''डिजिटल अँरेस्टर''पासून सावध रहा

''डिजिटल अँरेस्टर''पासून सावध रहा

Published on

swt117.jpg
30928
कुडाळः येथे जनजागृती कार्यशाळेत मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल. व्यासपिठावर डॉ. रुपेश चौधरी, राजेंद्र मगदूम, अविनाश वालावलकर आदी. (छायाचित्रः अजय सावंत)

''डिजिटल अँरेस्टर''पासून सावध रहा
सौरभ कुमार अग्रवालः कुडाळातील जनजागृती कार्यशाळेत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ः सद्यस्थितीत ''डिजिटल अँरेस्टर'' हा नवीन प्रकार पुढे आला आहे. यात फोन करणारी व्यक्ती आपण पोलिस अधिकारी असल्याचे भासवत लोकांची फसवणूक करतात. यात सुशिक्षित लोकही बळी पडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारापासून सावध रहावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केले.
कुणीही ओटीपी किंवा व्यक्तिगत माहिती इतरांना शेअर करु नका, असे त्यांनी यावेळी सांगितले. सिंधुदुर्ग पोलिसांच्यावतीने जिल्ह्यात सायबर, अंमली पदार्थ जनजागृती कार्यशाळा आयोजन केले आहे. सोमवार (ता.१६) पर्यंत हे अभियान सुरु राहणार आहे. येथील आरएसएन हॉल येथे काल (ता.१०) ही कार्यशाळा आयोजित केली होती. यात श्री. अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर डॉ. रुपेश चौधरी, सिंधुदुर्ग क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक सुरज पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, अविनाश वालावलकर, डॉ. रुपेश धुरी आदी उपस्थित होते.
श्री. अग्रवाल म्हणाले, ‘‘आम्ही सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे पाच डिसेंबरपासून हे अभियान सुरु केले आहे. सोळापर्यंत ते सुरु राहणार आहे. यात तीन विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सध्या आम्ही ‘सायबर सिक्युरिटी’ या विषयावर अधिक लक्ष केंद्रित केला आहे. आताच्या युगात मोबाईल, इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या तंत्रज्ञान युगात जेवढे सर्व सोपे झाले आहे, तेवढेच धोकादायक आहे. फसवणूकीच्या गुन्ह्यात तर दिवसेंदिवस वाढ होत आहे.
यात आता ‘डिजिटल अँरेस्टर’ या नवीन प्रकाराची भर पडली आहे. यात एखाद्या व्यक्तीच्या मोबाईलवर फोन केला जातो. समोरची व्यक्ती आपण पोलिस अधिकारी असल्याचे भासवते व लोकांची फसवणूक करते. यात सुशिक्षित लोकही बळी पडत आहेत. हा सर्वात गंभीर प्रकार आहे. या प्रकारामध्ये ज्या पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हेगारांना अरेस्ट करण्याचा अधिकार आहे, ते सुद्धा त्यांना डिजिटल अरेस्ट करु शकत नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात जवळपास २५ ते ३० हजार लोकांपर्यंत हा उपक्रम नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी या उपक्रमाचे नियोजन चांगल्या प्रकारे केले आहे. नागरिकांनी या सगळ्यांपासून सावध राहावे. कुणीही ओटीपी किंवा व्यक्तिगत माहिती इतरांना शेअर करु नये.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘अलीकडे युवा पिढी गांजा, चरस अशा गोष्टींकडे आकर्षित होत आहे. महाविद्यालयीन युवकांबरोबर असे प्रकार जास्त प्रमाणात घडत आहेत. याबाबत कुणाला माहिती मिळाल्यास ती पोलीसांना द्यावी.’’
श्री. पाटील म्हणाले, ‘‘आताचे युग हे सायबर युग आहे. सगळ्यांमध्ये इंटरनेटचा वापर आहे. आपला सिंधुदुर्ग जिल्हा आपला जरी लहान असला तरी सायबर क्राईम, नशेच्या बाबतीत सुटलेला नाही. यावर मात करण्यासाठी जनजागृती हेच मोठे व्यासपिठ आहे. त्या अनुषंगाने आम्ही या लढाईला सुरुवात केलेली आहे. एखादी वस्तू ऑनलाईन मागवायची असल्यास ती अधिकृत अॅपवरुनच मागवा. कोणतीही लिंकओपन करुन एपीके फाईल डाऊनलोड करु नका. पूर्वी ओटीपीची पध्दत होती, आता ओटीपी आवश्यक नाही. अंकामधील पासवर्ड हॅकर्स शोधतात म्हणून अक्षरे ठेवून स्ट्राँग पासवर्ड तयार करा.’’ यावेळी डॉ. धुरी यांनीही मार्गदर्शन केले. निवेदन अविनाश वालावलकर करुन शेवटी आभार मानले.

चौकट
सिंधुदुर्गात ५०० जणांना सायबर क्राईमचा फटका
आपल्या जिल्ह्यात ५०० लोकांना सायबर क्राईमचा फटका बसला आहे. त्यामुळे याबाबत जनजागृती करणे काळजी गरज आहे. या जगामध्ये कोण सुरक्षित आहे तर तो इंटरनेटपासून लांब असलेला आहे. त्यामुळे कोणतीही लिंक आपल्या मोबाईलवर आल्यास त्यावर क्लिक करु नका. आपला मोबाईल किंवा लॅपटॉप हा जर कुठल्या अनोळख्या वायफाय नेटवर्कमध्ये आल्यास तो हॅक होऊ शकतो, असे सिंधुदुर्ग क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक सुरज पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com