अच्युतकाका -कोकण ते काश्मीर व्हाया कराची

अच्युतकाका -कोकण ते काश्मीर व्हाया कराची

Published on

लाल मातीतील अर्क-अर्कट------लोगो
(५ डिसेंबर टुडे ३)
गरिबीतच तुमच्या कर्तृत्वाची मुळे जास्त घट्ट होतात. उपजत श्रीमंती तुम्हाला पांगळी बनवते, ज्योतिष कधी बघू नये, तुमचं भविष्य ग्रह आणि राशी नाहीतर तुमचंच मनगट घडवत असतं, हे काकाच्या आयुष्याचं सूत्र होतं. आमच्या घरी, कोकणात दरवर्षी अच्युतकाका राहायला येई. कराचीपासून फिरून मुंबईत येऊन स्थिरावला तरी कोकणावरचं त्याचं प्रेम कधी कमी झालं नाही.

- rat११p५.jpg
P24N30860
राजा बर्वे

----------

अच्युतकाका-कोकण ते
काश्मीर व्हाया कराची

कोकणात तुम्ही चालायला सुरवात करा किंवा गाडीत बसून प्रवासाला सुरवात करा, तुम्ही पन्नास फूट सरळ चालू शकणार नाही. खाचखळगे, छोटे डोंगर, दऱ्या, नागमोडी घाट असं सगळं पार करत तुम्हाला प्रवास करावा लागतो. अलीकडे गेल्या पंचवीस वर्षात कोकणातलं जगणं थोडं सुसह्य झालं असलं तरी अजून रस्त्यावरचे खड्डे आणि खड्ड्यातले रस्ते पूर्वीचे कोकण आणि इथलं जीवन कसे असेल, याची साक्ष देत असतातच. कोकणात पाऊणशे शंभर वर्षांपूर्वी जन्म घेतलेल्या माणसाच्या आयुष्याचा प्रवास तर कधीच सरळ होतं नव्हता.
माझं मूळ गाव खेड तालुक्यातलं तळघर, नाव तळघर असलं तरी आहे मात्र डोंगरावर. इथे माझे वडील आणि भाऊ जन्माला आले. पुढे आयुष्याच्या शोधात कुठे कुठे जाऊन स्थिरावले. याच सदरात मी माझ्या एका काकांचं व्यक्तीचित्र सादर केले होते आणि आज आता दुसऱ्या काकांबद्दल. कोकण ते लाहोर, श्रीनगर ते मुंबई व्हाया पुणे असा प्रवास करून मग मनमौजी आयुष्य जगलेल्या या एका कोकणी अवलियाची गोष्ट.
आमच्या घरातला हा अच्युतकाका जन्माला आला तो गोपाळरावांचा तिसरा मुलगा म्हणून. आधी दोन भाऊ, दोन बहिणी अशी चार मुले. अच्युतकाकाला एकूण तीन बहिणी आणि पाच भाऊ. गोपाळराव काही अगदी सधन नसले तरी खाऊनपिऊन सुखी कुटुंब; परंतु शिक्षणाची सोय मात्र नव्हती. भावंडांमध्ये अच्युत अगदी वेगळा. गोरा रंग, निळे घारे डोळे, बडबड्या स्वभाव. आईची माया तोडून गोपाळरावांनी त्याला मराठी चौथीनंतर पुण्यास मेहुण्याकडे, माधवकडे शिकायला ठेवले. जेमतेम सातवी झाली आणि अच्युतचे शिक्षण आटोपले. माधवची बायको अच्युतचा दुस्वास करत असे कारण, तिची दोन मुले यथातथाच होती. अच्युत मात्र पुण्यातसुद्धा कॉलनीत सगळ्यांचा लाडका. पुढे पुढे ती फार त्रास देई. "नुसता खायला कार आणि भूईला भार नको, यापुढे चार पैसे कमवा आणि शिका हवं तर. इथे मामाची जहागिरी उतू जात नाहीये." मामीचे हे शब्द ऐकले आणि अच्युत आमुलाग्र बदलला. शाळेच्या समोर बेडेकर पेंटर म्हणून त्या काळी पुण्यात प्रसिद्ध दुकान होते. अच्युत सरळ बेडेकरांना भेटला आणि काम मागितले. देखण्या अच्युतला बेडेकरांनी बॅनर रंगवणे, साईन बोर्ड पेंटिंग अशी कामे शिकवली. त्या काळी थिएटर मालक हातगाडीवर दोन्ही बाजूला बॅनर लावून ती हातगाडी बाजारात, वस्तीत फिरवून सिनेमाच्या जाहिराती करत असत. बेडेकरांना खूप काम. अच्युतचा हात सफाईने चालू लागला. अच्युतचे शाळेकडे आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन शाळा जेमतेम सातवीनंतर सुटली ती कायमची. अच्युत पूर्णवेळ बेडेकर पेन्टरांकडे नोकरी करू लागला.
