ए.जी. हायस्कूलचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत

ए.जी. हायस्कूलचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत

Published on

ए. जी. हायस्कूलचे
तिघे गुणवत्ता यादीत

दापोली ः दापोली शिक्षणसंस्था संचलित ए. जी. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी २०२३-२४ या वर्षांमध्ये झालेल्या नॅशनल फायनान्शियल लिटरसी असेसमेंट टेस्टमध्ये आयुष बिवलकर, स्वराज मांजरे, निरंजन शिगवण हे आठवीमधील विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. अकरावी वाणिज्य शाखेतील २६ विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येते. या द्वारे विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरता शिकवली जाते आणि आर्थिक निर्णय घेण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यात मदत होते. यामध्ये ७५ बहुपर्यायी प्रश्न ६० मिनिटांसाठी सोडवण्यास दिले जातात. चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग असते. ही परीक्षा २०२३-२४ मध्ये ए. जी. हायस्कूलमध्ये घेण्यात आली होती. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना करंदीकर, हळबे, दाभोळे यांचे मार्गदर्शन लाभले असून, सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेच्या नियामक मंडळाचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर, सचिव डॉ. विनोद जोशी, शालेय समिती चेअरमन रवींद्र कालेकर, माजी संचालक सौरभ बोडस तसेच सर्व संचालक मंडळ यांनी कौतुक केले आहे.
---
खोरनिनकोत
धार्मिक कार्यक्रम

लांजा ः लांजा तालुक्यातील खोरनिनको येथील प्रसिद्ध असलेल्या श्री बल्लाळ गणेश देवस्थानच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यंदा ३५वे प्रकट वर्ष आणि २५वा स्थापना दिवस आहे. या उत्सवाला २६ डिसेंबरला प्रारंभ होईल. हा उत्सव २८ डिसेंबरपर्यंत चालेल. पहिल्या दिवशी देसाई महाराज पादुका पालखी पायी दिंडी सोहळा १० वा. बाबा भिंगार्डे यांचे घर ते वाघजाई मंदिर, १२ वा. उंबरेश्वर मंदिर येथे विश्रांती व प्रसाद, २ वा. श्री वाघजाई मंदिर व श्री आदिष्टी मंदिरापासून भजन व दिंडीसह वचनाचा नारळ व ध्वज घेऊन श्री बल्लाळ गणेश मंदिरात, ५.३० वा. गणेशयाग यज्ञ यजमान रवींद्र पराडकर गुरूजी आणि सामुदायिक आरती. २७ ला सकाळी ८ ते १२. ३० वा. धार्मिक विधी श्रींच्या मूर्तीवर अभिषेक, ध्वजपूजन व इतर मूर्तींवर अभिषेक, महापूजा महाआरती व देसाई महाराज चरित्रामृत ग्रंथाचे पूजन, ५ वा. भजन, ७.३० वा. दीपोत्सव व प. पू. देसाई महाराज पालखी प्रदक्षिणा. २८ ला सकाळी होमहवन, धार्मिक विधी समाप्ती, महापूजा व महाआरती होणार आहे. त्यानंतर महिला मंडळाचे भजन, देसाई महाराजांच्या चरित्रामृत ग्रंथाचे अनावरण, महाप्रसाद व हरिपाठ श्री सदगुरू वामनराव पै उपासना यज्ञ होईल. सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अमोल रेडीज, सचिव वसंत पावसकर व देवस्थानतर्फे केले आहे.
-----
कर्देमध्ये विद्यार्थ्यांनी
बांधले तीन बंधारे

दापोली : येथील वराडकर-बेलोसे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विशेष श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांनी दापोली तालुक्यातील कर्दे गावाच्या विकासासाठी विद्यार्थ्यांनी तीन वनराई बंधारे बांधले. विद्यार्थ्यांनी सोमेश्वर मंदिर आणि ग्रामदैवत खेममंदिर परिसराची स्वच्छता केली आणि स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक केले. १४ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या कर्दे येथील शिबिरामध्ये श्रमसंस्कार, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धनाचे धडे विद्यार्थ्यांना मिळत आहेत. सरपंच सचिन तोडणकर आणि प्राचार्य डॉ. कऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएस प्रकल्प अधिकारी प्रा. बिभीषण ढवळे, व्ही. एम. वळवी आणि टीमच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com