गडनदी पात्रातील पाणी साठ्यात मोठी घट
30867
गडनदी पात्रातील पाणीसाठ्यात मोठी घट
केटी बंधाऱ्यात पाणी अडविण्याची तालुकावासीयांना प्रतीक्षा; पाटबंधारेकडून निविदा जाहीर
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ११ : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या असल्या, तरीही गडनदीपात्रातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. नदीपात्रातील पाण्यावरच कणकवलीसह बहुतांश गावांच्या नळयोजना अवलंबून आहेत. त्यामुळे नदीपात्रातील केटी बंधाऱ्यामध्ये पाणी अडविण्याची मागणी नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून होत आहे.
दरम्यान, गडनदीपात्रातील ९ बंधाऱ्यांमध्ये पाणी साठवण करण्याबाबत लघु पाटबंधारे विभागाने निविदा मागविल्या आहेत. येत्या १६ डिसेंबरला या निविदा उघडल्या जातील. त्यानंतर ठेकेदार निश्चिती होऊन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून नदीपात्रातील केटी बंधाऱ्यामध्ये पाणी साठवण होण्याची शक्यता आहे.
गडनदीपात्रातील कनकनकगर येथील बंधाऱ्यावर कणकवली नगरपंचायत आणि लगतच्या हळवल गावची नळयोजना अवलंबून आहे. त्याचप्रमाणे सांगवे, नाटळ, शिवडाव, हरकुळ, वागदे, कलमठ, आशिये, वरवडे आदी गावांच्या नळ योजना गडनदीपात्रातील बंधाऱ्यांमध्ये साठणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहेत.
डिसेंबर अखेरपर्यंत जर गडनदीपात्रातील बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा झाला, तर मे अखेरपर्यंत कणकवली शहरासह लगतच्या सर्व गावांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होतो. मात्र, केटी बंधाऱ्यातील प्लेटमध्ये रबर टाकून पाणी बंद केले जात नाही. यात अनेक बंधाऱ्यांना दरवर्षी गळती लागते. त्यामुळे एप्रिलमध्येच बंधाऱ्यातील पाणीसाठा संपुष्टात येतो आणि तालुकावासीयांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे यंदा तरी गडनदीपात्रातील बंधाऱ्यांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणी साठा व्हावा, अशी अपेक्षा तालुकावासीयांची आहे.
यंदा मुबलक पाऊस झाल्याने कणकवली शहरालगतच्या गड आणि जानवली नदीपात्रात सध्या मुबलक पाणीसाठा आहे. यातील फक्त गडनदीपात्रातच केटी बंधारे उभारले आहेत, तर जानवली नदीपात्रात कच्चे बंधारे बांधून तेथील ग्रामपंचायतींकडून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला जातो.
दरवर्षी एप्रिलपासून तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होत असल्याने लघु पाटबंधारे विभागाने गडनदीपात्रातील केटी बंधाऱ्यांमध्ये निडल्स टाकून पाणी साठवण करण्याबाबत निविदा जारी केली आहे. यात गडनदीपात्रातील १, ३, ४, ६, ७, ९, ११, १२ आणि १३ या क्रमांकांच्या बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा होणार आहे. त्यासाठी २१ लाख ४ हजार रुपये मंजूर केले आहेत, तर १६ डिसेंबरला निविदा उघडल्या जाऊन ठेकेदाराची निश्चिती होणार आहे.
चौकट
तातडीने पाणी अडविण्याची मागणी
डिसेंबर अखेरपर्यंत कणकवली शहरातील कनकनगर आणि मराठा मंडळ येथील बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा होणे आवश्यक आहे. जर पाणी साठवणूक करण्यासाठी जानेवारी उजाडला, तर येथील बंधाऱ्यांमध्ये पुरेसा पाणीसाठा होणार नाही. परिणामी एप्रिलपासूनच शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे केटी बंधाऱ्यातील पाणी साठवण निविदांना मंजूरी मिळाल्यानंतर तातडीने कणकवली शहरातील कनकनगर आणि मराठा मंडळ येथील बंधाऱ्यात पाणीसाठा व्हायला हवा. त्याबाबतची मागणी लघु पाटबंधारे विभागाकडे केली असल्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

