चिपळूण ःभाजीपाला, कलिंगड शेतीतून १५ कुटुंबांना रोजगार
26278
26279
भाजीपाला, कलिंगड शेतीतून १५ कुटुंबांना रोजगार
वेहेळेतील अन्नपूर्णा बचतगट ; १५ एकर जमीन दुबार ओलिताखाली
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ ः कोकणात शेती परवडत नसल्याची ओरड असतानाच तालुक्यातील वेहेळे-राजवीरवाडी येथील अन्नपूर्णा महिला बचतगटाने भाजीपाला आणि कलिंगड लागवडीतून उत्पन्नाचे साधन निर्माण केले. या गटाने गेल्या १० वर्षाच्या कालावधीत सुमारे ६० लाखाची उलढाल केली. शेतीमुळे या गटातील सुमारे १५ कुटुंबांचा आर्थिक प्रश्न सुटला आहे.
व्यावसायिक शेतीला चालना मिळण्यासाठी दिशांतर संस्थेने वेहेळ येथे महिलांचा शेतीगट स्थापन करून त्यांना पॉवरटिलर, मोबाईल राईस मिल, मळणी यंत्र, ठिबक, पंप, पाईप यांसह सेंद्रिय खत व कीडनाशक औषध निर्मिती अशा पद्धतीने सर्वतोपरी सहकार्य केले. त्याचबरोबर वैयक्तीक स्तरावर शेतकऱ्यांना फळभाज्या रोप व बियाण्यांचे वितरण करण्यात आले. त्याचा उपयोग करून महिला बचतगटांनी आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण केले. गावातील जमीन एक हजार रुपये एकर याप्रमाणे भाड्याने घेतले. १५ एकर जमीन दुबार ओलिताखाली आणण्यात आली. सहा महिन्यात मेहनत करून २० महिलांनी शेती केली. पालेभाजी, फळभाजी, कलिंगड यांची लागवड केली. पहिल्या वर्षी ६ लाख रुपये उत्पन्न मिळाले. त्यात २५ टन कलिंगड उत्पादन घेतले. सहकारातून शेती, सामुदायिक शेती, आता शेतीमध्ये केवळ महिलाच काम करतात म्हणून महिलांकृत शेती. रासायनिक खते आणि फवारण्याने मानवी आरोग्याला गंभीर प्रश्न निर्माण केला. एवढेच नव्हे तर जमिनीचा पोतदेखील बिघडला. त्यामुळे सेंद्रिय शेती आणि दलालमुक्त विक्री व्यवसायाचा निर्णय घेण्यात आला.
येथील सेंद्रिय भाजीपाल्याची चव आणि एकूणच शेतकऱ्यांनी उभारलेलं हे काम पाहण्यासाठी चिपळूण शहर आणि परिसरातील नागरिक, ग्रामस्थ यांना शिवार फेरी घडवण्यात आली. यापुढे शहरातील स्टॉलच्या मार्केटिंग अर्थात विक्री व्यवसायासाठी मोठा फायदा झाला. शिवारफेरीतील सहभागी मंडळींनी त्याचा मौखिक प्रचार आणि प्रसार केला. त्याचा परिणाम चिपळूण शहरामध्ये उभारलेल्या भाजीस्टॉलला प्रचंड प्रतिसादात झाला.
कोट
बचतगटातील महिलांना सहा महिन्यात मिळणाऱ्या उत्पनातील दीड लाख रुपये पुढील वर्षासाठी ठेवले जातात. त्यातून बियाणे किंवा अन्य साहित्य विकत घेता येऊ शकेल. उर्वरित रकमेतून जेवढे दिवस महिलांनी काम केले त्यांना तासाला २५ रुपयांप्रमाणे मजुरी दिली जाते. सहा महिन्यात प्रत्येक महिलेला १५ ते २० हजार रुपये मिळत होते. गतवर्षी त्यात वाढ झाली असून २० ते २५ हजार रुपये मिळाले आहेत.
- शुभांगी राजवीर, अध्यक्षा, अन्नपूर्णा महिला बचतगट
कोट
या गटाने दरवर्षीच्या रब्बी हंगामातील तीन ते चार महिन्यामध्ये सरासरी ६ लाखांची उलाढाल केली. ग्रामपंचायत, पंचायत समिती ते जिल्हा कृषी विभागापर्यंत विविध स्तरावर त्यांचा सन्मान झाला. महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई येथे राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. वेहेळे राजवीरवाडी येथील श्रम सन्मान कार्यक्रमावेळी २ लाख ९३ हजार ५१४ रुपयांचे वितरण गटात करण्यात आले.
- श्रुती राजवीर, सविता घाणेकर, बचतगट सदस्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

