

26288
26289
निवडणुकीसाठी ‘कणकवली’ सज्ज
३३२ मतदान केंद्रे; २ हजार ३२४ कर्मचारी तैनात
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १९ ः विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (ता. २०) मतदान होत आहे. त्यासाठी कणकवली विधानसभा क्षेत्रात ३३२ मतदान केंद्रे तयार केली आहेत. या केंद्रांवर २ हजार ३२४ कर्मचारी, तसेच मतपेट्या आणि इतर साहित्य घेऊन ४५ एसटी बसेस आणि २० अन्य वाहनांमधून रवाना झाल्या.
कणकवली कॉलेजच्या पटांगणात कणकवली विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या कणकवली, वैभववाडी आणि देवगड या तीन तालुक्यांतील मतदान केंद्रावर रवाना होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सकाळी सातपासून सज्जता ठेवण्यात आली होती. त्यासाठी २० टेबलवरून या कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. सकाळी आठपासून कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशिनसह अन्य साहित्य देण्यात आले. दुपारी एकपर्यंत येथून बसेसच्या माध्यमातून मतदान केंद्रापर्यंत मतदान अधिकारी आणि कर्मचारी, तसेच पोलिस आणि होमगार्डसह मतदान यंत्रे पोहोचवली जात होती. एकूण ४५ एसटी बसेस आणि २० खासगी वाहनांच्या सहाय्याने ही मतदान यंत्रे पोहोचवण्यात आली.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, देवगड तहसीलदार संकेत यमगद, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण आदींसह अन्य अधिकारी व कर्मचारी कणकवली कॉलेजच्या पटांगणावरील केंद्रामध्ये उपस्थित होते. दरम्यान, विविध मतदान केंद्रांवर जाण्यासाठी कॉलेज रोडवर बसेस येत होत्या. तसेच मंगळवारचा आठवडा बाजार असल्याने येथे वाहतूक कोंडीची शक्यता होती. मात्र पोलिस यंत्रणेने चोख नियोजन केल्याने वाहतूक कोंडी टळली. कणकवली विधानसभा मतदारसंघात ३३२ मतदान केंद्रे आहेत, तर २ हजार ३२४ निवडणूक कर्मचारी यामध्ये मतदान केंद्रावरील बंदोबस्तासाठी होमगार्डसह ७०० पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. तसेच ४७ झोनल अधिकारी आदींचा समावेश आहे.
------------------
प्रवाशांची झाली गैरसोय
निवडणूक प्रक्रियेसाठी एसटी महामंडळाच्या ४५ बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बहुतांश गावांतील रात्रवस्तीच्या बस रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. सकाळची पहिली बस न आल्याने अनेक प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घेऊन शहर गाठावे लागले. यात आज कणकवलीचा आठवडा बाजार असल्याने शहरापर्यंत येण्यासाठी ग्रामीण भागातील ग्राहकांना मोठी कसरत करावी लागली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.