

- rat३p२.jpg-
२४N२९००३
कापसाळ येथे महामार्गावर उभा असलेला गवा.
कापसाळ महामार्गावर गव्यांचा मुक्त संचार
चिपळूण शहराजवळ प्रथमच दर्शन; वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहराजवळील कापसाळ येथे मध्यरात्रीनंतर भल्यामोठ्या गव्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाला आहे. ग्रामीण भागात दिसणारा गवा शहराजवळ आल्यामुळे स्थानिक नागरिकांसह महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. महामार्गावर येऊन गवा काही काळ थांबून राहिल्यामुळे वाहनचालकांमध्ये धडकी भरली होती. या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. गवा महामार्गावर प्रथमच निदर्शनास आल्याने वन्यप्राण्यांचा चिपळूण शहरात वावर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
चिपळूण शहराला चारही बाजूने जंगलमय डोंगराने वेढलेले आहे. तीस टक्के डोंगरभागात उतारावर नागरी वस्ती आहे. त्यामागे जंगल परिसर आहे. शहर परिसरात वन्यप्राण्यांचा वावर अनेकवेळा निदर्शनास आलेला आहे. चिपळूण शहराजवळच महामार्गावर कामथे, कापसाळदरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास गवा वावरताना आढळला. रस्त्याच्या बाजूच्या जंगलातून तो अचानक रस्त्यावर आला. काही काळ तिथेच उभा राहिला होता. भलामोठ्या गव्याला पाहिल्यावर वाहनचालकांच्या मनात धडकीच भरली होती. काही वाहनचालकांनी लगेचच फोटो काढून सोशल मीडियावरही टाकले. महामार्गावर वाहनांची वर्दळ कमी होती. अधूनमधून वाहने ये-जा करत होती. थोड्या वेळाने तो महामार्गावरील बॅरिकेटस्वरून उडी मारून नजीकच्या झुडपात निघून गेला. नोकरी-व्यवसायानिमित्त परगावी असलेले किंवा आजुबाजूच्या परिसरातून चिपळूण शहरात रात्रीच्यावेळी दुचाकीने प्रवास करत असतात. त्यांच्यासाठी असे वन्यप्राणी निश्चितच धोकादायक ठरू शकतात. तो गवा कळपातून बाहेर पडून वाट चुकल्यामुळे महामार्गावर आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
---
गव्यासह बिबटे, मगरींचाही आढळ
चार ते पाच वर्षांपूर्वी चिपळूण शहरातील उक्ताड परिसरात डोंगरउतारावरील एका बंद घरामध्ये बिबट्या शिरला होता. तसेच सहा ते सात वर्षांपूर्वी एक गवा शहरातून मार्गक्रमण करत रामतीर्थ स्मशानभूमीमार्गे मुरादपूर, शंकरवाडी परिसरात आढळला होता. त्या वेळी मध्यरात्रीच्या सुमारास बिथरलेल्या गव्याने काही घरांच्या प्रवेशद्वारांची मोडतोड केली होती तसेच गांधारेश्वर नदी परिसरातून महामार्गावर नजीकच्या जंगलमय परिसरात निघून गेला होता. शहरातील विंध्यवासिनी देवी मंदिर परिसरातील जंगलात एक बिबट्याची मादी पाच बछड्यांसह आढळली होती. वनविभागाने काही काळ सीसीटीव्ही लावून तिथे माणसांचा वावर बंद केला होता तर लोकवस्तीत मगरींचाही वावर आहे. पावसाळ्यात एक मगर थेट पुलावरही आलेली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.