हे पैसे तुमचेच आहेत. तुमच्याकडूनच कररूपाने जमा केलेले आहेत. आता समजा, तुम्हाला कोणी सांगितले की, तुमचे पैसे फुकट वाटा तर तुम्ही तयार व्हाल का? तुम्ही तुमची कमाई स्वतःचे, कुटुंबाचे जीवनमान उंचावायला वापराल की नाही! सरकार हे आपल्या पैशाचे विश्वस्त आहे. आपला कररूपाने गोळा केलेला पैसा जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी बांधील आहे.
मतदार नागरिकहो, सर्वच राजकीय पक्षांनी काही विशिष्ट घराण्यातले उमेदवार तुमच्यावर लादले आहेत. यातल्या बहुतेकांची पात्रता त्यांचे घराणे हीच आहे. जे उमेदवार चांगले, प्रामाणिक, काही किमान समज आणि सभ्यता असलेले आहेत त्यांना ते केवळ एका घराण्यातले आहेत म्हणून विरोध असण्याचे कारण नाही; पण मतदारांच्या निवडीच्या हक्काचा संकोच करणाऱ्या आणि पात्र कार्यकर्त्यांना संधी नाकारणाऱ्या राजकीय पक्षांच्या घराणेशाहीला एकच उत्तर आहे- घराण्यापलीकडे पात्रता नसणारे उमेदवार पडले पाहिजेत. निवडीचे पर्याय कमी आहेत; पण जे आहेत ते घेतले पाहिजेत.
मतदार नागरिकहो, तुम्ही राजकीय पक्षाला मतदान करत असता; पण आपला लोकप्रतिनिधी निवडत असता. हा लोकप्रतिनिधी कसा हवा, असे तुम्हाला वाटते? तुम्हाला घरात, कामावर नोकर ठेवायचा असेल तर तो किमान शिकलेला, सुसंस्कृत, ज्याच्यावर काही गुन्हे दाखल नाहीत, काही एफिशियंसी असणारा असा हवा असतो ना? मग लोकप्रतिनिधी निवडताना हे निकष का नाहीत बघायचे? बघायला हवेत ना! कृपया बघा.
मतदार नागरिकहो, संविधान हा मुद्दा सारखा चर्चेत आहे. असायलाही हवा; पण आता ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने नव्हे. हे संविधान ही राजकीय पक्षांची मक्तेदारी नाही. नागरिकांची हा देश कसा असावा, कसा चालावा याबाबतची संविधान ही एक निरंतर बांधिलकी आहे. संविधानाप्रमाणे वागण्याची आपली जबाबदारी तरी आपण जबाबदारीने पार पाडूया. मतदार नागरिकहो, ही जबाबदारी नीट पार पाडावी यासाठी तुम्हाला खरेच खूप शुभेच्छा. अनेकात विभागलेल्या आपल्या नागरिकांच्या सामुदायिक शहाणपणाचा अनुभव या आधी पण आलेला आहे तो पुन्हा येवो, अशी अपेक्षा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com