कच-यावर प्रेम करा....
rat16p10.jpg-
45534
प्रशांत पटवर्धन
इंट्रो
कचरा कसा टाकायचा ? या साध्या वाटणाऱ्या पण, प्रत्येकाच्या आयुष्याला श्वासाप्रमाणे असलेल्या विषयाकडे सोप्या भाषेत पाहणार आहोत. हा विषय वाचल्यावर आपल्याला असा विचार येणं साहजिक आहे. की हा काय प्रश्न आहे? वेळ जात नाही म्हणून लिहायचं...पण कचरा टाकण्याचे प्रकार पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की कचरा विषयाला सुद्धा काही सिद्धता आहेत.
- प्रशांत परांजपे, दापोली
......
कचऱ्यावर प्रेम करा...
* कचरा टाकण्याचे प्रकार
१) घरातील कचरा बाहेर फेकून देणे.
२) अंगण असेल किंवा पॅसेज असेल तर गोळा केलेला कचरा स्वतःच्या कंपाऊंड वॉलच्या दुसऱ्या बाजूला सरकवणे.
३) घरातील गोळा केलेला कचरा अत्यंत बारकाईने गोळा करून कॅरिबॅगमध्ये भरून कामावर जाता-जाता नदी किंवा रस्त्यांच्या कडेला किंवा जमलचं तर कचरा कुंडीच्या दिशेने चालत्या गाडीवरून किंवा स्वतःच्या चारचाकी मधूनही भिरकावणे. (कचरा कुंडी आपोआप कचरा खेचून घेते असा गैरसमज असतो.)
४) घरामध्ये डस्टबीनमध्ये टाकणे.
५) डस्टबीन घंटा गाडीत उलटा करणे.
६) घराशेजारी जागा असल्यास खड्डा खणून त्या खड्ड्यात टाकणे.
अशा सहा प्रकारे कचरा टाकून स्वतःला स्वच्छता दूताची पदवी आपण स्वतःच बहाल करून मला कसं सगळं स्वच्छ आवडतं, कोठेही कचरा केलेला आवडत नाही, असे म्हणून आपल्या स्वच्छतेबाबत खुशीत असतो. प्रसंगी एखाद्याला स्वच्छतेबाबत धडेही देतो. पण यामुळे स्वच्छता खरच झाली का ? पहिल्या मुद्यापासून सहाव्या मुद्यापर्यंत प्रत्येक मुद्याचे उत्तर नाही असेच येणार आहे. पण त्यासाठी विचार करायला वेळ द्यायला पाहिजे.
१) घरातील कचरा अनेक ठिकाणी दारातून बाहेरही न पडता दाराच्या डाव्या-उजव्या बाजूला फेकला जातो. घराची स्वच्छता झाली आणि बाहेरच्या परिसराची किंवा ज्यांची रस्त्यावर घरे आहेत, त्यांनी रस्त्याची अस्वच्छता केली.
२) अंगणातील कचरा बाहेर ढकलून किंवा पॅसेजमधील कचरा दुसऱ्या कोपऱ्याकडे ढकलून तरी स्वच्छता झाली का नाहीच कारण दुसरीकडे आपण अस्वच्छता केली.
३) अनेक शिकलेली मंडळी कामावर जाताना नदीमध्ये, रस्त्याच्या कडेला किंवा कचरा कुंडीच्या दिशेने कचरा भिरकावतात. म्हणजे तेथे कचरा झाला
इतकंच नव्हे तर जलप्रदूषण करण्यास या कृतीने आपण कारणीभूत ठरत असतो, याची जाणीव आपल्याला नसते. तसेच रस्त्याच्या कडेला गटारामध्ये कचरा भिरकावला जातो, त्यामुळेही गटारे तुंबतात. त्यानंतरचा स्वच्छतेचा मार्ग म्हणजे घरातील कचरा सार्वजनिक कचरा कुंडीच्या दिशेने भिरकावणे हा असतो. आपल्याकडे इतकाही वेळ नसतो की, कचराकुंडीत टाकता येईल. त्यामुळे कचराकुंडी भोवतालचा परिसर गलिच्छ होवून जातो. म्हणजे घरातील स्वच्छता झाली पण बाहेर आपण अस्वच्छता केली. मात्र दोष नगरपालिका, ग्रामपंचायत प्रशासनाला.
४) घरामध्ये कचराकुंडी (डस्टबीन) ठेवतो व प्रामाणिकपणे सर्व कचरा या डस्टबीनमध्ये टाकतो. घंटागाडी येत असल्यास त्यामध्ये देतो. ही प्रारंभिक स्वच्छता झाली पण, एकाच कचराकुंडीत कचरा टाकल्याने पुढे कुजणारा व न कुजणारा कचरा एकत्र आला आणि कचरा घंटागाडीद्वारे तसाच डंपींग ग्राऊंडवर गेला. तिथे कोणतेही वर्गीकरण न होता तो टाकला गेला. कुत्री, गुरे या मिश्र कचऱ्यातून प्लास्टीकमध्ये बांधलेले खाद्यपदार्थ शोधू लागतात. टाकलेले पदार्थ पूर्णतः प्लास्टीकमधून बाहेर न आल्याने त्यासहीत खाल्ले जातात. पर्यायाने कालांतराने पोटे फुगलेली गुरे धष्टपुष्ट झाल्याचे दिसतात. प्रत्यक्षात त्यांच्या पोटात प्लास्टीकचे गोळे झालेले असतात. हे अनेकवेळा सिद्ध झालेले आहे. पण ती एक बातमी वाचून आपण नित्यकर्माला निघून जातो आणि कर्माची फळे स्लो पॉयझनप्रमाणे विविध मार्गाने स्विकारतो. पण तरीही साध्या साध्या गोष्टींकडे दुर्लक्षच करतो.
