

चिपळुणातील पाणी योजनेच्या कामाला गती
दोन साठवण टाक्यांचे काम सुरू; मे अखेर काम मार्गी लावणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ः आगामी नगरपालिका निवडणूक व पावसाळ्याच्या आधी चिपळूण शहरातील महत्वाकांक्षी ग्रॅव्हिटी पाणी योजना तातडीने मार्गी लागावी. यासाठी पालिका प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या योजनेंतर्गत खेड व डीबीजे महाविद्यालयाजवळ उभारण्यात येणाऱ्या नवीन साठवण टाक्यांचे काम वेगाने सुरू झाले आहे. मे अखेरपर्यंत पहिल्या टप्प्यातील कामे मार्गी लावून पुढील टप्प्यात उर्वरित पाईपलाईन व कोळकेवाडी धरणातून पाणी उचलण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
तालुक्यातील कोळकेवाडी धरणाच्या १११.५० मीटर उंचीवर असलेल्या आऊटलेटमधून चिपळूण शहरासाठी थेट पाणी उचलले जाणार आहे. तेथून १६ किलोमीटर अंतराच्या पाईपलाईनद्वारे खेर्डी येथील १०६ मीटर उंचीवर असलेल्या नियोजीत साठवण टाकीत हे पाणी आणले जाणार आहे. पुढे डीबीजे महाविद्यालय (६८.६० मीटर उंचीवर), पाग (७६.६७ मीटर उंची), गुहागर बायपास (५६.३० मीटर उंची) व गोवळकोट येथील ५६.३० मीटर उंचीवर असलेल्या साठवण टाकीत एकाचवेळी ग्रॅव्हीटीने पाणी पुरवठा केला जाणार आहे. या साठवण टाक्यांमधून शहरातील सहा विभागात पाणी पुरवठा केला जाणार आहे. शहराच्या प्रत्येक भागात पाच ते सहा मजल्यावर ग्रॅव्हिटी योजनेतील पाणी पुरवठ्याचे नियोजन आहे. कोळकेवाडी धरणापासून शहरात ७०० मिलिमीटरची पाईपलाईन टाकली जाणार आहे. तेथून पुढे ४०० व ३५० मिलिमीटर असणार आहे. खेर्डी येथील डोंगरमाथ्यावर असलेल्या १०० गुंठे नियोजित जागेत ११.५ लाख लीटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प नव्याने उभारण्यात येणार आहे. त्यासाठी खेर्डी येथे आधीच्या ७.५ लाख लीटर क्षमतेच्या साठवण टाकी सोबत ११.५ लाख लीटरची नवीन साठवण टाकी उभारली जाणार आहे. याचपद्धतीने डीबीजे महाविद्यालय येथे ५.५६ लाख लीटर व गोवळकोट येथे ३.७५ लाख लीटर क्षमतेची नवीन साठवण टाकी उभारली जाणार आहे. त्याव्यतिरिक्त पाग येथील ४ लाख लीटर, गुहागर बायपास येथील ८ लाख लीटर व गोवळकोट येथील ७ लाख लिटरच्या जुन्या साठवण टाक्यांचा वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर शहरातील अंतर्गत पाईपलाईनसह साठवण टाक्यादेखील नव्याने उभारल्या जाणार आहेत.
कोट
डीबीजे व खेंड सॉमिलच्या परिसरात नविन साठवण टाकीचे काम सुरू आहे. त्याशिवाय अन्य साठवण टाक्यांच्या दुरूस्तीचे कामही तातडीने मार्गी लावून पाईपलाईन जोडणी सुरू केली जाईल. त्याचबरोबर जलसंपदा विभागावर कोळकेवाडी धरणापासून पेढांबेपर्यंत जलवाहिनी टाकण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात याही कामाला गती दिली जाणार आहे.
- रोहित खाडे, अभियंता, पाणी पुरवठा विभाग, चिपळूण नगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.