राजन साळवींच्या प्रवेशाने शिंदे शिवसेना भक्कम

राजन साळवींच्या प्रवेशाने शिंदे शिवसेना भक्कम

Published on

राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघ - लोगो

साळवींच्या प्रवेशाने शिवसेना शिंदे गट भक्कम
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत फायदेशीर; सामंत-साळवी सामोपचार टिकणार का?
राजापूर, ता. १६ ः शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या गेलेल्या राजापूर विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे शिंदे शिवसेनेची ताकद वाढली आहे. ठाकरे गट शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी त्याचा फायदा होईल असा अंदाज वर्तविला जात आहे.
नव्वदीच्या दशकात शिवसेनेच्या आलेल्या भगव्या लाटेमध्ये कोकणाला राजकीयदृष्ट्या महत्व प्राप्त झाले. कोकणच्या विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात ग्रामपंचायतीपासून ते थेट विधानसभा-लोकसभेपर्यंत शिवसेनेची एकहाती पकड निर्माण झाली. मात्र शिवसेनेतील विभाजनानंतर रत्नागिरी जिल्ह्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने (शिंदेगट) आपले वर्चस्व कायम राखले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे शिवसेनेचे प्राबल्य राहिलेले आहे. जिल्ह्यातील पाचपैकी एकच जागा ठाकरे शिवसेनेला मिळाली. उर्वरित चारपैकी तीन ठिकाणी शिंदे शिवसेनेचे वर्चस्व आहे. चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) आमदार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार किरण सामंत यांच्या मदतीने रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा व राजापूर या चार तालुक्यातील ठाकरे शिवसेनेला धक्का देण्यास सुरवात केली आहे. त्याचा पहिला अंक रत्नागिरीत तालुकाप्रमुख आणि माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या पक्ष प्रवेशाने झाला. त्यानंतर राजापूरचे माजी आमदार राजन साळवींनी शिवसेना नेते खांद्यावर भगवा झेंडा आणि हाती घेतलेल्या धनुष्यबानाणे सर्वांनाच धक्का दिला. श्री साळवी यांच्या पक्ष प्रवेशाने विविध तर्कवितर्क लढविले जात होते.
मात्र, उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रवेशापूर्वी सामंत-साळवींची संयुक्त घेतलेली बैठक, त्यानंतर आमदार किरण सामंत आणि माजी आमदार राजन साळवी एकाच गाडीतून बैठकिला उपस्थित राहिल्यामुळे साळवींच्या प्रवेशावरून रंगलेल्या चर्चेला विराम मिळाला. एकंदरीत, सामंत-साळवींचे जमल्यामुळे राजापूर विधानसभा मतदारसंघातील शिंदे शिवसेनेची ताकद वाढली असून विरोधकांना सामोरे जाताना मोठेच आव्हान निर्माण झाले आहे. श्री. साळवी यांचा मतदारसंघात असलेला दांडगा जनसंपर्क, संघटन कौशल्य याचा फायदा शिंदे शिवसेनेला होऊ शकतो असे शिंदे शिवसैनिकांचे मत आहे. मात्र विरोधकांना दोन्ही नेते दीर्घकाळ एकमेकांशी जुळवून घेतील का असा प्रश्न पडलेला आहे.

चौकट
ठाकरे शिवसेनेपुढे आव्हान
शिवसेना विभागल्यानंतर उबाठा शिवसेनेच्या अनेक शिलेदारांनी धनुष्यबाण हाती घेतले. त्यामुळे ठाकरे शिवसेनेची ताकद क्षीण होत चालली आहे. नव्या आणि ताज्या दमाच्या लोकांवर ठाकरे शिवसेनेची धुरा अवलंबून आहे. पूर्वीच्या तुलनेत कॉंग्रेसची ताकद या मतदारसंघात राहीलेली नाही. त्यामुळे भविष्यात ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांना एकमेकाच्या साथीने पुढे जावे लागणार आहे.

कोट
शिवसेना (उबाठा) पक्षांतर्गत घडामोडी आणि भविष्यातील विकास लक्षात घेऊन माजी आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुढील वाटचाल करणार आहोत. माजी आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाचा निश्चितच पक्ष संघटन आणि विस्तार यासाठी फायदा होईल.
- संदेश मिठारी, शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com