काही दिवस असेच गेले. बेडेकर पेंटरांकडे एक सिंधी माणूस येत असे. त्याचा पुण्यात कापडाचा मोठा व्यापार होता. कराचीमध्येदेखील त्याचा घाऊक व्यापार होता. त्या वेळी फाळणी झाली नव्हती. त्याला देखणा आणि हुशार अच्युतकाका आवडला होता. एक दिवस त्याने अच्युतला विचारले, "इथे किती दिवस काम करणारेस रे० कराचीला येतोस का० माझ्या तिथल्या व्यवसायात तुला नोकरी देतो, चांगला पगार देतो." अच्युतला एकदा घर सोडल्यावर पुणे काय आणि कराची काय दोन्ही सारखंच होतं शिवाय तिथे मामीच्या त्रासाला तो कंटाळला होताच. अच्युतने आपली वळकटी पुण्यातून उचलून थेट कराचीत पसरली आणि लवकरच आपल्या हुशारीने कराचीत आपले बस्तान बसवलं. वर्षभर काम केल्यावर या धंद्यात पैसा आहे, हे अच्युतच्या हळूहळू लक्षात आलं. त्याने नोकरीसोबत हळूहळू स्वतःचा छोटा कापड व्यवसाय सुरू केला. शाळेतल्या धड्यांपेक्षा उघड्या जगातले अनुभवाचे धडे काकाने जास्त गिरवले होते. त्यामुळे लोकांशी गोड, आवडेल असे बोलणे तो पटकन शिकला आणि जोडीला सुंदर देखणे व्यक्तीमत्व त्यामुळे धंद्यात त्याचा पटकन जम बसला.
दरम्याने, स्वातंत्र्य, फाळणी, दंगली सुरू झाल्या. रोज हिंदू-मुस्लिम दंगे, अत्याचार याच्या बातम्या येऊ लागल्या. हुशार अच्युतने वेळीच सावध होऊन तीन हजारात आपला धंदा विकला आणि तो फाळणीमुळे श्रीनगरला, भारतात आला. तिथे परत तोच कापड, स्वेटर व्यवसाय सुरू केला. वर्षभरात चांगले पैसे मिळवले. दरम्याने, दंगलीचे लोण इकडेदेखील पसरले. श्रीनगरमध्ये हिंदू पंडितांवर अत्याचार सुरू झाले आणि तिथला गाशा गुंडाळून अच्युतने मग मात्र तडक मुंबई गाठली. मुंबई गाठीपर्यंत त्याने आयुष्याची पंचवीशी गाठली होती. हातात थोडा पैसा होता; पण इथे मुंबईत काय करायचं० अच्युतकाकाने आपला पहिला गिरवलेला साईन बोर्ड पेंटिंग धंदा उघडला. रानडे रोडवर एक गाळा भाड्याने घेतला आणि थिएटर मालकांशी संधान बांधून दादर ते कुलाबा आणि दादर ते बांद्रा अशा दोन-तीन पोरे कामाला ठेवून हातगाडीवर सिनेमाच्या जाहिराती करू लागला. मुंबईने मात्र अच्युतला स्थैर्य दिले. दोन लग्नं झाली, संसार झाला, मुळेबाळे झाली. शिवाजी पार्कजवळ मोठा फ्लॅट घेतला. पुढे दूरदर्शन आले आणि जाहिरातीचा धंदा आटत गेला. काळाची पावले वेळीच ओळखून अच्युतकाकाने बॅनर बनवण्याच्या जोडीला रबर स्टॅम्प बनवणे सुरू केले. त्यातही चांगला जम बसवून तोच उत्तम व्यवसाय पुढे आयुष्यभर केला.
सातवी शिकलेल्या अच्युतकाकाचा सिनेमा आणि उद्योगक्षेत्रातल्या मोठमोठ्या लोकांशी संपर्क येई. बोलता बोलता काका उत्तम इंग्रजी बोलू लागला. काकाचे राहणीमान राजेशाही होते. देखण्या व्यक्तीमत्वामुळे त्याची पटकन छाप पडे. अच्युतकाका कायम पॅन्ट आणि कोट वापरत असे आणि त्यात तो थेट राज कपूरसारखा देखणा दिसत असे. त्या काळी दादर आणि शिवाजीपार्क परिसर खूप सुंदर होता. इथे त्या काळातले खूप मोठमोठे कलावंत, उद्योगपती, नाटक, सिनेमाक्षेत्रातले लोक राहात. बऱ्याचजणांशी अच्युतकाकाची मैत्री होती. काकाला रसगुल्ले फार आवडत. दर आठवड्याला एक बंगाली माणूस मोठ्या डब्यातून रसगुल्ले विकायला येत असे. काका त्याचे कायमचे गिऱ्हाईक. आम्ही सुट्टीत मुंबईला गेलो की, आमची मजा असे. शिवाजी मंदिर, प्लाझा इथे नाटके, सिनेमे आम्हाला काका प्रेमाने दाखवी. क्रॉफर्ड मार्केटला खरेदीला, सिद्धिविनायकाला सोबत नेई.
लहानपणी ज्या मामीने त्याला आश्रित म्हणून त्रास दिला. तिला दरवर्षी हटकून साडी, मामाला पायजमा, शर्ट कापड घेऊन भेटायला जाऊन पाया पाडून येई. सुरवातीला अतिशय कष्टप्रद आणि नंतर विलासी आयुष्य जगलेला आमचा अच्युतकाका हा कोकणातून कोकणी माणूस बाहेर पडला की, त्याची कशी प्रगती होते याचे जिवंत उदाहरणच होता..

(लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com