

36966
आचऱ्यात रंगले कथा-कविता अभिवाचन
‘वाचू आनंदे’ला प्रतिसादः रामेश्वर वाचनालयाचा वर्धापन दिन
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ७ः येथील रामेश्वर वाचन मंदिराचा १३१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित अभिवाचन कार्यक्रमात सहभागी १२ जणांनी वाचन, कविता सादरीकरणातून वर्धापन दिनाला रंगत आणली.
कार्यक्रमाची सुरुवात जनता विद्यामंदिर त्रिंबकचे अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी साहित्यिक सुरेश ठाकूर, वाचनालयाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन मंदार सांबारी, संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य वैशाली सांबारी, जयप्रकाश परुळेकर, भिकाजी कदम, माजी केंद्रप्रमुख सुगंधा गुरव, सांस्कृतिक समितीच्या श्रद्धा महाजनी, कामिनी ढेकणे, भावना मुणगेकर, विलास आचरेकर, ग्रंथपाल विनिता कांबळी उपस्थित होते.
यावेळी आयोजित ‘वाचू आनंदे’ उपक्रमांतर्गत नुर्वी शेंटगे हिने सानेगुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ पुस्तकातील कथा वाचून कार्यक्रमाची सुरुवात रंगतदार केली. मंदार सांबारी यांनी सुरेश ठाकूर यांच्या ‘शतदा प्रेम करावे’ या पुस्तकातील ग्रंथपाल काका दळवी व्यक्ती चित्रणात्मक लेखातून एका ग्रंथनिष्ठ व्यक्तिमत्वाचा आदर्श उभा केला. भावना मुणगेकर यांनी इंदिरा संत यांची ‘गवतफुला’ कविता सादर केली. ग्रंथपाल विनिता कांबळी यांनी द्वारकानाथ संझगिरी यांच्या ‘आशा-एक सुरेल झंझावात’ या आशा भोसले यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकातील उद्बोधक प्रसंगाचे वाचन केले. अर्जुन बापर्डेकर यांनी ‘काही राहून तर गेले नाही ना’ ही कविता सादर करत जीवनातील काही सुटलेले व मनाला चटका देणारे क्षण काव्यातून व्यक्त केले. माजी केंद्रप्रमुख सुगंधा गुरव यांनी ''शामची आई''मधील कथावाचन केले. सुरेश ठाकूर यांनी सादर केलेल्या विनोदी किस्स्यांनी उपस्थितांना खळखळून हसवले. नरेंद्र कोदे यांनी ‘आचरा गाव लय भारी’ ही स्वरचित कविता सादर केली. सुरेंद्र सकपाळ यांनी स्वलिखित अनुभवलेली काश्मीर सहलीतील अनुभव कथन केले. भिकाजी कदम यांनी ‘शब्द फुलोरा’चे कथावाचन केले. अशोक कांबळी यांनी ''अश्रूंची झाली फुले'' नाटकातील प्रवेश सादर केला. बाबाजी भिसळे यांनी ‘हसतच रव’ कविता सादर केली. कार्यक्रमाचा समारोप ज्ञानेश्वरीमधील विवेचनासह ओवीने करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.