‘घाडीगावकर’ भवनासाठी एकरुप व्हा
45588
‘घाडीगावकर’ भवनासाठी एकरुप व्हा
घनश्याम गावकर ः मुंबईत मानपत्र प्रतिकात्मक अनावरण सोहळा
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १६ ः ज्या संख्येने घाडीगांवकर समाज शतक महोत्सवी कार्यक्रमात एकवटला आहे, तसाच समाज भवन उभारणी कार्यासाठी एकरुप होऊन एकवटल्यास घाडीगांवकर समाज भवन कार्यारंभ लवकरच करता येईल, असे प्रतिपादन क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, मुंबई या संस्थेचे अध्यक्ष घनश्याम गांवकर यांनी केले. याप्रसंगी त्यांनी घाडीगावकर समाज भवनाचे विस्तृत सादरीकरण केले.
याप्रसंगी अशोक हांडे यांच्या हस्ते संस्थापक (कै.) शंकरराव सोनू घाडीगांवकर यांच्या मानप्रत्राचे प्रतिकात्मक अनावरण करण्यात आले. क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज संस्थेच्या शतक महोत्सवी वर्ष सांगता कार्यक्रम नुकताच यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, मुंबई येथे अशोक हांडे निर्मित ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमाचे आयोजन करून करण्यात आला.
क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज संस्थेतर्फे वागदे (ता. कणकवली) येथे बहुउपयोगी समाज भवन नियोजित आहे. या समाज भवन उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असून त्यासाठी घाडीगावकर समाजातील घटकांनी जास्तीत जास्त आर्थिक हातभार लावायला हवा, असे आवाहन संस्थेचे मध्यवर्ती कार्यकारिणी सदस्य तथा पत्रकार विजय गांवकर यांनी प्रास्ताविकात केले. सर्व विभागांतर्फे संस्थेच्या डोंबिवली विभागांचे अध्यक्ष आर. के. घाडीगांवकर यांनी, सर्व विभाग आपापल्या विभागांतील समाजबांधवांपर्यंत पोहोचून समाज भवन निधी संकलन करू, असा विश्वास व्यक्त केला.
शतक महोत्सवी सांगता कार्यक्रमात भाजप मुंबई उपाध्यक्ष राजेश हाटले, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या संजना घाडी, घाडीगांवकर सहकारी पतपेढीचे अध्यक्ष रघुवीर वायंगणकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमाला मुंबईचे माजी नगरसेवक संजय घाडी, मध्यवर्ती कार्यकारिणीचे उपाध्यक्ष लक्ष्मण घाडीगावकर, सरचिटणिस गजानन घाडीगांवकर, खजिनदार सुहास गांवकर, रश्मी घाडीगांवकर, आदी उपस्थित होते. अभिजित घाडी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

