

31398
विधवा प्रथेला केवळ कागदावरच ब्रेक
सिंधुदुर्गातील स्थितीः ग्रामीण भागात सामाजिक अवस्था तशीच
नंदकुमार आयरेः सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १० ः विधवा प्रथा आणि त्यामुळे अशा महिलांना होणारा सामाजिक त्रास थांबविण्यासाठी मध्यंतरी शासनाने मोहीम हाती घेतली होती. ग्रामसभांचे ठरावही घेण्यात आले. सिंधुदुर्गही यात मागे नव्हता; मात्र ग्रामीण भागातील वास्तविक स्थिती पाहता हे प्रयत्न केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र आहे.
समाजात प्रचलित असलेली आणि वर्षानुवर्षे सुरु असलेली ‘विधवा’ ही अनिष्ट प्रथा निर्मुलन करण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ‘विधवा प्रथा बंद’चा ठराव घेण्याचे आदेश राज्याने काढले होते. त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायती पैकी ४२३ ग्रामपंचायतीनी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव घेतला आहे. यात देवगड, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, सावंतवाडी तालुक्यांचे १०० टक्के ठराव झाले असून दोडामार्गमध्ये ३ तर वेंगुर्ले तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीमध्ये ठराव झालेले नाहीत. शिरोळ (जि. कोल्हापूर) तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेत समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याचा प्रथम महत्वपूर्ण ठराव घेतला. हा ठराव राज्यात मोठा सामाजिक बदल घडविणारा असल्याने शासनाने संपूर्ण राज्यात याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीना जिल्हा परिषद प्रशासनाने लेखी सूचना दिल्या होत्या.
विज्ञानवादी व प्रगतशील समाज म्हणून सध्या वाटचाल सुरु असली तरीही आजही अनिष्ट विधवा प्रथांचे पालन केले जात आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे यांसारख्या प्रथांचे पालन अजूनही केले जात आहे. पतीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला विधवा म्हणून वावरत असताना समाजाकडून अवहेलनेस सामोरे जावे लागते. त्यानंतर त्या विधवा महिलेला समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होवू दिले जात नाही. त्यामुळे या कुप्रथेचे या विधवा महिला बळी ठरतात. परिणामी या महिलांना प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या मानवी अधिकारांचे खच्चीकरण होते. भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या हक्कांचेही उल्लंघन होते. त्यामुळे अशा प्रथांचे निर्मूलन होणे, काळाची गरज आहे. या महिलांना सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तो त्यांना मिळावा, यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव घेण्याचे निर्देश सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये विधवा प्रथा बंदचा ठराव घेण्यासाठी खास ग्रामसभाचे आयोजन केले होते. या सभामध्ये जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायत पैकी ४२३ ग्रामपंचायतींनी आतापर्यंत ठराव घेतले आहेत. अनिष्ट विधवा प्रथा बंद ठरावाला जिल्ह्यातील ग्रामसभांचा चांगला प्रतिसाद लाभला असला तरी वर्षानुवर्षे सुरु असलेली विधवा ही अनिष्ट प्रथा बंद करण्याची मानसिकता निर्माण होणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावनी होणे गरजेचे आहे. जोपर्यंत मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत केवळ ठराव घेऊन उपयोग होणार नाही. त्यासाठी काही कालावधी वाट पहावी लागणार आहे.
----------------
चौकट
प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्याची गरज
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३१ पैकी ४२३ ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदीचा ठराव घेतला असला तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. त्यासाठी प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. जेष्ठ नागरिक, कुटुंब प्रमुख यांची मानसिकता बदलण्यासाठी गावनिहाय प्रबोधनात्मक उपक्रम (कार्यक्रम) राबविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. पतिच्या निधनानंतर पत्नीचे सौभाग्य अलंकार उतरविले जातात. ही अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी संबधित कुटुंबातील व्यक्तिने पुढाकार घेतला पाहिजे. त्या महिलेला आधार दिला पाहिजे. मात्र, वर्षानुवर्षे सुरु असलेली प्रथा बदलण्यासाठी समाजाची मानसिकता बदलावी लागेल.
---------------
तालुकानिहाय विधवा प्रथा बंद ठराव
तालुका*एकूण संख्या*ठराव संख्या
देवगड*७२*७२
वैभववाडी*३४*३४
कणकवली*६३*६३
मालवण*६५*६५
कुडाळ*६८*६८
सावंतवाडी*६३*६३
दोडामार्ग*३६*३३
वेंगुर्ले*३०*२५
एकूण*४३१*४२३
कोट
पती निधनानंतर पूर्वीच्या काळात विधवा महिलांना वर्षभर घराबाहेर न पडणे, शुभकार्यात सहभागी न होणे यांसारखी बंधने समजाकडून घातली जात होती. मात्र, आता ही परिस्थिती बदलली आहे. हळूहळू विधवा प्रथा बंद होईल.
- विशाल तनपुरे, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.