

कोकणचा होणार सर्वांगीण विकास
प्रमोद जठार ः दोन लाख रोजगार निर्माण करू
कणकवली,ता. २४ ः राज्यात महायुतीला अभुतपुर्व असे यश मिळाले आहे. ‘एक है तो सेफ है’ या मोदी यांनी दिलेल्या संदेशाला राज्यासह कोकणातील जनतेने पूर्णतः सेफ कौल दिला आहे. आता केंद्रापासुन राज्यापर्यंत सर्वच सत्ता महायुतीच्या आहेत. त्यामुळे कोकणचा सर्वांगीण विकास होईल. पुढील पाच वर्षांत रत्नागिरी - सिंधुदुर्गात २ लाख रोजगार निर्माण होतील. उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद मिळवुन देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीत ठाकरे शिवसेना विलीन करावी, असा टोला भाजपचे विधानसभा निवडणूक समन्वयक, माजी आमदार प्रमोद जठार यांनी लगावला.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिडवणे सरपंच रवींद्र शेट्ये, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, बबलु सावंत, नरेंद्र भाबल आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग - रत्नागिरीत ६ आमदार महायुतीचे निवडुन आले आहेत. यापुर्वी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी होण्यासाठी खासदार निवडुन दिला. आता महायुतीचा मुख्यमंत्री होण्यासाठी कोकणातील जनतेने आमदार निवडुन दिले आहेत. जसे महायुतीला यश मिळालं तसं महाविकास आघाडीला का अपयश मिळाले? याबाबत लक्षात घेतले पाहीजे, ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा असे सांगत होते. त्यावेळी शरद पवार यांनी निकालानंतर ज्याचे जास्त आमदार येतील त्याचा मुख्यमंत्री असे वक्तव्य केले. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी, ठाकरे गटाच्या लोकांनी एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे काम केले. निवडणुकीत एकमेकांना पाडण्याची शर्यत लागली होती. काही ठिकाणी त्यांच्यातच बंडखोरी झाली. त्याचे पडसाद उमटले आहेत. राजापुरमध्ये अविनाश लाड यांनी बंडखोरी केली, त्यामुळे साळवी पराभूत झाले, असे मंतही श्री. जठार यांनी मांडले.
श्री जठार म्हणाले, महायुती सरकारने राज्यात गेल्या सहा महिन्यांत घोषणा करून अंमलबजावणीवर काम केलं. शेतकऱ्यांची विजबिल माफी, लाडकी बहीण योजनेचे थेट पैसे जमा केले. त्यामुळे लोकांना हे अंमलबजावणी करणारे सरकार दिसुन आले. मुख्यमंत्री पदासाठी भांडत राहीले नाहीत. त्यामुळेच महायुतीला राज्यात अनपेक्षीत बहुमत मिळाले.
--
नाणारसाठी प्रयत्न करणार
कोकणात खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे वादळ निर्माण करणार आहोत. महायुती आजपासून कामाला लागली आहे. नाणार प्रकल्प लोकांना नको असेल तर ज्याठिकाणी आवश्यक असेल तिथे होईल. शेतकरी तयार असल्यास खासदार राणेंच्या नेतृत्वाखाली ‘नाणार’साठी प्रयत्न केला जाईल. ठाकरे गटाने काँग्रेसकडे हिंदुत्व गहाण ठेवत बाळासाहेबांचा शब्द खरा केला आहे. त्यामुळे खरी बाळासाहेबांची विचारांची शिवसेना एकनाथ शिंदेंसोबत आहे, असेही श्री. जठार म्हणाले.
--
जिथे आहात तिथे सुखी राहा!
दीपक केसरकरांनी विशाल परबांचे आभार मानावेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अपक्ष विशाल परब यांनी घेतलेली मते ही माझ्या निवडणुकीप्रमाणे ना. दीपक केसरकर यांना चांगले मताधिक्य देणारी ठरली. जे माझ्या विरोधी पक्षात असलेले मित्र पराभुत झाले. त्यांनी आहात तिथे सुखी रहा, लोकांच्या कल्याणासाठी काम करा, असा सल्लाही श्री. जठार यांनी विरोधकांना दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.