सदस्य नोंदणीसाठी कामाला लागा

सदस्य नोंदणीसाठी कामाला लागा

Published on

31489

सदस्य नोंदणीसाठी कामाला लागा
रणजित देसाईः कुडाळ-मालवणमधून एक लाखाचे उद्दिष्ट
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ः कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे किमान एक लाख सभासद करण्याच्या दृष्टीने भाजपच्या प्रत्येक बुथ अध्यक्ष, शक्ति केंद्रप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी झटून कामाला लागावे. जिल्ह्यात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्यात यावी, असे आवाहन या अभियानाचे जिल्हा संयोजक रणजीत देसाई यांनी केले.
येथील महालक्ष्मी हॉलमध्ये आज भाजप सदस्य नोंदणी अभियान संदर्भात कुडाळ मंडळच्या बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी संजय वेंगुर्लेकर, राजू राऊळ, बंड्या सावंत, आरती पाटील, पप्या तवटे, रुपेश कानडे, मोहन सावंत उपस्थित होते.
यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आल्याबद्दल माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव श्री. कानडे यांनी मांडला तसेच महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव नगरसेवक राजीव कुडाळकर यांनी मांडला. या दोन्ही ठरावांना सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्यात यावी, असे आवाहन श्री. देसाई यांनी केले. पक्षाचे नेते खासदार नारायण राणे, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान तीन लाख सभासद करण्याचा निर्धार देखील यावेळी व्यक्त करण्यात आला. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये देखील पक्षाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यशाची परंपरा अखंडित ठेवायची असल्याने सर्वच कार्यकर्त्यांनी आतापासूनच नव्या उत्साहाने कामाला लागावे, असे देखील श्री. देसाई यांनी सांगितले.
यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते राजू राऊळ यांनी पक्ष सभासदत्वाचे महत्त्व सांगून सर्वांनी जास्तीत जास्त वेळ देऊन सभासद करावेत, असे आवाहन केले. मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी झालेल्या विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या गावागावातील कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेतली व त्यामुळेच निलेश राणे यांच्या रूपाने महायुतीचे आमदार निवडून आले त्याबद्दल सर्वच कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन कानडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com