सहलींपूर्वी एसटी बसेसह वाहकांची तपासणी करा
(एसटीचा फोटो वापरावा)
सहलींपूर्वी बससह वाहकांची तपासणी करा
गटशिक्षणाधिकारी ; शिक्षण विभागाचे परिवहन मंडळाला पत्र
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ : हिवाळा हा शैक्षणिक सहलींचा हंगाम असल्याने जिल्ह्यातील अनेक शाळांकडून शैक्षणिक सहलींचे नियोजन केले जात आहे. दुसरीकडे, राज्य परिवहन तसेच खासगी वाहनांमधील बिघाडामुळे होणारे अपघात लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या चिपळूण येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सहलींसाठी बसचा वापर करताना वाहकांची शारीरिक स्थिती योग्य असल्याची तसेच बसची तपासणी करून घ्यावी, अशी सूचना केली आहे.
सध्या हिवाळ्यामुळे उत्साहाचे वातावरण असल्याने थंड हवेचा आनंद निसर्गरम्य ठिकाणी घेण्यासाठी अनेकजण सहलींचे आयोजन करत आहेत. यंदा पाऊस अधिक प्रमाणात झाला असताना काही दिवसांपासून थंडीचा कडाकाही जाणवू लागला आहे. सर्वत्र आल्हाददायक वातावरण असल्याने शैक्षणिक सहलींसाठी हा कालावधी योग्य मानला जात आहे. शैक्षणिक सहलींसाठी फारसे कोणी पुढाकार घेत नव्हते. राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी पर्यटन संचालनालयाच्यावतीने शालेय स्तरावर शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्याच्या सूचना राज्य शासनाच्यावतीने करण्यात आल्या. त्यामुळे शाळांकडून शैक्षणिक सहलींचे नियोजन करण्यास सुरवात झाली आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास सुखरूप तसेच सुरक्षित होण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आली आहे.
या विषयी गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनाक यांनी माहिती दिली. चिपळूण तालुक्यातील विविध शाळांकडून शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात येत आहे. सहलीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून शाळांना देण्यात येणारे वाहन सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. नादुरुस्त व सुस्थितीत नसलेली वाहने सहलीसाठी देण्यात येऊ नयेत, सहलीसाठी देण्यात येणाऱ्या बसवरील चालक निर्व्यसनी असावा, आदी सूचना इरनाक यांनी केल्या आहेत.
---
शाळांची अनुत्सुकता
शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात विद्यार्थ्यांची काळजी हा संवेदनशील मुद्दा असल्याने अनेक शाळा अनुत्सुक असतात. नेहमीच्या अभ्यासाच्या दगदगीतून शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सुटका होते. त्यांना वेगळ्या विश्वात नवीन काहीतरी अनुभवण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून काही शाळा शैक्षणिक सहलींसाठी आग्रही असतात. अशा सहलींचे आयोजन करताना राज्य परिवहनची साथ महत्वाची असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

