

37067
घाबरु नका; पण खबरदारी घ्या
जिल्हा शल्य चिकित्सक पाटील ः ‘एचएमपीव्ही’ पार्श्वभूमीवर जिल्हावासीयांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ७ ः ‘एचएमपीव्ही’ (मानवी मोटान्यूमो व्हायरस) हा राज्यात २००४ पासून आहे. त्याच्यावर उपचारही होत आहेत. हा आजार नवीन नसून कोणीही घाबरण्याचे कारण नाही; मात्र सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
मानवी मेटान्यूमो व्हायरस (‘एचएमपीव्ही’) चा चीनमध्ये उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक श्याम पाटील, डॉ. सुबोध इंगळे, डॉ. प्रशांत सवदी आदी उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, ‘‘चीनमध्ये मानवी मोटा न्यूमोव्हायरसचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत असल्या तरी तशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही. हा आजार पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. २००४ पासून हा व्हायरस महाराष्ट्रात आहे. सर्दी, ताप, खोकला, निमोनिया अशा आजाराच्या रुग्णांवर पूर्वीपासूनच उपचार केले जातात. हा व्हायरस नवीन नाही. त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही; मात्र खबरदारीच्या उपयोजना म्हणून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या आजाराचा प्रसार गर्दीचे ठिकाण आणि थंड वातावरणात होतो. हिवाळा आणि पावसाळ्याच्या ऋतूत त्याची लक्षणे दिसून येतात. तसेच पाच वर्षापेक्षा लहान आणि साठ वर्षापेक्षा अधिक वयाच्या माणसांना या आजाराचा धोका अधिक असतो. तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे आणि पूर्वीपासूनच दुर्धर आजारी असलेल्या रुग्णांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने न घाबरता स्वतःची व इतरांची काळजी घेतली तर हा आजार पसरणार नाही. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा या आजाराला रोखण्यासाठी सक्षम आहे. जिल्ह्यात औषधांचा पुरेसा साठा आहे. ऑक्सिजन व खाटांची व्यवस्था आहे. त्यामुळे चीनमध्ये उद्रेक झाल्याच्या कर्नाटक, गुजरात, जिल्ह्यामध्ये रुग्ण सापडल्याच्या बातम्या येत असल्या तरी घाबरू नये. महाराष्ट्रात आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नाही. ज्यांना फुफुसाचे आजार, कर्करोग, हृदयरोग यासारखे आजार आहेत तसेच पाच वर्षाखालील बालकांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्य विभागामार्फत सर्वे सुरू आहे. खोकला, सर्दी ताप, या सारखी लक्षणे असल्यास आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून वेळीच उपचार घ्यावेत.’’
------------------
कोट
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ‘एचएमपीव्ही’ या आजाराचा एकही रुग्ण सापडलेला नाही. कोरोनासारखा हा विषाणू भयंकर नाही, या आजारावर उपचार करण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे तरी कोणीही घाबरण्याची गरज नाही.
- नीतेश राणे, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री व अनिल पाटील, जिल्हाधिकारी
---------------
हे करा
* मास्क, रुमाल वापरा
* सॅनिटायझर, साबणाने हात धुवा.
* ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा
* भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
* संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुर्विजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या
------------
हे करू नका
* हस्तांदोलन, आजारी लोकांशी संपर्क टाळा
* डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करु नका
* लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.