जातवैधता प्रमाणपत्रासाठी आर्थिक भूर्दंड

जातवैधता प्रमाणपत्रासाठी आर्थिक भूर्दंड

Published on

जातवैधता प्रमाणपत्रासाठी आर्थिक भूर्दंड

दीपक नागले ः दोनशेचा मुद्रांक खर्च एक हजार रुपये

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ७ ः कुणबी वा ओबीसी समाजातील व्यक्तींना जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रतिज्ञापत्र आणि शपथपत्र तयार करताना दोनशेऐवजी आता एक हजार रुपये मुद्रांक खर्चाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रतिज्ञापत्र व शपथपत्र साध्या कागदावर २० रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प लावून स्वीकारण्यात यावे, अशी मागणी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ग्रामीण शाखा राजापूरचे अध्यक्ष दीपक नागले यांनी केली आहे.
वाढलेला खर्च कमी करण्याची मागणी निवेदनाद्वारे राजापूर तहसीलदारांकडे करण्यात आली आहे तसेच सर्वसामान्यांना सहन कराव्या लागणाऱ्या आर्थिक भूर्दंडाकडे महसूल प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचेही नागले यांनी सांगितले. शैक्षणिक कामी वा अन्य कारणास्तव कुणबी वा ओबीसी समाजातील व्यक्तींना जातवैधता प्रमाणपत्र मिळवावे लागते. जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करताना त्यासोबत मुद्रांक पेपरवर प्रतिज्ञापत्र आणि शपथपत्र सादर करावे लागते. यासाठी यापूर्वी १०० रुपयांचा मुद्रांक पेपर चालत होता. त्यासाठी येणारा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्यातील होता; मात्र, शासनाच्या नव्या नियमामुळे प्रतिज्ञापत्र वा शपथपत्रासाठी १०० ऐवजी पाचशे रुपयांचा मुद्रांक वापरावा लागत आहे. त्यामुळे आता प्रतिज्ञापत्र वा शपथपत्रासाठी २०० ऐवजी १ हजार रुपये खर्च येत आहे. हा खर्च सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नसून, त्यांना त्याचा नाहक भूर्दंड सहन करावा लागत असल्याकडे नागले यांनी निवेदनाद्वारे महसूल प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
---
साध्या कागदावर शपथपत्र घ्या
एक हजार रुपयांच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र वा शपथपत्र घेण्याऐवजी २० रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावून साध्या कागदावर शपथपत्र आणि प्रतिज्ञापत्र घ्यावे, असे नागले यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला सूचित केले आहे. या प्रकरणी आमदार सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांची लवकरच भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com