नुसता अभिमान नको, चांगले साहित्य वाचा

नुसता अभिमान नको, चांगले साहित्य वाचा

Published on

- rat११p१८.jpg
P२४N३०८८५
ः लांजा ः विजेत्यांना गौरवताना मान्यवर.

मराठीचा नुसता अभिमान नको, चांगले साहित्य वाचा

अ‍ॅड. विलास कुवळेकर ः लेख स्पर्धेत बाबू घाडीगावकर प्रथम

सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ११ ः मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे; पण मराठीचा नुसता अभिमान बाळगून उपयोग नाही. त्यासाठी प्रत्येकाने चांगले साहित्य वाचले पाहिजे, चांगल्या मराठीत बोलले पाहिजे तरच पुढच्या पिढ्यांवरही त्या संस्कारांचे बीजारोपण होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. विलास कुवळेकर यांनी केले.
''कोकणातील ग्रामदेवता'' या विषयावर घेण्यात आलेल्या अशोक प्रभू स्मृती लेख आणि चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरणात ते बोलत होते. येथील लोकमान्य वाचनालयात हा समारंभ झाला. लोकमान्य वाचनालय या कार्यक्रमाचे सहआयोजक होते. अ‍ॅड. कुवळेकर म्हणाले, कोणतीही भाषा चांगलीच असते. जिला आपली भाषा म्हणतो त्या भाषेतील आपण काय वाचतो, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. लेकरांनीच आपल्या आईचा गौरव करायला पाहिजे. मराठीत खूप काही वाचण्यासारखे आहे. मराठीचा अभिमान बाळगतो; पण एक वाक्य चांगल्या मराठीत बोलता येत नाही, अशी स्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ती बदलायला हवी. साहित्य संस्कार देते. आजूबाजूच्या वाचक-लेखकांनी एकत्र जमून भाषेविषयी काही उपक्रम राबवले पाहिजेत. कोकणी माणूस मुळात गूढ आहे. खानोलकर, दळवींचे लेखन वाचल्यास आणि बाळकृष्ण प्रभुदेसाईंच्या कथांतून कोकणी माणूस कसा आहे ते कळते, असेही त्यांनी सांगितले.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष आणि ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांचे प्रवर्तक सुभाष लाड कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. कोकण मीडियाने कोकणच्या वैशिष्ट्यांचे ब्रँडिंग करून कोकणाचे महत्व अधोरेखित करणारा दिवाळी अंक म्हणून मानाचे स्थान पटकावल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. वाचनालयातर्फे विजय बेर्डे यांनी आपले विचार मांडले. संपादक प्रमोद कोनकर यांनी प्रास्ताविक केले. लेख स्पर्धेचे परीक्षण केलेले ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर तसेच स्पर्धेतील विजेते बाबू घाडीगावकर आणि विराज चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. विजय हटकर यांनी सूत्रसंचालन तर अनिकेत कोनकर यांनी आभारप्रदर्शन केले. या वेळी उमेश केसरकर, विनोद बेनकर, विजयालक्ष्मी देवगोजी, जयराज मांडवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
----
पारितोषिक वितरण
लेख स्पर्धेत बाबू घाडीगावकर (प्रथम), विराज चव्हाण (द्वितीय) तसेच चित्रकला स्पर्धेत सुयोग रहाटे, साहिल मोवळे या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. लेख स्पर्धेतील विजेत्या स्वानंदी जोगळेकर यांच्यावतीने त्यांच्या वडिलांनी पारितोषिक स्वीकारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com