सेवानिवृत्त माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांचे निधन
31018
निवृत्त माहिती उपसंचालक
डॉ. संभाजी खराट यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ११ ः माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांचे बेलापूर, नवी मुंबई येथील नाणेश रुग्णालयामध्ये निधन झाले. ते ३१ जानेवारी २०२३ ला उपसंचालक (माहिती) विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथून निवृत्त झाले होते.
डॉ. खराट यांच्या नोकरीची सुरुवात कोल्हापूर येथूनच झाली होती. १९९८ ला ते विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथे सहायक संचालक पदावर रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी व ठाणे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून तर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई येथे वरिष्ठ सहायक संचालक म्हणून सेवा बजावल्यानंतर पदोन्नतीने ते १० ऑक्टोबर २०२१ ला उपसंचालक (माहिती) विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथे रुजू झाले होते.
डॉ. खराट अत्यंत वाचनप्रिय, उत्कृष्ट संपादन कौशल्य असलेले लेखन म्हणूनही परिचित होते. ते महात्मा फुले यांचे अभ्यासक होते. उत्कृष्ट वाङमय निर्मितीसाठी त्यांना शासनाचे दोन पुरस्कार, उत्कृष्ट पुस्तकासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा पुरस्कार, डॉ. आंबेडकर पुरस्कार, शब्दशिल्प पुरस्कार तसेच चौथा स्तंभ पुरस्कारासह अन्यही पुरस्कार मिळाले आहेत. युवकांसाठी साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना केंद्र शासनाचा नेहरू युवा पुरस्कारही प्राप्त झाला होता. लातूर येथे फेब्रुवारी २०१३ मध्ये झालेल्या आठव्या सत्यशोधकी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात रुजू होण्यापूर्वी त्यांनी औरंगाबाद येथील दोन दैनिकांमध्ये मुख्य उपसंपादक म्हणून काम केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात पाच वर्षे मानद प्राध्यापक म्हणून सेवा बजावली होती. त्यांनी अनेक विषयांवर लेखन व माहितीपटांची निर्मिती केली होती. राज्य शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम पाहिले होते. अनेक वृत्तपत्रांच्या पुरवण्यांसाठी, दिवाळी अंकांसाठी लेखन केले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

