

खेड तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ
शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण ; खोपीत गायीवर हल्ला
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३ ः तालुक्यातील खोपी, मोहाने, ऐनवली, नानावले या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. खोपी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाली असून, अन्य गावामध्येही पाळीव जनावरांवर हल्ले सुरूच आहेत. या प्रकारामुळे ग्रामस्थ व शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
खेड तालुक्यामधील खोपी (चिरेखान) येथे बिबट्याने गाईवर हल्ला केल्याचा प्रकार पुढे आला आहे. खोपी येथील बाबाराम भिकाजी भोसले यांच्या मालकीची जर्सी गाय शेतात चरत होती. २७ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३०च्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून ठार मारली. ही बाब वनरक्षक अधिकारी यांना कळवण्यात आली. ही माहिती मिळाल्याबरोबर तत्काळ पंचनामा करून शासननिर्णयाप्रमाणे झालेली नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे वनविभागाकडून सांगण्यात आले. ती गाय ४० हजार रुपये किमतीची
होती. त्यामुळे मोठा फटका भोसले यांना बसला आहे तसेच या हल्ल्यामुळे शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. त्याचबरोबर तालुक्यातील मोहाने, ऐनवली, नानावले पंचक्रोशीतही बिबट्याने धुमाकूळ घातल्यामुळे ग्रामस्थ व शेतकरीवर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे. मोहाने गावच्या रहाटीमध्ये तीन-चार जनावरांचा तर ऐनवली मोहल्ल्यातील व नानावले येथील लहान वासरांचाही या बिबट्याने फडशा पाडला आहे. दुचाकीवरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनाही कधीही कुठल्याही वेळेत बिबट्याचे दर्शन घडते. त्यामुळे रस्त्याने पादचाऱ्यांची त्रेधा उडाली आहे. जोपर्यंत या बिबट्याचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत घराबाहेर न पडण्याचा विचार काही लोकांनी केला आहे; मात्र घरात बसून राहिलो तर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे काय, असा प्रश्नही ग्रामस्थांना पडला आहे.
------
वनविभागाचे दुर्लक्ष
तालुक्यातील ग्रामीण भागातील पाळीव जनावरांवरील बिबट्याच्या हल्ल्याची दखल घेऊन वनविभागाकडून तत्काळ कार्यवाही केली जावी, अशा मागणी निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी खेड वनविभागाकडे केली होती; मात्र खेड वनविभागाकडून दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे बिबट्याची दहशत कायम आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.