

-rat०३p३.jpg-
२४N२९००४
ओळी ः राज्य नाट्यस्पर्धेतील ‘चांदणी’ या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
-rat०३p४.jpg-
P२४N२९००५
ओळी ः दिग्दर्शक ः अजिंक्य केसरकर
---------
(२८ नोव्हेंबर टुडे २)
शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर
प्रकाश टाकणारे नाटक ''चांदणी''
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः शेतीला मिळणारा हमीभाव, महागाई, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे पाऊलही उचलावे लागते. राज्यात अनेक शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न रोहित पगारे लिखित चांदणी या नाटकातून सहयोग-रत्नागिरी या संस्थेने यशस्वी केला. येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात झालेले हे नाटक नेपथ्य, प्रकाशयोजना आणि कलाकारांच्या उत्तम अभिनयाने रंगतदार झाले. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले तर वेगळ्या प्रकारचे नेपथ्य रंगमंचावर साकारून रसिकांची वाहवा मिळवली.
चांदणी या नाटकाचे दिग्दर्शन अजिंक्य केसरकर यांनी केले होते. त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या नाटकाला रसिकांची दाद मिळाली. शेतकरी वडील आणि तरुण मुलगा यांच्या विचारातील फरक यातून उद्भवणारा संघर्ष या दोघांमध्ये दुवा म्हणून ठामपणे उभी राहणारी आई अशी नात्यांची गुंफण यांचे निरनिराळे आयाम चांदणी या नाटकातून उलगडण्यास संस्था यशस्वी झाली. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान, पिकांना नसलेला भाव, महागाई यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडते आणि त्यातूनच आत्महत्येची मानसिकता निर्माण होत असल्याचे सर्वश्रुत आहे. आत्महत्येला कारणं अनेक असतात; पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या या जणू काही नैसर्गिक आपत्तीच.
चांदणी नाटकाची सुरवातच ऊसाच्या मळ्यातून होते. मुलगा भरत्या वन्यप्राण्यांपासून ऊसाच्या मळ्याचे संरक्षण व्हावे यासाठी माच बांधून शेतात राखण करत असतो. वडील त्याच्या मदतीला येत असतात. आई संसाराचा गाढा ओढत असते; पण या दोघांमधील संघर्षाचा ती एक दुवा असते. भरत्या शेतावर असताना मोबाईल पाहात असतो. वडिलांना हे पसंत नसते. भरत्या शेतावरही वडिलांचा मार खातो तर घरी आल्यावरही मार खातो. आई मात्र दोघांवरही सारखंच प्रेम करत असते. पती पायांनी अधू आणि एक मुलगा हाच तिचा संसार; पण दोघांमधील अतूट नातं चांदणी या नाटकातून दाखवण्यात आले आहे. आई-वडिलांपासून दूर व्हावे असे मुलालाही वाटत नसते. वडिलांच्या माराला कंटाळून भरत्या घरातून जाण्याचा प्रयत्नही करतो. दोघेही कटाक्षाने एकमेकांमध्ये मिसळत असतात; पण त्यातील एक शल्य असते. वडिलांनी शेत सावकाराकडे गहाण टाकलेले असते; पण शेवटपर्यंत ते मुलाला सांगत नसतात; मात्र हसतखेळत कधी रागवून त्याच्याशी मिष्किलपणे वागून त्याला जगण्याची उमेद निर्माण करतात. वडील-मुलाचे प्रेम पाहताना रसिकांच्या डोळ्यातून अश्रूही अनावर होत होते. कालांतराने या दोघांमधील दुवा आईचा मृत्यू होतो. दोघेही ऊसाच्या मळ्यात असतात. पुन्हा दोघांचा प्रेमरहित संघर्ष होतो. त्या वेळी वडील मुलाला समजावताना सांगतात तुझ्या जन्माच्यावेळी पैसाअडका नसल्यामुळे शेत सावकाराकडे गहाण टाकले. या त्यांच्या बोलण्याने वडिलांना मिठी मारून भरत्या रडतो; पण त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ नयेत म्हणून प्रयत्नशील असतात. शेवटी शेतीचे रक्षण करत असताना वाघ येतो. त्याला पिटाळून लावत असताना मुलगा पुढे जातो. त्याचा जीव वाचावा म्हणून वडील वाघाच्या तोंडी जातात. अशी कथा ''चांदणी'' या नाटकातून साकारण्यात आली. दिग्दर्शन आणि नेपथ्य, कलाकारांच्या अभिनयाने नाटकाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.
------
* तंत्रज्ञ
लेखक-रोहित पगारे, पार्श्वसंगीत-शाहबाज गोलंदाज, विलास दाते, प्रकाशयोजना -साई शिर्सेकर, नेपथ्य -विनायक उर्फ जॉनी अपकरे. वेशभूषा -प्रदीप पेडणेकर, रंगभूषा-तुषार गिरकर, रंगमंच व्यवस्था-निरंजन सागवेकर, गायन- कश्मिरा सावंत-माणगावकर.
---
* पात्र परिचय
भरत्या-अजिंक्य केसरकर, बाप-दीपक माणगावकर, आई-श्रुतिका कदम.
------
* दिग्दर्शकाचे मत
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, पिकांना नसलेला भाव, महागाई यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडते आणि त्यातूनच आत्महत्येची मानसिकता निर्माण होते. या स्थितीची जाणीव व जनजागृती करण्यासाठी या चांदणी या नाटकाचा उद्देश होता. सहयोग नाट्यसंस्थेच्या माध्यमातून हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेला सादर झाले. कलाकारांचा अभिनय तसेच नेपथ्याला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. विषय रसिकांच्या मनापर्यंत पोहचल्याचे चित्र होते, असे मत दिग्दर्शक अजिंक्य केसरकर यांनी व्यक्त केले.
----
आजचा प्रयोग.
सादरकर्ते-खल्वायन-रत्नागिरी. नाटक-स्वप्नपक्षी. स्थळ-स्वा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी. वेळ-सायंकाळी सात वाजता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.