लायन्स डायलिसिस सेंटरमध्ये मोफत डायलिसिस सुविधा
‘लायन्स’मध्ये मोफत डायलिसिसची सुविधा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : वाढती रुग्णसंख्या आणि डायलिसिसची आवश्यकता पाहता लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टने डायलिसिसची सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेतला. चालू महिन्यापासून याचा लाभ रत्नागिरीमधील रुग्ण घेऊ शकतात. एका रुग्णाची आठवड्याला दोन डायलिसिस मोफत करण्यात येणार आहेत. पुढील डायलिसिससाठी अत्यल्प शुल्क आकारण्यात येणार आहे.
वाढते मधुमेही रुग्ण आणि वेदनाशामक औषधे यांचा अतिरेकी वापर, तसेच स्टेरॉईड्सच्या गैरवापरामुळे किडनी फेल्युअरचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा रुग्णांमध्ये डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण करणे, हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. बहुतांश रुग्णांना किडनी प्रत्यारोपण करणे शक्य होत नाही व परवडणारे नसते. त्यामुळे ‘हिमोडायलिसिस’ करणे हाच पर्याय राहतो. ज्या गरीब रुग्णांना आठवड्यातून दोन-तीन वेळा डायलिसिस करणे आवश्यक असते, ते आर्थिक अडचणींमुळे कसेबसे आठवड्यातून एकदाच डायलिसिस उपचार करतात. या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रत्नागिरीतील सुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळेच लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टने ही सुविधा ‘लायन्स’च्या माध्यमातून देण्याचे नक्की केले. अत्यंत किफायशीर दरात ही सुविधा दिली जाणार असल्याचे लायन्स क्लबने सांगितले.
फेब्रुवारी-२०२४ मध्ये डायलिसिस सेंटरची सुरवात झाली. आतापर्यंत अत्यल्प दरात डायलिसिस सुविधा देण्यात येत होती. थोड्याच कालावधीत महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मान्यता मिळाल्यावर ही सुविधा पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे. डायलिसिसची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांनी लायन्स डायलिसिस सेंटरमधील सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर, कार्याध्यक्ष डॉ. शैलेंद्र भोळे, सचिव पराग पानवलकर, सहसचिव आणि डायलिसिस सेंटर प्रकल्प चेअरमन ओंकार फडके यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