६) ग्रामीण भागामध्ये जागेची उपलब्धता असल्याने काही ठिकाणी आपल्याच परिसरात नागरिक खड्डा खणून, त्यामध्ये घरातील डस्टबीनमध्ये गोळा केलेला कचरा टाकतात. पण तो वर्गीकरण केलला नसल्याने कुजत नाही किंवा जाळण्याचा प्रयत्न केला तरीही ओला कचराही त्यात असल्यामुळे १०० टक्के जळत नाही. पर्यायाने राहिलेला कचरा कावळे, कुत्रे उसकटतात आणि त्याचा प्रसार करतात. यामध्ये हाडे, मांसापासून सॅनेटरी नॅपकीनपर्यंत सर्व कचरा असतो. कावळे हा कचरा उचलून झाडावर जावून बसतात. प्रसंगी त्यातला कचरा खाली पडतो किंवा उडत जाताना प्लास्टीक पिशवी अर्धवट फाटलेली ते पायात व चोचीत पकडतात. ती पिशवी वारा व वजनाने फाटते आणि तो वाईट कचरा विहिर, नदी, सागरातही पडतो आणि त्याच पाण्याचा पिण्यासाठी आपण वापर करता. हे निरीक्षण आहे. त्यामुळे वर्गीकरण न करता एकत्रित करून टाकलेल्या कचऱ्याचे काय होते ते आपण पाहिले. म्हणजे घरातील स्वच्छता झाली पण, स्वतःच्याच हाताने आपलाच परिसर आणि प्रसंगी जलस्त्रोत दुषित करीत असतो हे टाळले पाहिजे. खड्ड्यात प्लास्टीक कचरा टाकल्यामुळे जमिनीचे प्रदुषणहे होते.
हे कसे टाळता येईल? कसं शक्य आहे रोज इतका वेळ काढणं? पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे हे टाळता येत. फक्त तशी मानसिकता आपण तयार केली पाहिजे.
* इतकंच करावे लागेल - प्रत्येकाने आवर्जुन तीन कचऱ्या कुंड्या (डस्टबीन) घरामध्ये ठेवल्या पाहिजेत. याकरिता स्वतंत्र खर्चाचीही गरज नाही. जुन्या प्लास्टीकच्या स्नानाच्या बादल्या किंवा डब्यांचा वापरही आपण करू शकतो किंवा बाजारामध्ये अत्याधुनिक फूट प्रेसरींग झाकणाच्या कचराकुंड्या देखील उपलब्ध आहेत. या दोन कचराकुंड्यांमध्ये एका कुंडीत ओला कुजणारा कचरा व दुसऱ्या कुंडीत सुका न कुजणारा कचरा टाकावा. ओल्या कचऱ्याच्या कुंडीत चिरलेल्या भाज्यांचे उरलेले भाग, कांद्याची बटाट्याची साले, मांसाहार करताना शिल्लक राहिलेले टाकावू पदार्थ, खरकटे, कागदाचे कपटे असा कचरा येईल तर दुसऱ्या कचराकुंडीत औषध, साबण, शाम्पू, बिस्कीटे, केक, टोस्ट, वेफर्स इ. चे रॅपर असा कचरा येईल. यातही दाढीची ब्लेड, रेझर, बांगड्या, कटलरी, औषधांच्या डब्या, बाटल्या याकरिता अर्थात जड भंगाररुपी कचऱ्याला जागा देवू नये याकरिता स्वतंत्र डबा करण्यात यावा अथवा एखादी थैली छोटी सिमेंट पिशवी घरातील बाहेरच्या कोपऱ्यात अथवा फ्लॅट असेल तर पॅसेजमध्ये एका कोपऱ्यात ठेवावी व वेळच्या वेळी भंगारवाल्यांच्या किंवा आजकाल विविध सामाजिक सेवा संस्था किंवा कंपन्या असा कचरा संकलित करतात त्यांच्या ताब्यात द्यावा.
कचरा निर्मूलन करू नका. कचरा निर्मूलन करतो म्हणजे एक जागा स्वच्छ करून दुस-या जागेवर तो टाकतो. म्हणजे काय होते कि आपली जागा स्वच्छ होते मात्र जेथे कचरा फेकून देतो ती जागा प्रदुषित होते. म्हणून शेवटी इतकच कि आपल्याकडील सर्व सुका म्हणजे पातळ प्लास्टीक, जड प्लास्टीक, काच, कपडे, इ वेस्ट, इतर मेटल वर्गीय कचरा, पुठ्ठा, रद्दी आदी पुनर्वापराकडे पाठवा आणि ओल्या कचऱ्यापासून घरच्या घरी सेंद्रीय खत अगदी सोप्या पद्धतीने करा. कचऱ्यावर प्रेम करा, त्याला फेकू नका, त्याला पुनर्वापराकडे पाठवा आणि आपल्या घरावर कचरा मुक्त निवासामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे अशी पाटी अभिमानाने लावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

