पान एक-प्रचाराच्या रागातून महिलेस धक्काबुक्की

पान एक-प्रचाराच्या रागातून महिलेस धक्काबुक्की

Published on

KOP24N31501
नांदगाव ः येथील बचतगटांची बैठक असलेल्‍या दुकानगाळ्यासमोर ठेवण्यात आलेला पोलिस बंदोबस्त.

प्रचाराच्या रागातून महिलेस धक्काबुक्की
नांदगावातील बैठकीत प्रकार ः दोन्ही बचतगटांची पोलिसांत धाव
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १३ ः वीस बचतगटांचे नेतृत्‍व करणाऱ्या महिला बचतगट समूह प्रमुखाने एका राजकीय पक्षाचे काम केले. या मुद्द्यावर आज नांदगाव येथील बचतगटांच्या बैठकीत चर्चा होऊन वादंग झाला. यात बचत गटांचे नेतृत्‍व करणाऱ्या महिलेला धक्‍काबुक्‍की करण्यात आली. या प्रकरणी दोन्ही गटांकडून सायंकाळी उशिरापर्यंत तक्रारी नोंदविण्याचे काम सुरू होते.
याबाबत अधिक माहिती अशी, नुकत्‍याच झालेल्‍या विधानसभा निवडणुकीत वीस बचतगटांचे नेतृत्‍व करणाऱ्या एका महिलेने राजकीय पक्षाचे काम केल्‍याचा आरोप काही बचतगटांनी केला होता. तशी तक्रार काही दिवसांपूर्वी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती. यामध्ये त्‍या महिलेकडून बचतगटांचे नेतृत्‍व काढून घेण्याचीही मागणी निवेदनात केली होती. ही तक्रार दाखल झाल्‍यानंतर बचतगटाचे नेतृत्‍व करणाऱ्या त्‍या महिलेने आपल्‍यावर चुकीच्या पद्धतीने आरोप होत असल्‍याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. १२) तोंडवली-बावशी ग्रुप ग्रामपंचायत येथे उपोषण केले. गटविकास अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर त्‍या महिलेने आपले उपोषण मागे घेतले.
दरम्‍यान, आज नांदगाव येथे वीसही बचतगटांची बैठक झाली. या बैठकीत इतर मुद्द्यांवर चर्चा झाल्‍यानंतर बचतगटांच्या प्रमुखाने राजकीय पक्षाचा प्रचार केल्‍याचा मुद्दा चर्चेला आला. या चर्चेत एकूण २० पैकी १५ बचतगटांनी त्‍या बचतगट प्रमुख महिलेचे समर्थन केले, तर पाच बचतगटांनी बचतगट प्रमुख पदावरून बाजूला होण्याबाबत मते मांडली. यावेळी काही बचतगटांच्या महिलांनी हा विषय उपस्थित करण्याला विरोध केला. हा विषय तोंडवली गावापुरता मर्यादित आहे. त्यामुळे या बैठकीत हा विषय नको, असा मुद्दा काही बचतगटांच्या महिलांनी मांडला. मात्र, यावर एकमत झाले नाही. त्‍यामुळे दोन्ही बाजूंचे गट एकमेकांना भिडले. यामध्ये बचतगटांचे नेतृत्‍व करणाऱ्या महिलेच्या अंगावर काही महिला धावून गेल्‍या. यात बचतगटप्रमुख असलेल्‍या महिला खाली कोसळल्‍या. दरम्‍यान, महिलांसोबत काही पुरुषांनीही त्‍या महिलेला मारहाण केल्‍याची चर्चा होती. हा प्रकार होत असतानाच काही महिलांनी कणकवली पोलिस ठाण्यात दूरध्वनी करून या घटनेची माहिती दिली. काही वेळातच कणकवलीचे पोलिस निरीक्षक मारुती जगताप, उपनिरीक्षक श्री. शेडगे, हवालदार श्री. देसाई, पांडुरंग पांढरे, पोलिस सचिन माने, किरण मेथे, महिला पोलिस पूजा नांदोसकर आदी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर उपस्थित महिला बचतगटांच्या प्रतिनिधींनीही तेथून काढता पाय घेतला. यानंतर सायंकाळी उशिरा दोन्ही बाजूंच्या बचतगटांचे प्रतिनिधी कणकवली पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. तसेच परस्परविरोधी तक्रारी नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com