मातोंडच्या विकासासाठी कधीही हाक द्या

मातोंडच्या विकासासाठी कधीही हाक द्या

Published on

30178

मातोंडच्या विकासासाठी कधीही हाक द्या

आमदार महेश सावंत ः देवी सातेरी मंदिरात ग्रामस्थांनी केला सत्कार

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ७ ः कधीही हाक द्या, मातोंडच्या विकासासाठी काहीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही माहिमचे नवनिर्वाचित आमदार तथा मातोंड गावचे सुपुत्र महेश सावंत यांनी मातोंड येथे आज दिली. मातोंड ग्रामपंचायत व गावातर्फे येथील ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिरात आज त्यांचा गावातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
आमदार सावंत म्हणाले, ‘‘माहीम मतदारसंघात धनवान उमेदवारांच्या विरोधात अटीतटीची लढाई होती. तरीही मातोंड गावची देवी सातेरी व श्री घोडेमुख यांचे नाव घेऊन प्रचाराला सुरुवात केली. जिथे जिथे मी प्रचाराला गेलो, तिथे मला गावातील लोकांचे नातेवाईक, मित्र परिवार भेटले. त्यांच्याकडून सकारात्मक पाठबळ मिळाले. मातोंडमधील मुंबईत राहणारी मंडळी तर माझ्यासोबत प्रचारालाही वेळ काढून यायची. मी मुंबईला आमदारकीसाठी उभा असलो तरी माझ्यावर माझ्या गावाचे पूर्ण लक्ष होते. मी आमदार व्हावे, ही लोकांची इच्छा होती. गाववासीयांनी दिलेली साथ व त्यांच्या प्रेमामुळेच ही मोठी लढाई मी जिंकू शकलो.’’
यावेळी मातोंड ग्रामपंचायत, ग्रामस्थ, श्री देवी सातेरी देवस्थान कमिटी व गावकर मंडळींच्यावतीने आमदार सावंत यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, प्रमुख गावकर उदय परब, रमाकांत परब, सरपंच मयुरी वडाचेपाटकर, उपसरपंच आनंद परब, माजी पंचायत समिती उपसभापती प्रफुल्लचंद्र परब, दादा म्हालटकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम परब, ग्रामपंचायत सदस्य दीपेश परब, सुजाता सावंत, विशाल बागायातकर, राहुल प्रभू, महेश वडाचेपाटकर, रविकिरण परब, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, भाजपच्या सावंतवाडी महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, डॉ. कांडरकर, माजी उपसरपंच सुभाष सावंत आदी उपस्थित होते.
--
गावासाठी सदैव तत्पर
आमदार सावंत म्हणाले, ‘‘माझ्या गावात झालेल्या घरच्या सत्काराने भाराऊन गेलो. मातोंड गावचा सुपुत्र आमदार होऊन विधानसभेत गेला आहे. त्यामुळे गावच्या विकासासाठी कोणतीही कमी पडू देणार नाही. यापूर्वी मातोंड सावंतवाडा येथे माझा पहिला सत्कार करण्यात आला. सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा मुंबईत नगरसेवक ते आमदार झाला, हा मातोंड गावाचा बहुमान आहे. कधीही हक्काने हाक द्या, गावासाठी सदैव तत्पर राहीन.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com