सिंधुदुर्गात पाऊस रत्नागिरीतील बागायतदार धास्तावले

सिंधुदुर्गात पाऊस रत्नागिरीतील बागायतदार धास्तावले

Published on

रत्नागिरीमधील बागायतदार धास्तावले

सिंधुदुर्गात पाऊस ; हापूस कलमांवर कीडींचा प्रादुर्भाव, तीन दिवसात थंडीला आरंभ

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदार धास्तावले आहेत. मागील आठवड्यात सलग चार दिवस ढगाळ वातावरण राहिल्यामुळे हापूस कलमांवर कीडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषध फवारणी करावी लागत आहे. बंगालच्या उपसागरातील फेंगल चक्रीवादळाचे सावट हळूहळू दूर होत असल्यामुळे पुढील ३ दिवसात थंडीला पुन्हा सुरवात होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील फेंगल चक्रीवादळाचा दक्षिणेकडील राज्यांना पावसाचा तडाखा बसला. चक्राकार वारे आणि कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकत अरबी समुद्राकडे आले. त्यामुळे महाराष्ट्रातही मागील आठवड्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली होती. हिवाळ्याची चाहूल लागताच पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वत्र ढगाळ वातावरणासह तापमानही वाढले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यात ८.८ अंश सेल्सिअसवरून पारा चार दिवसात २१ अंशावर गेला. अचानक झालेल्या बदलाचा परिणाम आंबा, काजूवर झाला आहे. राजापुरात हलका पाऊस झाला आहे; मात्र कालपासून वातावरण निवळू लागले आहे. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव ओसरू लागला आहे; परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदार धास्तावले आहेत. मागील आठवड्यातील बदलत्या वातावरणामुळे मोहोरासह पालवीवर कीडीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पंधरा दिवसात सलग दोन ते तीनवेळा औषध फवारणी करावी लागली आहे.
राज्यात पुन्हा वातावरण बदलू लागले असून, गुलाबी थंडीला सुरवात होणार आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढणार आहे. कोकण कृषीविद्यापीठामधील हवामान विभागाकडूनही पुढीत ३ दिवसात थंडी सुरू होईल, असा अंदाज वर्तवला आहे तसेच पावसाचे वातावरण निवळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. फेंगल चक्रीवादळाच्या पार्भूमीवर सुमारे आठ दिवसांनी पुन्हा वातावरणात बदल होत असल्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांना दिलासा मिळू शकतो.
---
कोट
सिंधुदुर्ग परिसरात पाऊस पडला आहे; मात्र रविवारी दिवसभर रत्नागिरीतील वातावरण निवळलेले होते. सध्या हापूस कलमांना मोहोर वेगाने येत आहे. मागील आठ दिवसात ढगाळ वातावरण राहिल्यामुळे विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव झालेला होता. मोहोर कुरतडणाऱ्या कीडीही मोठ्या प्रमाणात दिसत होत्या. पुन्हा पाऊस पडला तर कीड पडण्याची शक्यता आहे.
- राजन कदम, आंबा बागायतदार
---
कोट
सध्या जिल्ह्यातील वातावरण निवळू लागलेले आहे. पुढील दोन ते तीन दिवसात पारा कमी होईल. मागील आठवड्यात किमान पारा अचानक वाढला होता. तापमान सरासरीपेक्षा कमी राहिल्यामुळे थंडीला पुन्हा सुरवात होईल.
- विजय मोरे, हवामान विभाग, कोकण कृषी विद्यापीठ
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com