कोकण रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाबाबत संभ्रमच

कोकण रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाबाबत संभ्रमच

Published on

‘कोरे’च्या दुहेरीकरणाबाबत संभ्रमच

प्रस्ताव नसल्याची माहिती पुढे; रोहा ते वीर मार्ग पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १३ : कोकण रेल्वेमार्गावरील दुहेरीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर होणार नाही. कोकण विकास समितीचे सदस्य अक्षय महापदी यांनी माहिती अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नातून दुपदरीकरणाबाबत माहिती पुढे आली आहे.
अक्षय महापदी यांनी १२ नोव्हेंबरला कोकण रेल्वेचे दुहेरीकरणाबाबत माहिती विचारली होती. त्यानुसार दुहेरीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. मागील दोन दशकात कोकण रेल्वेवरील प्रवासी संख्या, रेल्वेगाड्या आणि स्थानकाची संख्या वाढली आहे; मात्र कोकण रेल्वेचे दुहेरीकरण प्रलंबित असल्यामुळे कोकण रेल्वे प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो. त्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहेत. त्यासाठी कोकण रेल्वेवर दुहेरीकरण करावे, अशी मागणीही होत आहे. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागात रोहा ते वीर ४६.८ किमीपर्यंत रेल्वे मार्गाचे ऑगस्ट २०२१ ला दुहेरीकरण पूर्ण झाले. अन्य भागात टप्पा दुहेरीकरण किंवा पूर्ण दुहेरीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही, असे रेल्वेकडून स्पष्ट केले गेले आहे. संपूर्ण देशभरातील रेल्वेचे दुहेरीकरण, तिहेरीकरण, चौपदरीकरण केले जात आहे; मात्र कोकण रेल्वेचा दुहेरीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कोकण रेल्वेचा पसारा हा रोहा ते ठोकूर अशा ७४० किमी अंतरापर्यंत पसरलेला आहे; मात्र रोहा ते वीर मार्ग वगळता अन्यत्र दुहेरीकरणाची कामे झाली नाहीत. कोकण रेल्वेची वाढत्या गर्दीला सामावून घेण्याची क्षमता कमी होऊ लागली आहे. उशिरा रेल्वेगाड्या धावणे, जादा रेल्वेगाड्या नसणे, मर्यादित स्थानकांना थांबा असणे, अवेळी विशेष रेल्वेगाड्या चालवणे अशा समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागते. कोकणातील अनेक गावांचा विकास करण्यासाठी अतिरिक्त स्थानके उभारण्याची मागणी आहे. याबाबत रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी विचारले असता अतिरिक्त स्थानके उभारण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे माहिती अधिकारातून उत्तर देण्यात आले.
----

अद्याप ठोस निर्णय नाही
वाढीव रेल्वेगाड्या आणि थांब्यांचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे. भारतीय रेल्वेत कोकण रेल्वेचे विलीनीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. नुकताच कर्नाटक राज्यातील काही खासदार एकत्र येऊन त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या विषयाबाबत चर्चा केली; परंतु, अद्याप ठोस निर्णय झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com