

सुक्या मेव्यासह फळांना वाढली मागणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता.७ : हिवाळ्यात फळांची आवक वाढतीच असते. आता बाजारात विविध प्रकारची फळे उपलब्ध झाली असून, आवक वाढल्यामुळे फळांचे दरही कमी झाले आहेत. सुक्या मेव्याप्रमाणेच फळांच्या खरेदीला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
हिवाळ्यात सुक्या मेव्यासह फळांचीही मागणी जास्त असते. त्याप्रमाणे शहरात सध्या फळांचा सुकाळ असून, बाजारात विविध प्रकारची फळे उपलब्ध आहेत. हिवाळी फळांपैकी एक असलेल्या पेरूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक असते. त्यातून प्रतिकारशक्ती वाढते. पेरूमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. हे फळ मधुमेह किंवा प्रीडायबिटीज असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. डाळिंबातही अँटिऑक्सिडंट असतात. त्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबरदेखील असते. हृदयाच्या आरोग्याला त्याचा फायदा होतो. सीताफळात व्हिटॅमिन बी ६चे प्रमाण मुबलक असते. यासह व्हिटॅमिन सी, फायबर आणि मॅग्नेशिअमदेखील असते जे रोग प्रतिकारशक्ती, पचन आणि स्नायूंच्या आरोग्यास मदत करते. यासह इतर हिवाळी फळेही शरीरासाठी उपयुक्त असल्याने त्याचा आहारात समावेश उपयुक्त ठरतो. त्यामुळे ग्राहकांकडूनही फळांच्या खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. संत्री, मोसंबी, सीताफळ, अननस, सफरचंद, पेरू, केळी, ड्रॅगन फ्रूट, चिकू, किवी, ग्रीन अॅपल, आवळा, डाळिंब अशी विविध फळे मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध झाल्याने नागरिकांना त्यांचा आस्वाद घेणे शक्य होत आहे. बाजारात फळांची मोठी आवक होत असल्याने दरदेखील आवाक्यात आहेत. सध्या सीताफळाचा दर २०० ते ३०० रुपये प्रतिकिलो आहे. संत्री १०० ते २०० रुपये किलो दराने मिळत आहेत. पेरू १०० रुपये किलो दराने मिळत असल्याचे फळविक्रेत्यांनी सांगितले.
---
कोट
हिवाळ्याची चाहूल लागताच बाजारपेठेत सीताफळांसह संत्र्यांची आवक वाढते. या फळांना दसरा, दिवाळीत मागणीही असते. सध्या रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेले सीताफळ ग्रामीण भागातून तसेच संत्री व मोसंबीही जिल्ह्याच्या विविध भागांतून येत आहे.
- सिकंदर शेख, फळविक्रेते, चिपळूण
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.