शिवडाव शिबिरात २१ जणांचे रक्तदान

शिवडाव शिबिरात २१ जणांचे रक्तदान
Published on

शिवडाव शिबिरात
२१ जणांचे रक्तदान
कणकवली ः परमार्थ साधनालय शिवडाव मठ, भांदुकीदेवी मित्रमंडळ तसेच सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या विद्यमाने स्वामी समर्थ मठ शिवडाव येथे शनिवारी (ता. ४) रक्तदान व आरोग्य शिबिर झाले. या शिबिरात २१ जणांनी रक्तदान केले. आरोग्य शिबिरासही प्रतिसाद मिळाला. ‘सिंधुरक्तमित्र’चे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी रक्तदान चळवळ, देहदान, अवयवदान यावर मार्गदर्शन केले. यामधून दोन महिलांनी देहदानाचा संकल्प सोडला. उपजिल्हा रुग्णालय व रक्तपेढीचे डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. डॉ. विद्याधर तायशेट्ये, डॉ. सुहास पावसकर, डॉ. सुशांता कुळकर्णी, संजीवनी हॉस्पिटलचा स्टाफ, कळसुली उपकेंद्राचे डॉक्टर आदींनी व कर्मचारी, शिवडाव उपकेंद्राचे कर्मचारी, महालॅब कर्मचारी यांनी सहकार्य केले. परमार्थ साधनालयाचे कार्यकारी विश्वस्त बाळा नाडकर्णी, भांदुकीदेवी मित्रमंडळाचे पदाधिकारी, सुहासिनी कुलकर्णी, माजी मुख्याध्यापक मेटे, मुख्याध्यापक पवार, उपसरपंच सायली तेली, पंच सदस्य चंद्रकांत शिरसाट, नितीन गावकर आदी उपस्थित होते.
-----
कारिवडे गवळदेव
जत्रोत्सव आज
ओटवणे ः कारिवडे येथील श्री गवळदेवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता. ८) होणार आहे. श्री गवळदेव देवस्थान नवसाला पावणारे असून वार्षिक उत्सवानिमित्त हजारो भाविक दर्शन घेतात. यानिमित्त मंदिरात सकाळी ८ वाजता पूजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम, ११ वाजता श्रींची महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, दुपारी २ वाजता महाप्रसाद होणार आहे. रात्री ग्रामस्थांची भजने, सायंकाळी ७ वाजता १२ वाजता पार्सेकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गवळदेव देवस्थान ट्रस्टने केले आहे.
...............
रेडी विकास मंडळाचे
रविवारी स्नेहसंमेलन
सावंतवाडी ः रेडी विकास मंडळ मुंबईचे स्नेहसंमेलन १२ जानेवारीला विकास हायस्कूल सभागृह कन्नमवार विक्रोळी मुंबई येथे आयोजित केले आहे. त्यानिमित्त सकाळी १०.३० वाजता श्रीदेवी माऊली प्रतिमेचे पूजन व आरती, ११ वाजता रेडी विकास मंडळाचा आढावा व मान्यवरांचा सत्कार, मार्गदर्शन, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, १.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी ४ वाजता शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण व हळदीकुंकू समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन रेडी विकास मंडळाने केले आहे.
...................
सातार्ड्यात उद्या
वेशभूषा स्पर्धा
सावंतवाडी ः सातार्डा येथील पंचक्रोशी टिळक ग्रंथालयातर्फे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी (ता. १०) पंचक्रोशी मर्यादित शालेय विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित केली आहे. चावाडा येथील श्री महापुरुष मंदिरामध्ये सकाळी १० वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. बालगट पहिली ते चौथी, लहान गट पाचवी ते सातवी, मोठा गट आठवी ते दहावी अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा होईल. विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर यांच्याशी ८ जानेवारीपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
....................
नेमबाजी स्पर्धेमध्ये
मयुरेश भोगटे प्रथम
वेंगुर्ले ः सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन सावंतवाडी व उपरकर शूटिंग अकादमी वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा झाली. यातील खुल्या गटात आयोजित ओपनसाईट नेमबाजी स्पर्धेत कुडाळ येथील मयुरेश भोगटे याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याला मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वेंगुर्ले पंचायत समिती कार्यालय अधीक्षक गुरू भोगटे यांचा तो पुतण्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com