वायूगळतीनंतर गतीमान प्रशासनाचे दर्शन

वायूगळतीनंतर गतीमान प्रशासनाचे दर्शन

Published on

rat१३p२१.jpg-

रत्नागिरी ः जिल्हा रुग्णालयातील विद्यार्थ्यांवरील उपचाराची माहिती घेताना प्रातांधिकारी जीवन देसाई.
--------

वायूगळतीनंतर गतीमान प्रशासनाचे दर्शन

बाधितांसह पालकांना दिलासा ; १६ तास सिव्हिलमध्ये ठाण मांडून
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : कोणतीही आपत्ती ओढवली की, प्रशासनाच्या मदतीबाबत कायम नाक मुरडले जाते. प्रशासनाचे काम म्हणजे वरातीमागून घोडे, असे म्हटले जाते; परंतु जयगड येथील गॅसगळतीमुळे बाधित झालेल्या ६९ मुलांना तत्काळ उपचार मिळण्यासाठी यंत्रणेने केलेली धावपळ, नियोजन आणि तत्परता कौतुकास्पद ठरली. अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग १६ तास जिल्हा रुग्णालयात ठाण मांडून आहे. आरोग्य अधिकारी, कर्मचारी राबत आहेत. पोलिस आणि राजकीय पुढारी अशी उत्तम सांघिक कामगिरीचे काल दर्शन घडले.
जिंदल पोर्ट कंपनीच्या आवारात असलेल्या गॅसटॅंकर पार्किंग प्लान्टमध्ये काल दुपारी गॅसगळती झाली. यामुळे जवळपास असलेल्या जयगड माध्यमिक विद्यामंदिरमधील सुमारे ६९ मुलांना त्याची बाधा झाली. अनेक मुलांचे डोळे चुरचुरू लागले, डोळ्यातून पाणी येऊ लागले, मळमळू लागले, श्वसनाचा त्रास झाला. त्यामुळे तत्काळ या विद्यार्थ्यांना जिंदल कंपनीच्या ऊर्जा हॉस्पिटल आणि प्राथमिक आरोग्यकेंद्रात हलविले; परंतु तेथे औषध, ऑक्सिजनची वानवा असल्याने खासगी वाहनातून त्यांना तत्काळ रत्नागिरीत हलविण्यात आले. याबाबतची सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना दिली. बर्गे यांनी प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या नेतृत्वाखाली महसूलची यंत्रणा कामाला लावली. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक भास्कर जगताप यांना सूचना करून संपूर्ण आरोग्ययंत्रणा कामाला लावली. येणाऱ्या सुमारे ३५ ते ४० विद्यार्थ्यांवर तत्काळ उपचार व्हावेत यासाठी आवश्यक औषधसाठा भंडारपाळ यांच्याकडून आणण्यात आला. खाटा रिकामा करण्यात आल्या. रिकाम्या जागेमध्ये खाली बेड टाकण्यात आले. संपूर्ण वैद्यकीय अधिकारी, नर्स, वॉर्डबॉय यांना तयार ठेवण्यात आले.
सर्व पक्षाचे राजकीय नेते, कार्यकर्ते उपस्थित झाले. जयगडहून येणारी रुग्णवाहिका किंवा खासगी गाडीतून बाधित मुलांना तत्काळ दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू केले. रात्री उशिरापर्यंत महसूल, आरोग्य, पोलिस, राजकीय पुढारी होते. आज सकाळीदेखील अप्पर जिल्हाधिकारी बर्गे, प्रांताधिकारी देसाई, तहसीलदार म्हात्रे मोडक्यातोडक्या खुर्चीवर बसून या सर्व घटनेवर लक्ष ठेवून होते. त्याची माहिती घेत होते. जिल्हा बालसंरक्षण अधिकारी समृद्धी वीर यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन विद्यार्थी-पालक यांची भेट घेतली. सर्व यंत्रणांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम केले. त्यामुळे या दुर्घटनेतील ६९ विद्यार्थ्यांवर चांगले उपचार झाले.
---
कोट...
जिल्हा रुग्णालयातील चार वॉर्डमध्ये विद्यार्थी दखल आहेत. सर्व विद्यार्थ्यांची आजदेखील चौकशी केली. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. एक विद्यार्थी फक्त अतिदक्षता विभागात दाखल आहे.
- शंकर बर्गे, अप्पर जिल्हाधिकारी रत्नागिरी
---------
कोट
बाधित विद्यार्थ्यांना काल जिल्हा रुग्णालयात आणल्यापासून आजपर्यंत महसूल विभागाची टीम काम करत आहे. औषधाची व्यवस्था आम्ही केली. नातेवाईकांची राहण्याची, नाष्टा, जेवणाची आणि जयगडहून ये-जा करण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली. आरोग्ययंत्रणेच्या टीमनेही चांगले काम केले.
-जीवन देसाई, प्रांताधिकारी रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com